घरदेश-विदेशराऊतांवरील कारवाई अन्यायकारक! शरद पवार यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार

राऊतांवरील कारवाई अन्यायकारक! शरद पवार यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाच आणून 24 तासही उलटत नाहीत तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले होते. शरद पवार यांनी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान मोदींची भेट घेत त्यांच्याशी 20 ते 25 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर पवार यांनी दिल्लीतील 6जनपथ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन भेटीमागचे कारण सांगितले. लक्षद्वीपच्या मुद्यावरून पंतप्रधानांची भेट घेतल्याचे सांगतानाच संजय राऊत यांच्यावरील ईडीची कारवाई चुकीची असून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीचा मुद्दाही पंतप्रधानांपुढे मांडल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

यावेळी शरद पवार म्हणाले की, लक्षद्वीपमध्ये नागरिकांची प्रशासकाविरोधात असलेल्या नाराजीची माहिती देण्यासाठी मी आमचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो. या भेटीत माझे राज्यसभेतील सहकारी संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईचाही मुद्दा त्यांच्यासमोर मांडला. राऊत यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असून त्यांची मालमत्ता जप्त करणे अयोग्य आहे. ते राज्यसभा सदस्य आहेत आणि ते एक पत्रकारदेखील आहेत याबाबत मी मोदींना कल्पना दिली आहे. या सर्वांवर पंतप्रधान मोदी निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे, असेही शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

सोबतच गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल कोश्यारींकडे प्रलंबित असलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्यावरून बोललो. राज्यपालांनी अद्यापही त्यावर निर्णय घेतलेला नाही. असे दोन मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ फेरबदलाचा विचार नाही

पंतप्रधान मोदींशी भेट झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर चर्चा झाली का, राष्ट्रवादी आणि भाजपची जवळीक वाढतेय का, असा प्रश्न विचारला असता भाजपसोबत कोणतीही जवळीक नाही. महाविकास आघाडी उत्तम काम करत आहे. सरकारला अडीच वर्षे झाली असून महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. फक्त 5 वर्षेच नव्हे, तर पुढील 15 वर्षे हे सरकार टिकणार आहे, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. यासोबतच महाराष्ट्र सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. या सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाचा काहीच विचार नाही, असे पवारांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

राज ठाकरेंच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही

राज ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या विधानावर प्रश्न विचारला असता मी राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्यांची भूमिका आधी भाजपविरोधी होती, आता ते बदलले आहेत, असेही पवार म्हणाले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -