घरताज्या घडामोडीED Inquiry : आणखी एक माजी मुख्यमंत्री ईडीच्या रडारवर; अब्दुल्लांना मंगळवारी हजर...

ED Inquiry : आणखी एक माजी मुख्यमंत्री ईडीच्या रडारवर; अब्दुल्लांना मंगळवारी हजर राहण्याचे आदेश

Subscribe

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग संबंधीत एका प्रकरणात समन्स बजावले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशन संबंधीत हे प्रकरण आहे. अब्दुल्लांच्या निमित्ताने इंडिया आघाडीतील आणखी एक माजी मुख्यमंत्री ईडीच्या रडारवर आले आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अनेकदा नोटीस बजावली आहे. हे सर्व इंडिया आघाडीतील नेते आहेत.

श्वेतपत्रिकेत जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचा उल्लेख

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) लोकसभेत भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित श्वेतपत्रिका सादर केली. अर्थमंत्रालयाने तयार केलेल्या या श्वेतपत्रिकेत यूपीए आणि एनडीए सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेची तुलना करण्यात आली आहे. 58 पानांच्या या श्वेतपत्रिकेत यूपीए सरकार काळातील भ्रष्टाचारांचा उल्लेख करण्यात आला आहे.
यामध्ये जे अँड के क्रिकेट असोसिएशनमधील घोटाळ्याचा उल्लेख आहे. 44 कोटी रुपये त्यांनी बोगस बँक अकाऊंटमध्ये ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपत्र दाखल असल्याचा उल्लेख श्वेत पत्रिकेत करण्यात आला आहे. याच श्वेत पत्रिकेत अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्याचाही उल्लेख आहे.

- Advertisement -

फारुख अब्दुल्लांवर काय आहे आरोप?

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे 2001 ते 2012 जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात क्रिकेटच्या विकासासाठीचा निधी वैयक्तिक फायद्यासाठी वळवण्यात आल्याचा आरोप आहे. असोसिएशनचे अधिकारी आणि इतरांकडून हा निधी मिळाला होता. त्याचा अब्दुल्ला यांनी वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप केंद्रीय तपास यंत्रणांनी केला आहे. 44 कोटी रुपयांचा हा निधी खासगी बँक खाती आणि नातेवाईकांना देण्यात आला आणि नंतर वाटून घेण्यात आल्याचे आरोप पत्रात म्हटले आहे.

गेल्या महिन्यातही समन्स

लोकसभा खासदार असलेले फारुख अब्दुल्ला यांना गेल्या महिन्यातही ईडीने समन्स बजावले होते. सध्या 86 वर्षे वय असलेल्या अब्दुल्लांनी प्रकृतीच्या कारणामुळे चौकशीला हजर राहणे शक्य नसल्याचे सांगितले होते. फारुख अब्दुल्लांपूर्वी इंडिया आघाडीतील हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने कारवाई केलेले मुख्यमंत्री पदावरील ते पहिले नेते आहेत. याशिवाय आपचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही ईडीने आतापर्यंत पाच समन्स बजावले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Ashok Chavan : ‘आदर्श’सह बुलढाणा अर्बन कर्ज घाटोळा; ‘हे’ आहे काँग्रेस सोडण्याचे कारण!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -