घरदेश-विदेशLok Sabha 2024 : ...हे दृश्य महाराष्ट्राला याचि देही याचि डोळा पाहायचे...

Lok Sabha 2024 : …हे दृश्य महाराष्ट्राला याचि देही याचि डोळा पाहायचे आहे, ठाकरे गटाची खोचक टीका

Subscribe

आधी ‘भ्रष्ट भ्रष्ट’ म्हणून भुई धोपटायची आणि मग त्यालाच भाजपामध्ये घेऊन खासदारकीचे उमेदवार करायचे हाच मोदी पॅटर्न असल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे.

मुंबई : शिंदे-फडणवीस गटाने उत्तर-पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना लोकसभेचे उमेदवार बनवले. उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ आणि आता वायकर-यामिनी जाधव यांचा प्रचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील काय? तसेच फडणवीस प्रचाराच्या व्यासपीठावर येण्याआधी मुलुंडचे पोपटलाल (भाजपा नेते किरीट सोमय्या) वायकर-यामिनींच्या स्तुतीची कवने गातील काय? हे दृश्य महाराष्ट्राला एकदा याचि देही याचि डोळा पाहायचे आहे, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे.

देशात ‘मोदी पॅटर्न’ चालणार, बाकी सगळे पॅटर्न भंगारात जाणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. त्याच मोदी पॅटर्ननुसार भ्रष्टाचारात बरबटलेले आणि भाजपाच्या वॉशिंगमध्ये घुसलेले एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. शिंदे-फडणवीस गटाने उत्तर-पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना लोकसभेचे उमेदवार बनवले आणि मोदी पॅटर्नचा मान राखण्याचा प्रयत्न केला. या दोघांविरोधी याआधी भाजपाने भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे रान उठवले होते, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

मुलुंडच्या पोपटलालने तर या दोघांच्या भ्रष्टाचाराची कुंडली काढून थयथयाट केला होता. या दोघांना तुरुंग दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही जाहीर केले होते. आता या दोघांच्या निवडणुकांचे प्रचारप्रमुख म्हणून या पोपटलाललाच नेमावे लागेल. लोकशाही, कायदा, न्यायव्यवस्थेचा हा असा खेळखंडोबा भाजपाने केला आहे. आधी ‘भ्रष्ट भ्रष्ट’ म्हणून भुई धोपटायची आणि मग त्यालाच भाजपामध्ये घेऊन खासदारकीचे उमेदवार करायचे हाच मोदी पॅटर्न असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

कर्नाटकात वीस हजार बलात्कार करणाऱ्या एका प्रज्वल रेवन्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धो धो प्रचार केला. या प्रज्वल रेवन्नाने सत्तर वर्षांच्या वृद्धेलाही सोडले नाही. मोदी यांनी रेवन्नाच्या पाठीवर थाप मारून त्याला आशीर्वाद दिला. आता हा रेवन्ना जर्मनीत पळून गेला. बलात्कारी तसेच भ्रष्टाचारी अशा सर्व लोकांची ‘मोट’ बांधून निवडणूक जिंकण्याचा मोदी पॅटर्न देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारा आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

काळाने भाजपावर, फडणवीसांवर, पोपटलालवरच घेतलेला हा सूड आहे, पण निर्लज्जम् सदा सुखी असेच हे लोक आहेत. तुम्ही निर्लज्ज बनला असला तरी महाराष्ट्राने लाज सोडलेली नाही. भ्रष्टाचाराच्या ‘मोदी पॅटर्न’ला कायमचे भंगारात पाठविल्याशिवाय मऱ्हाठी जनता स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मोदी हा सत्तेसाठी वखवखलेला भटकता आत्मा, ठाकरे गटाचा घणाघात


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -