घरदेश-विदेशभोपाळ : हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप गड राखणार का?

भोपाळ : हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप गड राखणार का?

Subscribe

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना मैदानात उतरवले. काँग्रेसच्या या निर्णयामुळे भाजपनेही या मतदारसंघातून तगडा उमेदवार देण्याचे ठरवले. कारण 1989पासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे. काँग्रेसने दिग्विजय सिंह यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांनी या जागेवर दावा ठोकला. भाजप आणि संघाने संधी दिली तर भोपाळमधून निवडणूक लढवण्यास उत्सूक असल्याचे त्यांनी म्हटले. 18 लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात 4 लाखाहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. यातील बहुसंख्य मुस्लिम मतदार शिवराजसिंह चौहान यांना पाठिंबा देतात.

गेल्या 3 दशकापासून भाजपचा गड असलेल्या हा मतदारसंघ यावेळी देखील कायम राखावा यासाठी पक्ष शिवराजसिंह चौहान यांच्या नावाचा विचार करत होता. परंतु अंतिम पातळीवर हा निर्णय बदलण्यात आला. आता या ठिकाणी दिग्वीजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर अशी थेट लढत होणार आहे. भाजपने यानिमित्ताने निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढले, त्याची चर्चा मात्र तिसर्‍या टप्प्यापासून सुरू केली. अशा प्रकारे हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप भोपाळ हा गड राखण्यासाठी यशस्वी होणार का, हे पाहणे आता उत्सूकतेचे ठरणार आहे.

- Advertisement -

दिग्विजय सिंह यांना यंदा त्यांच्या स्वत:च्या म्हणजेच राजगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. पण कमलनाथ यांनी त्यांना भोपाळ हा विजयी होण्याच्या दृष्टीने अवघड असा मतदारसंघ दिला. दिग्विजय सिंह यांनी राजगड येथून 1984 आणि 1991मध्ये विजय मिळवला होता. भोपाळ मतदारसंघात विधानसभेच्या 8 जागा येतात. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या 8 पैकी 3 जागांवर काँग्रेसचे उमेदवार तर 5 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भोपाळमधून काँग्रेसने 1984मध्ये विजय मिळवला होता. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर काँग्रेसचे के.एन.प्रधान यांनी विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर गेली 30 वर्षे येथे भाजपची सत्ता आहे. 1989पासून आतापर्यंत झालेल्या 8 निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. 2014च्या निवडणुकीत विद्यमान खासदार आलोक संजर यांनी 3.70 लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास, देशप्रेम, सर्जिकल स्ट्राइक आदी मुद्दे पुढे करत प्रचार करत होते. मात्र तिसर्‍या टप्प्यात भोपाळमधून दिग्वीजय सिंह यांच्या विरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्याची चर्चा भाजपने सुरू करून एकप्रकारे हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढले. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीमुळे देशभरात खळबळ उडाली. तोवर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अनेक वादग्रस्त विधाने करून देशभरातील मिडियाचे लक्ष केंद्रीत केले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही साध्वी प्रज्ञा यांचे समर्थन करून एकप्रकारे बोलविता धनी आम्हीच असल्याचे अप्रत्यक्षपणे दाखवून दिले. साध्वी यांना उमेदवारी न देण्याविषयी समाजातून भाजपवर दबाव येऊ लागला, तरीही भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची उमेदवारी कायम केली. अशा प्रकारे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जाणार्‍या साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी देऊन भाजपने हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढले. १२ मे रोजी सहाव्या टप्प्यात भोपाळमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे आता या ठिकाणचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना प्रचारासाठी ७२ तास प्रतिबंध केल्यानंतरही त्या काळात त्या सर्वत्र भजन, प्रवचन करून अप्रत्यक्षपणे प्रचार करत राहिल्या. सध्या त्या रोड शो, प्रचारसभा घेत आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटात तत्कालीन काँग्रेसप्रणीत पुरोगामी आघाडी सरकारने आपल्याला गोवले. त्यावेळी आपल्यावर पोलिसांनी अनन्वीत अत्याचार केले, आपला विनयभंग केला, आपल्याला मरणासन्न अवस्थेत आणून ठेवले, असे आरोप करत साध्वी प्रज्ञा सिंह सध्या काँग्रेसवर आगपाखड करत आहेत. विशेष म्हणजे त्याच काळात दिग्वीजय सिंंह यांनीही हिंदु दहशतवाद या संज्ञेला हवा देऊन साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे मालेगाव प्रकरणासंबंधीतील दोन घटक या ठिकाणी एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिल्याने येथील निवडणूक देशभरात चर्चेला आली आहे. भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी देऊन देशभरात हिंदुत्वाच्या नावाने प्रचार सुरू केला आहे.

हिंदुत्ववादी मतांना घराबाहेर काढून मतदान केंद्रांपर्यंत आणण्याचा मनसुबा आखला आहे. त्यामुळे अखेर दिग्वीजय सिंह यांनीही आता साधुसंतांचा पाठिंबा मिळवण्याची धडपड सुरू केली आहे. मंगळवारी कम्पुटर बाबांना घेऊन दिग्वीजय सिंह यांनी मोठ्या पटांगणात होमहवन केले. कम्पुटर बाबांच्या सहकार्‍यांनी दिग्वीजय सिंंह यांच्या विजयासाठी हठयोगही केला. दिग्वीजय सिंह यांनीही सपत्नीक पुजापाठ केला. अशा प्रकारे दिग्वीजय सिंह यांनी हिंदू मते मिळवण्यासाठी त्यांच्या प्रतिमेला थेट ३६० अंशात बदलण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे भोपाळमधील निवडणूक अधिक रंगतदार आणि अधिक चुरशीची बनली आहे. यात भाजप हिंदुत्वाच्या मुद्यावर हा गड राखण्यास यशस्वी ठरणार का, हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.

1951 पासून १९८४ पर्यंत भोपाळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अधिराज्य होते. केवळ १९६७ आणि १९७७ मध्ये भारतीय जनसंघ आणि भारतीय लोक दल यांनी याठिकाणी विजय मिळवला होता. मात्र १९८९ पासून ते २०१४ पर्यंत ८ वेळा झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार या ठिकाणाहून निवडून येत राहिला. अशा प्रकारे हा लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या वेळी काँग्रेसने हा मतदारसंघ भाजपच्या हातून हिसकावून घेण्यासाठी थेट मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजय सिंह यांनाच उमेदवारी दिली. त्यावर भाजपनेही मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना उमेदवारी देऊन थेट हिंदुत्वाचे कार्ड काढल्याने या ठिकाणी आता अटीतटीची लढत होणार आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -