घरदेश-विदेशविनापरवानगी दाढी राखली म्हणून मुस्लिम पोलीस निलंबित

विनापरवानगी दाढी राखली म्हणून मुस्लिम पोलीस निलंबित

Subscribe

उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला एका अजब कारणामुळे निलंबनाच्या कारवाईचा सामना करावा लागला आहे. इंतेसार अली नामक फौजदाराने विनापरवानगी दाढी राखल्यामुळे त्याच्यावर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला आहे. विशेष म्हणजे अलीला वरिष्ठांनी तीन वेळा दाढी कापण्यासाठी सांगण्यात आले होते. दाढी ठेवायची असेल तर रितसर परवानगी घ्या, असेही सांगण्यात आले होते. मात्र अलीने कोणतीही परवानगी न घेता दाढी वाढू दिली.

बागपत जिल्ह्यातील रमाला पोलीस स्थानकात हा सर्व प्रकार घडला आहे. बागपतच्या पोलीस अधीक्षकांनी अलीवर ही कारवाई केली आहे. उपनिरीक्षकाला तीन वेळा समज देऊनही त्याने परवानगी घेतली नसल्याचे कारण सदर कारवाईनंतर देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अभिषेक सिंह यांनी सांगितले की, इंतेसार अली वरिष्ठांच्या परवानगी विनाच दाढी राखत होते. अनेक वेळा त्यांना दाढी काढून टाकण्याची विनंती करण्यात आली. मात्र तरिही त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत दाढी वाढू दिली. यामुळे नाईलाजाने आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागली.

- Advertisement -

अभिषेक सिंह पुढे म्हणाले की, पोलीस म्यॅन्युअल नुसार फक्त शीख धर्मीयांना दाढी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. बाकी सर्व पोलिसांना आपले चेहरे क्लिन शेव्ह ठेवावे लागतात. जर कुणा पोलिसाला दाढी वाढवायची असेल तर त्याला परवानगी घ्यावी लागते. इंतेसार अलीला हीच गोष्ट आम्ही वारंवार सांगितली. मात्र त्यांनी आदेशाचे पालन करण्यास नकार दिला.

इंतेसार अली हे तीन वर्षांपुर्वीच उत्तर प्रदेश पोलिस दलात सामील झाले होते. तेव्हापासून ते बागपत जिल्ह्यात तैनात होते. आपल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना इंतेसार अलीने सांगितले की, मी दाढी राखण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र मला कुणीही काहीही प्रतिक्रिया दिली नाही. उत्तर प्रदेशमध्ये या घटनेचा सोशल मीडियावर चांगलाच उहापोह होत असून अनेक ठिकाणी यावर वादविवाद सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -