घरदेश-विदेशभारताने हवेत मारा करणारी क्षेत्रणास्त्रे केली तैनात

भारताने हवेत मारा करणारी क्षेत्रणास्त्रे केली तैनात

Subscribe

भारत आणि चीन यांच्यातील पूर्व लडाखमधील तणाव कमी होण्याऐवजी वाढत आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी सैनिक आणि हेलिकॉप्टर्सच्या वाढत्या कारवाया पाहून भारताने पूर्व लडाखमध्ये अत्याधुनिक हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. चिनी विमानाने नियंत्रण रेषा ओलांडल्यास त्याला या क्षेपणास्त्रांद्वारे हवेतच उद्ध्वस्त केले जाऊ शकणार आहे.

सीमेवर उपस्थिती आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी भारतीय सैन्य आणि भारतीय हवाई दलाने हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केली आहे, जेणेकरून पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) लढाऊ विमान किंवा हेलिकॉप्टर सीमारेषा ओलांडून आत आल्यास त्यांना तात्काळ लक्ष्य केले जाणार आहे. भारत लवकरच मित्र राष्ट्राकडून अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टम घेणार आहे. यामुळे संपूर्ण सीमेचे रक्षण होणार असून शत्रूच्या कोणत्याही विमानाला रोखणे शक्य होणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. चिनी हेलिकॉप्टर भारत सीमेच्या अगदी जवळून उड्डाण करत आहेत, विशेष म्हणजे वादग्रस्त भागांमधून ही उड्डाणे होत आहेत. ज्यामध्ये दौलत बेग ओल्डि सेक्टर, गलवान खोरे, पेट्रोलिंग पॉईंट्स १४,१५,१७, १७ ए यांसह पँगाँग फिंगर ३ चा समावेश आहे.

- Advertisement -

भारताच्या अत्यंत वेगवान हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांमध्ये आकाश क्षेपणास्त्राचादेखील समावेश आहे, जे काही सेकंदात अत्यंत वेगवान उड्डाण करणारी लढाऊ विमाने आणि ड्रोन यांना लक्ष्य करून त्यांना उद्ध्वस्त करू शकतात. या क्षेपणास्त्रांचे अत्याधुनिकीकरण केल्यानंतर त्यांना या भागात तैनात करण्यात आले आहे. पूर्व लडाखमध्येही भारतीय लढाऊ विमनांची गरज भासू लागली आहे. ही विमाने सर्व शस्त्रास्त्रांनी युक्त असतात, वेळप्रसंगी ते शत्रूंचा नायनाट करू शकतात. शस्त्रू राष्ट्राच्या प्रत्येक हालचालीवर भारताची यंत्रणा बारीक नजर ठेवून आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिनी सैन्याने सीमा रेषेच्या दिशेने कूच केल्यावर भारतीय हवाई दलाने तात्काळ पूर्व लडाखमध्ये सुखोई हे लढाऊ विमान तैनात केले.

एअरफोर्स अलर्ट मोडवर
चीनसोबत लडाखमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर वायुसेनेने लडाख भागात आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. या भागात अतिरिक्त जवान तैनात करण्यासाठी आणि त्यांना रसद पोहोचवण्यासाठी वायुसेनेने कंबर कसली आहे. तसेच चीनवर नजर ठेवण्यासाठी सुखोई-30 आणि मिग-29 लढाऊ विमान लडाखच्या आकाशात घिरट्या घालताना दिसले. यासह अपाचे आणि चिनुक हेलिकॉप्टर देखील मैदानात उतरले आहेत. चीनने सीमा रेषेजवळ असणार्‍या एअरबेसवर लढाऊ विमान तैनात केल्याचे सॅटेलाईट इमेजद्वारे स्पष्ट झाल्यापासून वायुसेना अधिक सतर्क झाली आहे. काही दिवसांपूर्वी वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी या भागाचा दौरा केला होता.

- Advertisement -

भारताच्या मदतीला अमेरिका

विस्तारवादी धोरणामुळे अनेक देशांसोबत सीमावाद उकरून काढणार्‍या चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी आता अमेरिकेने कंबर कसली आहे. करोना संकटामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध बिघडले आहेत. त्यात आता चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावाची भर पडली आहे. त्यामुळे आता अमेरिका आपलं युरोपमध्ये तैनात असलेलं सैन्य आशियामध्ये तैनात करणार आहे. अमेरिका सर्वप्रथम जर्मनीतून आपलं सैन्य हटवणार आहे. जर्मनीत अमेरिकेचे ५२ हजार सैनिक तैनात आहेत. त्यातले ९,५०० सैनिक आशियामध्ये हलवले जाणार आहेत. लडाखमधील सीमावादावरून चीन आणि भारताचे संबंध बिघडले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स या देशांनाही चीनकडून धोका आहे. त्यामुळेच अमेरिकेनं आशिया खंडात सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमुळे भारतासोबतच आग्नेय आशियाला धोका निर्माण झाल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी स्पष्ट केले आहे.‘चीनमुळे भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपीन्ससारख्या आशियाई देशांसमोर आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळेच अमेरिकेकडून जगभरात तैनात असलेल्या सैन्याचा आढावा घेतला जात आहे. आवश्यकता भासल्यास त्यांना चिनी सैन्याचा मुकाबला करण्यासाठी तैनात केलं जाईल,’ असं पॉम्पियो म्हणाले. ते जर्मन मार्शल फंडच्या व्हर्च्युअल ब्रसेल्स फोरममध्ये बोलत असताना त्यांनी अमरिकेची भूमिका स्पष्ट केली.

पीपल्स लिबरेशन आर्मीशी (चिनी सैन्य) दोन हात करण्याच्या दृष्टीनं आमची तयारी सुरू असल्याची माहिती पॉम्पियो यांनी दिली.‘चिनी लष्कराच्या कारवाया सध्याच्या घडीचं मोठं आव्हान आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी सर्व संसाधनं योग्य ठिकाणी असावीत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार सैनिकांच्या तैनातीचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे जर्मनीत सेवा बजावत असलेल्या सैनिकांची संख्या कमी केली जाईल. सध्या जर्मनीत अमेरिकेचे ५२ हजार सैनिक कर्तव्य बजावत आहेत. ही संख्या २५ हजारांवर आणली जाईल,’ असं पॉम्पियो यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -