घरदेश-विदेशभारत-चीनदरम्यानचं वादग्रस्त 'गलवान' काय आहे? वाचा १३० वर्षांपूर्वीची गूढ कथा!

भारत-चीनदरम्यानचं वादग्रस्त ‘गलवान’ काय आहे? वाचा १३० वर्षांपूर्वीची गूढ कथा!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून गलवान खोरं हे नाव सातत्याने कानांवर पडत आहे. याच ठिकाणी भारतीय आणि चीनी सैन्यामध्ये चकमक झाली. २० भारतीय जवान शहीद झाले. त्यासोबतच अनेक चीनी सैनिकही मारले गेले. त्यांचा निश्चित आकडा अजूनही अंदाजितच आहे. या मुद्द्यावरून सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि चीनमधील वातावरण कमालीचं तापलं आहे. भारत आता अक्साई चीनवर सर्जिकल स्ट्राईकही करू शकतो, असं देखील म्हटलं जाऊ लागलं आहे. पण नक्की हे गलवान आहे तरी काय? याचं असं नाव कसं पडलं? याची एक मोठी रंजक कहाणी आहे. दीडशे वर्षांपूर्वीची!

गलवान ही एक दरी आहे. याच दरीतून एक नदी देखील वाहते आणि तिचं नाव देखील गलवान असंच आहे. तब्बल १४०० फूट खोल असणाऱ्या या दरीचं तापमान अनेकदा उणे २० अंशांच्याही खाली जातं. १९६२ साली भारत – चीनमध्ये झालेल्या युद्धाला देखील याच गलवान दरीतून सुरूवात झाली होती. त्यामुळे जिथे साधं गवताचं पातं देखील उगत नाही, असा हा गलवान भाग दोन्ही देशांसाठी प्रचंड संवेदनशील झाला. पण या भागाचं नाव गलवान का पडलं याची एक गूढ कथा आहे!

- Advertisement -

…आणि गलवान खोऱ्याचा शोध लागला!

या भागाचं नाव गुलाम रसूल गलवान या व्यक्तीच्या नावावरून पडलं. आता ही व्यक्ती कोण होती, याचं मोठं गूढ आहे. काही लोकं गलवान हा दरोडेखोर होता असं म्हणतात, तर काही लोकं गलवान मेंढपाळ असल्याचं म्हणतात. या गुलाम रसूल गलवानचं घर अजूनही लडाखच्या डोंगरात आहे. त्याचं झालं असं, की १८९९ साली भारतातल्या विविध भूभागांपर्यंत जाऊन तिथल्या परिसराची माहिती काढण्यासाठी ब्रिटिशांनी स्थानिकांचे काही गट स्थापन केले होते. त्यात लडाखच्या भागात जाण्यासाठीच्या गटाचं नेतृत्व गुलाम रसूल गलवान याच्याकडे होतं. लडाखच्या डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांच्या प्रदेशात फिरताना पहिल्यांदा या दरीचा आणि तिच्या बाजूने वाहणाऱ्या नदीचा शोध गुलाम रसूलच्या गटानं लावला. त्यामुळे या भागाला गलवान हे नाव देण्यात आलं. काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात गलवानपोरा नावाचं एक गाव देखील आहे.

- Advertisement -

१९२५मध्ये गलवानच्या जन्मदात्याचा मृत्यू

अनेक इंग्रज आणि अमेरिकी पर्यटकांना हा गुलाम रसूल गलवानला गाईड म्हणून हा भाग फिरवायचा. पुढे या गलवानला ब्रिटिश जॉइंट कमिशनरचा लडाखमधला मुख्य सहायक म्हणून नियुक्त करण्यात आलं. १८९०मध्ये ब्रिटिश अधिकारी लॉर्ड डुनमोरे या गलवानला आपल्यासोबत पामिरला घेऊन गेला. तिथे २५ वर्ष काढल्यानंतर १९१४मध्ये अशाच एका शोधकर्त्या गटाचा प्रमुख म्हणून नेमण्यात आलं. रीमो ग्लेशियर्सचा शोध देखील याच गटाने लावला आहे. १९२५मध्ये गुलाम रसूल गलवानचा मृत्यू झाला.

गलवानचे पूर्वज दरोडेखोर?

गुलाम रसूल गलवानने सर्व्हंट्स ऑफ साहिब नावाचं एक पुस्तक देखील लिहिलं आहे. या पुस्तकात त्याने आपल्या आयुष्यातल्या अनेक घटनांचा उल्लेख केला आहे. गुलाम रसूलचे पूर्वज लडाखमध्ये खूप आधीपासून श्रीमंतांना लुटून ती संपत्ती गरीबांना वाटत असल्याचं आख्यायिका सांगतात. एकदा काश्मीरच्या राजानं त्यांना भेटायला बोलावलं आणि दगा करून मारून टाकलं, असं देखील बोललं जातं. त्यामुळे गलवान हे मूळचे दरोडेखोर होते अशीही एक आख्यायिका आहे.

पण आजपासून १३० वर्षांपूर्वी गुलाम रसूल गलवान नक्की कोण होता किंवा काय करत होता? याचं निश्चित उत्तर जरी अद्याप मिळू शकलेलं नसलं, तरी त्याच्या नावावरून नाव पडलेल्या गलवान खोरं आणि गलवान नदीचा परिसर आज आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा आणि चिंतेचाही विषय ठरला आहे हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -