घरसंपादकीयअग्रलेखराजकीय प्रतिष्ठेची छी थू...

राजकीय प्रतिष्ठेची छी थू…

Subscribe

महाराष्ट्राला संतांची, सुसंस्कृत राजकीय नेत्यांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. महाराष्ट्रात याआधीही अनेकदा सत्तांतरे झाली आहेत. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचा इतिहास आहे. एकमेकांचा आदर राखत टीका करत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धक्का पोहचेल, असे कधी घडले नव्हते. गेल्यावर्षी राज्यात सत्तांतर झाल्यापासून प्रचंड राजकीय गोंधळ सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. एकमेकांवर टीका करताना जबाबदार सत्ताधारी आणि विरोधक अगदी खालच्या पातळीवर जाऊन आपला संताप व्यक्त करताना दिसतात.

त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीच धोक्यात येऊ लागली असून सध्याचे राजकीय वातावरण पाहता नव्या पिढीला आपण नक्की कोणती दिशा देऊ पाहत आहोत, याचे भान प्रत्येक राजकीय पुढार्‍याला ठेवण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत स्वतः निर्भिड आणि अभ्यासू पत्रकार आहेत. राजकारणातही त्यांचा चांगला दबदबा आहे. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका ठरली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधत त्यांनी महाविकास आघाडीला टिकवण्यात मोठे योगदान दिले आहे, पण पत्राचाळप्रकरणी जेलमध्ये जाऊन आल्यानंतर आणि महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना फुटल्यानंतर मात्र खासदार संजय राऊत यांची जीभ वारंवार घसरू लागली आहे.

- Advertisement -

आतातर त्यांनी थेट थुंकण्यापर्यंत मजल मारली आहे. आघाडीचे पत्रकार, ठाकरे गटाचे आधारस्तंभ आणि महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून जबाबदारीने काम करणार्‍या खासदार संजय राऊत यांना स्वतःला आता आवरण्याची गरज आहे. खासदार संजय राऊत यांची तळमळ, दुःख, वेदना समजण्यासारख्या आहेत, पण त्या मनात ठेवून राजकीय टीका करताना थुंकण्यापर्यंत मजल मारणे त्यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याला शोभणारे नाही. बरे, सातत्याने टीका करत राहताना त्यातील गांभीर्य निघून जाते, हे सांगण्यासाठी आमच्यासारख्यांची गरज नाही. खासदार संजय राऊत नक्कीच तितके प्रगल्भ आहेत. आपल्यामुळे पक्षाचे नुकसान होतेय. जनमानसात प्रतिमा डागाळली जातेय. महाविकास आघाडीतही अनेकदा त्यामुळे कुरबुरी होतायेत, याचे भान ठेवून संजय राऊतांना संयमाने टीका करण्याची गरज आहे.

बरे, एकटे संजय राऊतच टीका करताहेत असेही नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमधील अनेक वाचाळवीर सध्या सुसाट वेगात आहेत. त्यातल्या त्यात शिंदे आणि ठाकरे गटातच दररोजचा संघर्ष चव्हाट्यावर येत असतो. त्यातून आमदार, खासदार, मंत्री आपली पातळी सोडून बेताल बोलू लागले आहेत. खेदाची बाब म्हणजे सत्ताधाऱी आणि विरोधकांमधील जबाबदार नेतेच बेताल बोलत असल्याने त्यांच्या चिल्लापिल्लांचाही जोर वाढला आहे. राणे कुटुंब आणि ठाकरे परिवारात राजकीय संघर्षातून उफाळलेला वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबाकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. आतातर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह त्यांची दोन्ही मुले अगदी वाट्टेल त्या भाषेत ठाकरे परिवार आणि त्यांच्या समर्थकांवर तोंडसुख, अगदी दररोज घेऊ लागले आहेत.

- Advertisement -

टीका करताना महिलांचा अवमान होतोय, त्यांच्या चारित्र्यावर बोलत आहोत, याचेही भान अनेकदा राखले जात नाही ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे. मध्यंतरी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची पुण्याच्या शिरूर येथे लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रवेशावर बोलताना जीभ घसरली होती. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका केली होती. दरेकरांसारखी अशी काही बेताल वक्तव्ये काही नेत्यांकडून झालेली आहेत, हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेले, ऐकलेले आहे. टीआरपी वाढवण्यासाठी मीडियाकडून अशा बेताल वक्तव्याच्या बाईटचा भडीमार दिवसभर सुरूच असतो. त्यामुळे नेत्यांची जीभ आणखीनच घसरताना दिसू लागली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला, राजकारणाला ही नक्कीच शोभादायक बाब नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अशा वाचाळवीरांचे कान टोचण्याचे काम केले आहे. परस्परांवर राजकीय टीका करा, पण त्यासाठी भाषा वापरताना काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी नेत्यांना दिला आहे. निवडणुका जिंकणे हा एकमेव निकष लावत गेल्या आठ-दहा वर्षांत अनेकांना भाजपने आपल्या पंखाखाली घेतले, पण भाजपची शिस्त काही त्यांच्या अंगवळणी पडत नाही आणि मातृसंस्थेने दिलेला सल्ला त्यांच्या लक्षातच येत नाही. इतर पक्षाच्या नेत्यांना फार मार्गदर्शन करता येत नाही. त्यामुळे सरसंघचालकांनाच पुढाकार घेत आपल्या पक्षातील काही बोलघेवड्यांना कानपिचक्या देण्याची वेळ आली आहे.

भारतात लोकशाही असल्याने राजकीय मतभेद, सत्तेसाठी स्पर्धा, परस्परांवर टीका होणारच, मात्र सत्ताप्राप्तीसाठी टीका करताना जनतेमध्ये विसंवाद निर्माण होणार नाही आणि देशाच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याचा विवेक राजकीय पक्षांनी बाळगावा, असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे. राजकारणाची पातळी किती खाली गेली आहे, हे बेताल नेत्यांमुळे दिसू लागले आहे. कुठलाच राजकारणी विकासावर बोलत नाही. हा संस्कृत महाराष्ट्र आहे का? हा आपल्या साधुसंतांचा, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे का?, असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होऊ लागल्याने नेत्यांची प्रतिमा डागाळू लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -