घरसंपादकीयअग्रलेखभाग्याचा दिवस कधी येणार?

भाग्याचा दिवस कधी येणार?

Subscribe

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांची डोके उठवणारी आतषबाजी सुरू आहे. भाषेचा शिमगा जोरात आहे. पण मतदानाचा टक्का घसरलेला आहे. १९ एप्रिलला केवळ पहिल्या टप्प्याचेच मतदान झाले आहे. अजून सहा टप्पे बाकी आहेत. पण तरीही २०१९च्या तुलनेत यावेळी मतदानात जवळपास तीन टक्क्यांची घट दिसत आहे. मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी, त्यांना मतदानाच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना केल्या आहेत.

अगदी सेलिब्रिटींना निवडणूक आयोगाचे दूत बनवून त्यांच्यामार्फत मतदारांना आवाहन, क्रिकेट सामन्यादरम्यान मतदानाबद्दल जागरूकता आणण्याचा प्रयत्न, रेल्वे तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी याबाबत उद्घोषणा यासारखे प्रयत्न निवडणूक आयोगाकडून सुरू आहेत. त्यामुळे उर्वरित सहा टप्प्यांमध्ये तरी मतदारांमध्ये उत्साह दिसेल आणि मतदानाचा टक्का वाढेल, अशी आशा आयोगाला आहे, पण नुसते आवाहन किंवा जनजागृती मोहीम हाती घेऊन उपयोग नाही, मतदानाचा टक्का का घसरत आहे? याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

- Advertisement -

मुख्य मुद्दा हाच आहे की, मतदारांना समोर आश्वासक असे काही दिसत नाही. महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर, कोणताही राजकारणी भूतकाळाचा फळा पुसून टाकून भविष्याचे काही लिहायला तयार नाही. प्रमुख पक्षाचे नेते भूतकाळातील घटनाच गिरवत बसले आहेत. मग ते शरद पवार असोत, देवेंद्र फडणवीस असोत, अजित पवार असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा एकनाथ शिंदे असोत!

आपले अस्तित्व कसे धोक्यात होते, हे सांगताना सध्या शिळ्या कढीलाच ऊत आणला जात आहे. घासून घासून गुळगुळीत झालेल्या किश्शांबरोबरच आता नवनवीन किस्सेही ऐकवले जात आहेत. अजित पवार हे सकाळच्या शपथविधीची तीच कॅसेट वाजवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील मागे नाहीत. त्यांनी तर थेट १८ वर्षांपूर्वीचे एका वक्तव्याचे भांडवल केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थानमधील बांसवाडा येथे झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसवर टीका करताना याचा उल्लेख केला होता. काँग्रेस सत्तेवर आल्यास लोकांच्या संपत्तीचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल.

- Advertisement -

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने देशाच्या मालमत्तेवर पहिला हक्क मुस्लिमांचा असल्याचे म्हटले होते, असे मोदी यांनी म्हटले आहे. त्याच्या मागचा संदर्भ काय होता, याबाबत मात्र समोरची जनता अंधारातच राहिली. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही तेच सुरू आहे. शिवसेनेची दुफळी होऊन साधारणपणे दोन वर्षे लोटल्यानंतर नवनवे दावे केले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बंद दाराआडच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेवला आहे. देवेंद्र फडणवीसही म्हणाले होते की, आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवेन आणि मी स्वतः दिल्लीला जाईन.

पण त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटे ठरवले, असा दावा त्यांनी केला. अर्थातच, फडणवीस यांनी हा दावा फेटाळला. एकनाथ शिंदे यांनीही बंडाच्यावेळी आपण वसईतील एका चहाच्या टपरीवरून उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा दावा केला आहे. मुळात २०२२ मधील सत्तांतरानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. अर्थातच, लोकांनी त्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. कारण भाजपचा हाच अजेंडा असल्याची दस्तुरखुद्द ‘आरोपतज्ज्ञ’ किरीट सोमय्या यांनी कबुली दिली आहे. समोरचा बडा नेता भाजपमध्ये येत नाही, तोपर्यंत त्याच्याशी संबंधित घोटाळ्याची राळ उडवत राहायचे, असे पक्षादेश होते, असे त्यांनी जाहीरपणे मान्य केले आहे.

यामागचा तर्क मांडताना किरीट सोमय्या यांनी नाहीतर भाजप संपली असती, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे, राजकीय वर्तुळातील प्रत्येक लहान-मोठा नेता, आपण आपल्या अस्तित्वासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगत आहे. पण वास्तवात भ्रटाचारामध्ये एकूण एक नेता बरबटलेला आहे आणि कारवाई करायची झाल्यास सगळे आत जातील.

उमेदवारी अर्ज भरताना या नेत्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून संबंधित नेत्याने पाच वर्षांत घेतलेली ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ हेच दर्शवते. एकूणच, महायुती किंवा महाविकास आघाडीकडून भूतकाळातील घटनांबद्दल करण्यात येणार्‍या दाव्यांशी सर्वसामान्यांना काय देणे घेणे आहे? कविवर्य विंदा करंदीकर यांनी ‘सब घोडे बारा टक्के’ या कवितेत म्हटल्याप्रमाणे ‘तुम्ही तरी काय करणार? आम्ही तरी काय करणार? त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय, जुना माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के!’ एका कार्यक्रमात ही कविता सादर करताना ही कविता अद्याप जिवंत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.

पहिल्या निवडणुकीच्या काळात आपण ही दुर्दैवी कविता तयार केली. वास्तविक प्रासंगिक कविता या संबंधित प्रसंग झाल्यानंतर त्या मरतात, पण ही कविता काही केल्या मरत नाही. म्हणजेच इतक्या वर्षांत इतक्या पक्षांची सरकारे स्थापन झाली, पण सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत तिथेच आहेत, अशी खंत व्यक्त करतानाच, ही कविता मरेल तेव्हा तो भारताचा भाग्य दिवस असेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. आताची राजकीय परिस्थिती पाहता, ही अपेक्षा सर्वसामान्यांचीसुद्धा आहे, हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -