घरसंपादकीयअग्रलेखवड्याचे तेल ‘वागळें’वर !

वड्याचे तेल ‘वागळें’वर !

Subscribe

महाराष्ट्रात भाजपची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर हातातोंडाशी आलेली सत्ता गेली आणि मी पुन्हा येईन, हा दावा सफशेल फोल ठरला. त्यानंतर केंद्रातील आणि राज्यातील भाजप नेत्यांमध्ये काहीही करून आपण गेलेली सत्ता मिळवायला हवी आणि आपली सत्ता ज्यांच्यामुळे गेली त्यांना धडा शिकवायला हवा, अशी भावना पेटून उठली. भाजपला अनपेक्षित असा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यानंतर अडीच वर्षे भाजपने केंद्रातील सत्तेचा वापर करून काय काय केले याची जनता साक्षीदार आहे. भाजपने राज्यात सत्ता आणली, पण त्यांनी लोकांच्या मनातील विश्वासार्हता गमावली, हे त्यांनाही पटलेले आहे. त्यामुळे कुठल्याही स्तरावरच्या निवडणुका असल्या तरी त्या घेण्याचे त्यांना धाडस होत नाही. कारण जर पराभव झाला तर आपली मानहानी होईल, अशी त्यांना भीती वाटते. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका दीर्घ काळ अडकून राहिलेल्या आहेत. खरे तर हा अडथळा दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे हेे केंद्रातील भाजपच्या सरकारचे काम आहे, पण जोपर्यंत भाजपला अनुकूल वातावरण निर्माण होत नाही तोपर्यंत याविषयी फारशी रुची दाखवली जात नाही. भाजपने विरोधात असलेल्या विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेतील नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा कसा लावला, त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे कशी बाहेर काढली आणि ते जेव्हा भाजपमध्ये गेले तेव्हा त्यांची चौकशी कशी थांबवली हे सगळी जनता पाहत आहे. त्यात पुन्हा जिथे भाजपने पोटनिवडणुका घेतल्या तिथे यांना फटका बसल्याचे दिसत आहे.
भाजपचे नेते पक्षाला पार्टी वुईथ डिफरन्स असे सांगत आलेले आहेत, आम्ही इतर पक्षांपेक्षा वेगळे आहोत, असे त्यांचे म्हणणे असते. त्यात पुन्हा राडा संस्कृती हा शब्द तर त्यांच्यासाठी अगदी शिव शिव याच सदरातला आहे. आम्ही विचारांची लढाई विचारांनी देण्यावर विश्वास ठेवतो, असा त्यांचा दावा असतो, असे असताना पुण्यात शुक्रवारी ‘निर्भय बनो’च्या सभेसाठी जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ज्या कारमधून जात होते, तिच्यावर भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शाईफेक केली आणि कारच्या काचा फोडल्या. त्यानंतरही निखिल वागळे यांनी आपले नियोजित भाषण केले. त्यात त्यांचे विचार मांडले. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली. एखादा पत्रकार राजकीय पक्षावर सातत्याने टीका करत असेल तर त्याचा त्या पक्षाच्या नेत्यांना राग येणे सहाजिकच आहे. तो मनुष्य स्वभाव आहे, पण त्याच्यावर हल्ला करणे याचे समर्थन होऊ शकत नाही. कारण तो लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील आघात आहे. पत्रकार आणि राजकीय नेत्यांच्या उडणार्‍या शाब्दिक चकमकी या काही नवीन नाहीत. जेव्हा पत्रकार नेत्यांना गैरसोयीचे प्रश्न विचारतात तेव्हा नेत्यांचा आवाज चढतो. वागळे गेली अनेक वर्षे भाजपवर टीका करताना दिसत आहेत. अलीकडे ते समाज माध्यमांवरून भाजपवर टीका करत असतात, पण आजवर भाजपने कधीही त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला केलेला नव्हता. यापूर्वी त्यांच्यावर हल्ले झाले ते अन्य पक्षाकडून झाले आहेत. त्यामुळेच भाजपच्या त्यातही पुन्हा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी इतके आक्रमक होण्यामागे काही तरी आत खदखदणारे कारण असावे. शेवटी मुख्य नेत्यांच्या भावनाच आपल्या कृतीतून कार्यकर्ते व्यक्त करत असतात. कारण एखादा ज्येष्ठ पत्रकार गाडीत असताना काचा फोडणे हे काही सहज होणारे कृत्य नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना एखाद्या पत्रकाराची आजवर वाटली नाही, ती चिंता आता वाटण्याचे तसे कारण नाही.
भाजपची २०१९ साली गेलेली सत्ता त्यांनी पुन्हा मिळवली. त्यासाठी त्यांनी शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांना आपल्याकडे वळवून महाराष्ट्रात ज्याचा वापर झाला नाही, असा फॉर्म्युला वापरला. पूर्वी एखादा नेता पक्षातून बाहेर पडून दुसर्‍या पक्षात सहभागी होत असे किंवा आपली वेगळी संघटना किंवा वेगळा पक्ष स्थापन करत असे. पण शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर न पडता संख्याबळ आपल्याकडे असल्याचे सांगूून आपल्या नेतृत्वाखाली आहे तीच खरी शिवसेना असा दावा केला. पुढे तशी मान्यता मिळवून घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पक्षाचे मूळ नाव आणि चिन्ह गमवावे लागले. पुढे अजित पवार यांच्याबाबतीतही तसेच झाले. भाजपच्या सोबत एकनाथ शिंदे आले असले तरी त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केलेला नाही. उद्धव ठाकरे यांना निष्प्रभ करण्यासाठी भाजपने शिवसेना भाजपसोबत आणली, पण भाजपला जे मुख्यमंत्रीपद मिळवायचे होते, ते मिळवता आले नाही. केंद्रातून सूत्रे फिरली आणि मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे राज्यातील भाजप नेते नाराज झाले. काळजावर दगड ठेवून ती भावना चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली होती. आता लोकसभा असो नाही तर विधानसभा निवडणूक असो. भाजपसोबत तिकीट वाटपात दोन मजबूत भागीदार आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना पुन्हा त्याग करावा लागणार आहे. पण त्या नेत्यांची अवस्था सोसवत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झालेली आहे. वागळेंवरील हल्ला हा वड्याचे तेल वांग्यावर अशाच प्रकारातला वाटण्यास जागा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -