घरसंपादकीयअग्रलेखशिंदे गटाचा निर्णय मतदारांना ‘पटेल’?

शिंदे गटाचा निर्णय मतदारांना ‘पटेल’?

Subscribe

सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, त्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीकडे. सर्वार्थाने ही निवडणूक महत्वाची आहे. आतापर्यंतच्या पोटनिवडणुकीच्या तुलनेत ही निवडणूक विलक्षण ठरणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे ११ मे २०२२ रोजी निधन झाल्याने अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. जूनमध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी केवळ ठाकरे गट आणि शिंदे गटच आहेत. इतर पक्षांची भूमिका तूर्तास तरी दुय्यमच आहे. अर्थात, दोन्ही गटांच्या नाड्या याच पक्षांकडे आहेत. म्हणूनच ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार्‍या या निवडणुकीत मतदार कोणाला पसंती देतात, हे ६ नोव्हेंबर २०२२ रोजी स्पष्ट होईलच.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर खरी शिवसेना आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने हे दोन्ही तात्पुरत्या स्वरूपात गोठवले. त्यामुळे शिवसेना दोन नावे आणि दोन चिन्हे घेऊन लोकांसमोर आली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या पक्षाला मशाल चिन्ह मिळाले आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह मिळाले आहे. आता अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत दोन्ही पक्ष बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना कोणती आणि तिचे चिन्ह काय आहे, हे मतदारांना कशाप्रकारे पटवून देऊ शकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले असते. पण कालच रात्री ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’ने ही जागा भाजपाला सोडल्याने ही लढत प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपामध्ये रंगणार आहे.

- Advertisement -

खरे तर हे असेच होणार होते, कारण भाजपची खरी टक्कर ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी आहे, शिवसेनेतील शिंदे गट भाजपच्या पंखाखाली आला असला तरी उद्धव ठाकरे हे तसे करायला तयार नाहीत, त्यामुळेच या संघर्षाला अधिक धार चढलेली आहे आणि हा संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चाललेला आहे. या संघर्षाची पुढील काळात काय परिणती होणार आहे, हा राजकीय पंडितांना पडलेला प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या मतदारसंघात हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिंदे गटाचा आहे. मग शिवसेनेकडे असलेला हा मतदारसंघ शिंदे गटाने भाजपाला कसा दिला, असा प्रश्न उपस्थित होतो. शिवसेनेतील अनेकांनी शिंदे गटाचे समर्थन केले असले तरी, मुंबईत मात्र शिंदे गटाला फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघात या गटाचा प्रभावी नेता नाही.

म्हणूनच ही जागा भाजपाला देऊन त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला असावा. त्यानुसार भाजपातर्फे मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुरजी पटेल यांचा या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. ते आधीपासूनच आमदाराकीसाठी उत्सुक आहेत. २०१९ला शिवसेना आणि भाजपाने एकत्रित निवडणूक लढविल्याने हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. त्यामुळे मुरजी पटेल यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यात मुरजी पटेल यांना जवळपास १७ हजार मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. त्यांनी त्यावेळी दुसर्‍या क्रमांकाची मते घेतली. हे ध्यानी घेऊनच भाजपाने त्यांना संधी दिली. आमच्या मागे महाशक्ती आहे, असे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी मुक्कामी स्पष्ट केले होते, हीच महाशक्ती आता अंधेरीत वापरली जाईल यात शंका नाही, कारण भाजपचाच उमेदवार आहे, पण दुसर्‍या बाजूला ठाकरे यांच्या बाजूने जोरदार लोकभावना आहे, हेही नाकारून चालणार नाही.

- Advertisement -

ठाकरे गटाने दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचे जाहीर केले होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार अखेरचा दिवस होता. तरी शेवटपर्यंत त्यांच्या उमेदवारीबद्दल अनिश्चितता कायम होती. मुंबई महापालिकेमध्ये नोकरी करत असलेल्या ऋतुजा लटके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला; पण पालिका प्रशासनाने तो मंजूर न करता लटकवून ठेवला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाचे कान उपटत राजीनामा स्वीकारण्यास सांगितले. त्यानुसार पालिकेने शुक्रवारी सकाळी हा राजीनामा स्वीकारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती पालिकेचे प्रशासन असल्याने हा राजीनामा लकविण्यात आला होता, असे चित्र निर्माण झाले होते.

उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे ऋतुजा लटके यांची बाजू अधिक भक्कम झालेली आहे. कारण पालिका प्रशासनाला म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला न्यायालयाने दिलेली ही दुसरी चपराक आहे. पहिली चपराक यांना शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर अनुमती देण्यावरून मिळाली होती. न्यायालयाच्या या दोन निर्णयांमुळे ठाकरे गटाच्या पंखात बळ भरले आहे. कारण केंद्रीय सत्तेच्या माध्यमातून भाजपने आमच्या लोकांना आमच्यापासून तोडले असले तरी न्यायदेवता आम्हाला न्याय देईल, असे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे भाषणांमधून सांगत असतात. न्यायदेवतेवरील त्यांचा विश्वास त्यांंच्यासाठी खरा ठरत असल्यामुळे त्यांच्या बाजूच्या लोकांचे मनोबल वाढत आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे, आतापर्यंतचे दोन-चार अपवाद वगळता सहानुभूतीच्या लाटेत, मृत लोकप्रतिनिधीच्या पत्नीच्या पारड्यात मतदार कौल देतात, असा इतिहास आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवे नाव आणि मशाल हे नवे चिन्ह यासह निवडणुकीला सामोरे जाणे, हे ठाकरे गटासमोर आव्हान आहे. शिवाय, ही निवडणूक आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची झलकदेखील आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. ही निवडणूक जिंकण्याची जबाबदारी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही पोटनिवडणूक म्हणजे लिटमस टेस्ट ठरणार आहे.

दुसरीकडे, ठाकरे गटाच्या दृष्टीनेही पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची आहे. पालिका आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी किती जोर लावावा लागेल, याचा अंदाज, या निवडणुकीतून येईल. माजी मंत्री आणि विभागप्रमुख अनिल परब यांच्या कार्यक्षेत्रात हा मतदारसंघ येत असल्याने त्यांचाही कस लागणार आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पाठबळ मिळाले आहे. एकूणच ही निवडणूक म्हणजे, नवे चिन्ह, नवा पक्ष, नवा गट याच्याबरोबरच आशिष शेलार विरुद्ध अनिल परब अशी लढत होणार आहे. आता अंधेरी मतदारसंघ मशालीच्या उजेडात उजळणार आहे की, शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपाची उमेदवारी अंधेरीवासीयांना ‘पटेल’, हे लवकरच स्पष्ट होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -