घरसंपादकीयदिन विशेषभारताचे मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम

भारताचे मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम

Subscribe

मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे आणि विकसित भारताचे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मार्गदर्शन करणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे संपूर्ण नाव डॉ.अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाबदीन अब्दुल होते.

त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून नेण्या-आणण्याचे काम करीत असत, परंतु लहान वयातच कलामांचे पितृछत्र हरपले. त्यावेळी त्यांनी वर्तमानपत्रे विकून आणि लहान मोठी कामे करून कुटुंबाला हातभार लावला. त्यांचे बालपण कठीण परिस्थितीतून गेले. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. कलाम यांनी भौतिकशास्त्रात बी. एस्सी पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी चेन्नईमधील इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केला.

- Advertisement -

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाइट लॉचिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला. वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे. सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे त्यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांचा देशातील तरुणाईवर मोठा विश्वास होता. विंग्ज ऑफ फायर, इग्नाईटेड माईंड्स, इंडिया २०२० व्हिजन फॉर न्यू मिलेनियम अशी पुस्तके लिहून विद्यार्थी वर्ग आणि तरुणांना त्यांनी प्रेरणा दिली. अशा या महान वैज्ञानिकाचे २७ जुलै २०१५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -