घरताज्या घडामोडीअतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, 'खोके' सरकारला शेतकऱ्यांची दैना दिसेल काय?; 'सामना'तून शिंदे गटाला...

अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ‘खोके’ सरकारला शेतकऱ्यांची दैना दिसेल काय?; ‘सामना’तून शिंदे गटाला सवाल

Subscribe

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. परिणामी अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. तसेच, शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं आहे.

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. परिणामी अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. तसेच, शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं आहे. या आर्थिक संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने झालेल्या नुकसानाची भरपाई पोळ्यापूर्वी करू असे अश्वासन दिले होते. मात्र, पोळा होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे. “भरपाईच्या नावाखाली कागदी घोडेच नाचवले जात आहेत”, अशी टीका करण्यात आली आहे. तसेच, पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत आणि कटकारस्थानात अडकून पडलेल्या ‘खोके’ सरकारला शेतकऱ्यांची ही दैना दिसेल काय?”, असा सवाल शिंदे सरकारला सामनातून विचारण्यात आला आहे.

यंदाचा पावसाळा राज्यातील शेतकऱ्यांच्या मुळावरच उठला आहे. आधी जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने शेती बरबाद केली. या धक्क्यातून शेतकरी अजून सावरले नसतानाच आता परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांचा मोठाच घात केला. गेले 10-12 दिवस राज्याच्या सर्वच भागांत पावसाचे धुमशान सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिह्यांमध्ये पावसाने भयंकर धुमाकूळ चालवला आहे. पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीतून जी काही थोडीफार पिके वाचली होती ती आता हाता-तेंडाशी आली होती. मात्र, सुगीचा हंगाम सुरू झाला असतानाच राज्यभर सर्वत्रच ढगफुटीसारखा पाऊस सुरू झाला आणि पुन्हा एकदा होत्याचे नव्हते झाले.

- Advertisement -

राज्यात यंदा सर्वाधिक पेरा झाला तो सोयाबीनचा. मात्र सोयाबीनचे हेच पीक आता पुरते नष्ट झाले आहे. परतीचा पाऊस एरवी रब्बी हंगामासाठी तसा उपयुक्त ठरत असतो. पण यंदा तो विध्वंसक बनून आला. परतीच्या सरी एक-दोन दिवस कोसळतील आणि पाऊस निरोप घेईल असे वाटत होते, मात्र निसर्गाच्या लहरीपणाने कहरच केला. सलग दुसऱ्या आठवडय़ातही सातत्याने पाऊस सुरूच आहे. पुन्हा पावसाचे थैमानही इतके राक्षसी आहे की शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. सततच्या या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शेतात पाऊलही ठेवता येत नाही. डोळ्यासमोर शेतातील पिकांची नासाडी होत असताना मिळेल ते वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पाऊल ठेवले तरी गुडघाभर चिखलात पाय रुतून बसत असल्याने शेतकरी वर्गावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. ही भयंकर स्थिती विदर्भ, मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्यांत दिसते आहे.

शेतात उभ्या असलेल्या आणि कापणीला आलेल्या पिकांचे जे अतोनात नुकसान डोळ्यासमोर दिसते आहे ते शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहे. सरकार म्हणते शेतीचे उत्पन्न दुप्पट करा, आत्मनिर्भर बना; पण निसर्गाने शेती जगूच द्यायची नाही असे ठरवले असेल तर शेतकरी उभा तरी कसा राहणार? विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी कापूस आणि सोयाबीन ही प्रमुख नगदी पिके आहेत. मात्र ही दोन्ही पिके या पावसात बरबाद झाली आहेत. नवरात्रीनंतर सोयाबीन कापणी व सोंगणीसाठी तयार असतो, पण पाऊस एक दिवसाचीही उघडीप देत नसल्यामुळे तयार झालेला सोयाबीन शेतात सडत पडला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची थोडी आधी लागवड केली त्यांनी सोयाबीनचे भारे बांधून शेतात त्याचा ढिगारा उभा केला होता. हे कापून ठेवलेले सोयाबीनचे ढिगारेही पावसात भिजत आहेत. पावसात भिजल्यामुळे सोयाबीन काळा पडतो आणि त्याची प्रतवारी कमी होऊन भावही तुटपुंजा मिळतो.

- Advertisement -

शेतकऱ्यांनी यंदा सर्वाधिक लागवड सोयाबीनची केली आणि आज परिस्थिती अशी आहे की, 75 टक्के सोयाबीन उद्ध्वस्त झाले आहे. जे काही 25 टक्के सोयाबीन शेतकऱ्यांच्या हाताला येईल त्यालाही मातीमोल भाव मिळाला तर वर्षभर मेहनत करून शेतकऱ्यांच्या हातात पडणार तरी काय? लागवडीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कापसाची गतही सोयाबीनसारखीच झाली आहे. कापसाची बोंडे परिपक्व होण्याचा हा हंगाम. मात्र एक दिवसही उसंत न घेणाऱ्या पावसामुळे कपाशीची बोंडे झाडावरच सडू लागली आहेत. जी कापूस बोंडे फुटून वेचणीला आली होती त्याच्या शेतातच वाती झाल्या आहेत. आजवर कधीही झाली नाही अशी दैना यंदाच्या पावसाने शेतकऱ्यांची केली आहे.

आधी मान्सूनला विलंब झाला म्हणून दुबार पेरणीवर खर्च करावा लागला. त्यानंतर ढगफुटीसारखा पाऊस होऊन अनेक वर्षे खपून संगोपन केलेली शेती पुराच्या पाण्याने खरवडून नेली. हाहाकार माजवणाऱ्या पावसाने यंदा शेतांमध्ये पिकांपेक्षा अधिक तणच माजले. त्यासाठी तणनाशक आणि मजुरीवरही दरवर्षीपेक्षा दुपटीहून अधिक खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. त्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तेंडाशी आलेला उरलासुरला घासही हिरावून घेतला. मूग, उडीद गेले आणि ज्या पिकांवर सर्वाधिक भिस्त होती ते सोयाबीन व कापूसही हातचे गेले. आता वर्षभराचा शेतीचा खर्च कसा करायचा आणि जगायचं कसं, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे.

पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई कुठल्याही परिस्थितीत पोळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू अशी गर्जना राज्यातील ‘मिंधे’ सरकारने केली होती. पोळा होऊन आता दीड महिना झाला तरी अजून कागदी घोडेच नाचवले जात आहेत. त्यात आता परतीच्या पावसाने शेतमालाची जी प्रचंड नासाडी झाली त्यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत आणि कटकारस्थानात अडकून पडलेल्या ‘खोके’ सरकारला शेतकऱ्यांची ही दैना दिसेल काय?


हेही वाचा – जी. एन. साईबाबा प्रकरणात हायकोर्टाच्या निर्णयाला सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -