Maharashtra Assembly Election 2024
घरसंपादकीयदिन विशेषश्रेष्ठ नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल

श्रेष्ठ नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल

Subscribe

रुक्मिणीदेवी अरुंडेल भरतनाट्यम या प्रकारातील एक श्रेष्ठ नर्तिका होत्या. त्यांचा जन्म २९ फेब्रुवारी १९०४ रोजी मदुराई येथे झाला. त्यांना नृत्याची प्रेरणा पाव्हलॉव्ह या रशियन नर्तिकेकडून मिळाली. तिच्याकडून त्यांनी पाश्चात्त्य बॅले नृत्याचे शिक्षण घेतले. नंतर मीनाक्षिसुंदरम् पिळ्ळै यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम्चे अध्ययन केले. भरतनाट्यम्च्या पुनरुज्जीवनात रुक्मिणीदेवींचा मोठा हातभार होता.

त्यांनी खेडोपाडी जाऊन अनेक नृत्यशिक्षकांकडून या नृत्यप्रकारासंबंधी माहिती गोळा केली. ज्या काळी समाजात नृत्यास प्रतिष्ठा नव्हती, त्या काळी त्यांच्यासारख्या सुसंस्कृत उच्चभ्रू कुटुंबातील स्त्रीने त्या क्षेत्रात पदार्पण करावे, ही घटनाच अपूर्व होती. शरीराची लवचिकता, लयीविषयीची जाण व हालचालींतील आकर्षकता यामुळे त्यांच्या नृत्यांना वैशिष्ठ्यपूर्णता लाभली. नृत्याकडे त्यांनी श्रद्धेने व बुद्धिवादी दृष्टीने पाहिले.

- Advertisement -

शास्त्रोक्त संगीत, नृत्यनाट्ये यातही त्यांनी विशेष प्रावीण्य संपादले होते. कुमारसंभव, शाकुंतल, तसेच कुट्राल कुरवंजि, कण्णपर कुरवंजि, श्यामा, आंडाळ, रामायण (६ भाग) इत्यादी नाट्ये, नृत्यनाट्ये त्यांनी सादर केली व त्यांच्या संगीतरचनाही केल्या. त्यांनी अड्यार येथे ‘कलाक्षेत्र’ या संस्थेची स्थापना केली (१९३६). थिऑसॉफीतही त्यांना रुची होती. ‘बेझंट थिऑसॉफिकल हायस्कूल’च्या संस्थापनेस (१९३४) व संवर्धनास त्यांनी सक्रिय मदत केली.

राज्यसभेच्या सभासद म्हणून १९५२ व १९५६ मध्ये त्यांची नेमणूक झाली. त्यांनी ‘इंडियन व्हेजिटेरियन काँग्रेस’ची १९५७ मध्ये स्थापना केली. शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी कार्य केले. पद्मभूषण (१९५६), संगीत नाटक अकादमीचे नृत्यविषयक पारितोषिक (१९५७), अमेरिकेच्या वेन स्टेट विद्यापीठाकडून मानव्यविद्यांतील ‘डॉक्टरेट’ (१९६०), कोलकात्याच्या रवींद्रभारती विद्यापीठाची डी. लिट. (१९७०) यांखेरीज ‘प्राणिमित्र’ पारितोषिक, भरतनाट्यम्साठी राष्ट्रपती पारितोषिक आदी मानसन्मानही त्यांना लाभले. अशा या श्रेष्ठ नर्तिकेचे २४ फेब्रुवारी १९८६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -