घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

सावरी वाढिन्नल्या सरळा । वरी फळ ना आंतु पोकळा । कां स्तन जाले गळां । शेळिये जैसें ॥
शेर जरी सरळ वाढला, तरी तो जसा आत पोकळ असून वर फळही येत नाही किंवा शेळीच्या गळ्याला उत्पन्न झालेल्या स्तनातून जसे दूध निघत नाही.
तैसें मूर्खांचें तयां जियालें । आणि धिग कर्म तयांचें निपजलें । जैसें साबरी फळ आलें । घेपे ना दीजे ॥
किंवा सांबरीच्या झाडाला फळ आले असता ते जसे कोणाला घेता येत नाही देताही येत नाही, त्याप्रमाणे त्या मूर्खाचे जिणे होय आणि त्यांच्या केलेल्या कर्मालाही धि:कार असो!
मग जें कांहीं ते पढिन्नले । तें मर्कटें नारेळ तोडिले । कां आंधळ्या हातीं पडिलें । मोतीं जैसें ॥
मग त्या मूर्खांनी जे काही शास्त्राध्ययन केले असेल, ते म्हणजे माकडाने नारळ तोडल्याप्रमाणे किंवा आंधळ्याला मोती सापडावे त्याप्रमाणे होय.
किंबहुना तयांचीं शास्त्रें । जैशीं कुमारीहातीं दिधलीं शस्त्रें । कां अशौच्या मंत्रें । बीजें कथिलीं ॥
किंबहुना त्यांनी अध्ययन केलेली शास्त्रे, लहान मुलीच्या हातात दिलेल्या शस्त्राप्रमाणे अथवा अशुचिर्भूताला बीजासह शिकविलेल्या मंत्राप्रमाणे अनर्थकर होत.
तैसें ज्ञानजात तयां । आणि जें कांहीं आचरलें गा धनंजया । तें आघवेंचि गेलें वायां । जें चित्तहीन ॥
धनंजया, त्याचप्रमाणे ज्यांचे चित्त त्यांच्या स्वाधीन नाही, त्यांचे बाकीचे सर्व ज्ञान आचरणही व्यर्थ होत.
पैं तमोगुणाची राक्षसी । जे सद्बुद्धीतें ग्रासी । विवेकाचा ठावोचि पुसी । निशाचरी जे ॥
याप्रमाणे तमोगुणरूप राक्षसी सद्बुद्धीला घेरून ज्ञानाचा ठावठिकाण नाहीसा करणारी जखीण आहे.
तिये प्रकृती वर पडे जाले । म्हणौनि चिंतेचेनि कपाटें गेले । वरि तामसीयेचिये पडिले । मुखामाजीं ॥
त्या प्रकृतीने जे ग्रस्त होतात, ते सदोदित चिंताक्रांत असून शिवाय तामस प्रकृतीच्या आयतेच घशात उतरतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -