घरसंपादकीयदिन विशेषसमाजसेविका पंडिता रमाबाई

समाजसेविका पंडिता रमाबाई

Subscribe

समाजसेविका पंडिता रमाबाई यांचा आज स्मृतिदिन. पंडिता रमाबाई म्हणजे स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्या, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेल्या महाराष्ट्रीय विदुषी होत्या. त्यांचा जन्म २३ एप्रिल १८५८ रोजी मंगलोरजवळ माळहेरंजी येथे राहणार्‍या अंबाबाई आणि अनंतशास्त्री डोंगरे या दाम्पत्यापोटी झाला. अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते.

स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. रमाबाईंना त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. तसेच रमाबाई ९ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले. आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे सर्व मुलांना घेऊन तीर्थयात्रेला पायी निघावे लागले. या तीर्थयात्रेच्या १५-१६ वर्षांच्या कालखंडात रमाबाईंना आई-वडिलांपासून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले.

- Advertisement -

रमाबाईंनी संस्कृतमध्ये तर प्रावीण्य मिळविले होतेच; पण मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड भाषाही त्या अस्खलितपणे बोलू शकत होत्या. १८७८ साली त्यांचे बंधू श्रीनिवासशास्त्री यांच्यासह प्रवास करीत त्या कोलकात्याला आल्या. तेथे मात्र त्यांच्या विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा उचित गौरव झाला. कोलकात्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणार्‍या रमाबाई या आज एकमेव महिला होत.

बंगाली स्त्रियांनीही त्यांना ‘भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण’ म्हणून मानपत्र दिले. बाल-विवाह, पुनर्विवाहास बंदी इत्यादी घातक चालीरीती व दुष्ट रुढी यांतून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी याठिकाणी ‘आर्य महिला समाजा’ची स्थापना केली. स्त्रीधर्मनीति (१८८२) हे पुस्तक त्यांनी लिहिले. अत्यंत बुद्धिवान असलेल्या रमाबाईंचे अंतःकरण अत्यंत उदार व दीनदुबळ्या स्त्रियांकरिता सतत तळमळणारे होते. अशा या महान समाजसेविकेचे ५ एप्रिल १९२२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -