घरसंपादकीयओपेडमाघारीची धूर्त चाल की उशिरा सुचलेले शहाणपण?

माघारीची धूर्त चाल की उशिरा सुचलेले शहाणपण?

Subscribe

उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा तसेच मराठी माणसाच्या एकजुटीचा पूर्वी मिळत असलेला कोणताही लाभ एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडानंतर मिळू नये यासाठीच अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून भाजपने अत्यंत चलाखपणे आणि धूर्तपणे माघार घेतली आहे, पण हे शहापण इतके उशिरा का सूचले हाही एक गूढ प्रश्न आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय घडामोडीचे नेमक्या शब्दात वर्णन करायचे झाले तर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आजच्यापेक्षाही उद्यासाठी घनघोर संघर्ष आहे. उद्धव ठाकरे यांचा हा संघर्ष केवळ भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाशी नाही तर राज ठाकरे यांच्या मनसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशीदेखील आहे. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा तसेच मराठी माणसाच्या एकजुटीचा पूर्वी मिळत असलेला कोणताही लाभ एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडानंतर मिळू नये यासाठीच अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून भाजपने अत्यंत चलाखपणे आणि धूर्तपणे माघार घेतली आहे, पण हे शहापण इतके उशिरा का सूचले हाही एक गूढ प्रश्न आहे.

सध्या मुंबईसह राज्याच्या राजकीय घडामोडीमध्ये अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक विविध कारणांमुळे गाजत आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतरची ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असल्याने शिवसेनेपेक्षाही अन्य राजकीय पक्षांना या पोटनिवडणुकीतील घडामोडींकडेही अत्यंत बारीक लक्ष ठेवावे लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे तब्बल 40 आमदार फोडून उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदच खेचून घेतलेले भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेतील धूर्त नेते उद्धव ठाकरे यांना एक आमदार असा सहजासहजी बिनविरोध निवडून द्यायला बसलेले नाहीत हे कोणीही सहजपणे ओळखेल. मग असे असतानादेखील भाजप नेत्यांनी आधी उमेदवार देऊन त्यानंतर मग मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर आपला उमेदवार मागे घेतल्याची केलेली घोषणा यामागे केवळ शिवसेनेचे दिवंगत आमदार स्वर्गीय रमेश लटके यांच्याबाबतची सहानुभूती आहे असे म्हणणे हे काहीसे चुकीचे ठरेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांना मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये जो काही सकारात्मक प्रतिसाद सर्वसामान्य जनतेकडून तसेच निष्ठावंत शिवसैनिकांकडून मिळत आहे तो लक्षात घेता अंधेरीची पोटनिवडणूक जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकली तर त्याचे अत्यंत विपरीत परिणाम भाजपा बरोबरच मनसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेवर होण्याची शक्यता लक्षात घेऊनच तूर्त भाजप आणि शिंदे गटाने अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या माध्यमातून कौशल्याने टाळली आहे.

- Advertisement -

तसेच की माघार घेण्यामागे उद्धव ठाकरे यांना मैदानी पाठबळ मिळू नये याची पुरेपूर काळजी भाजपने घेतली आहे. ही काळजी केवळ भाजपसाठी नव्हे तर शिंदे गट आणि मनसे या अन्य दोन शिवसेनेची संबंधित असलेल्या राजकीय पक्षांसाठीदेखील आहे.2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अंधेरी पूर्वची जागा शिवसेना-भाजप युती असल्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे त्यावेळी भाजपचे तेथील इच्छुक उमेदवार मुरजी पटेल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढवली आणि जरी त्यांना शिवसेनेच्या रमेश लटके यांच्याकडून पराभूत व्हावे लागले तरीदेखील पटेल यांना क्रमांक दोनची मते मिळाली होती हेदेखील दुर्लक्षित करून चालणार नाही. महाराष्ट्रात आणि देशात 1989 पासून शिवसेना आणि भाजप या दोन राजकीय पक्षांची युती आहे. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकांचा याला अपवाद आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळची देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदी या पंचाक्षरी मंत्राची प्रचंड लाट उसळली होती. नरेंद्र मोदी यांचीही लाड जशी देशात होती तशी ती महाराष्ट्रातदेखील होती. या मोदी लाटेचा लाभ जर महाराष्ट्रातील भाजपला करून घ्यायचा असेल तर शिवसेनेची फारकत घेतल्याशिवाय भाजपला त्यावेळी अन्य कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळेच भाजपने 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवली मात्र स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे मनसुबे मात्र काही यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यामुळे अखेरीस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या बिनशर्त पाठिंब्यानंतर देखील परंपरागत आणि नैसर्गिक युती असलेल्या शिवसेनेला राज्यातील सरकारमध्ये सामील करून घेतले होते.

2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळची राजकीय परिस्थिती पुन्हा भिन्न होती. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या शिवसेनेची युती करून लढवल्या. त्यामुळे सहाजिकच महाराष्ट्रातून भाजपचे 22 तर शिवसेनेचे तब्बल 18 खासदार लोकसभेवर निवडून गेले. आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला 106 तर शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळवता आला त्यामुळे राज्यातील जनतेने सरकार बनवण्यासाठी भाजप शिवसेना युतीला पूर्णपणे कौल दिला होता. मात्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर अडून बसले आणि भाजपची पंचाईत झाली. त्यानंतर शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेस यांच्याबरोबर राष्ट्रवादीची एकत्र मोट बांधत उद्धव ठाकरे यांनाच थेट राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवले हा इतिहास सर्वश्रुत आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भाजपातील महाराष्ट्रातील नेत्यांना तर बसलाच मात्र त्याच बरोबर तो केंद्र सरकारलाही जाणवला. देवेंद्र फडणवीस यांच्या हातात तोंडाशी आलेले मुख्यमंत्रीपद हे केवळ उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे गेले. भाजपची महाराष्ट्रातील सत्ता तर गेलीच मात्र त्याहीपेक्षा अधिक सल जर कोणती भाजपला असेल तर ती म्हणजे महाराष्ट्रातील मृत्युपंथावर आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याचे काम भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने केले. हे सर्व सविस्तरपणे सांगण्यामागचे प्रयोजन म्हणजे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून म्हणजेच अर्थात राज्यातील सत्तेवरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पायउतार झाल्यापासून ज्या काही विलक्षण राजकीय घडामोडी घडत आहेत त्याची पाळेमुळे ही शिवसेना आणि भाजप यांच्या यापूर्वीच्या अंतर्गत संघर्षात दडलेली आहेत. अंधेरी पूर्वची विधानसभा पोटनिवडणूक गाजवण्याचे खर्‍या अर्थाने काम हे पडद्याआडून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेच केले. स्वर्गीय रमेश लटके यांच्या पत्नीला अर्थात ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते, मात्र त्या मुंबई महापालिकेत सेवेत होत्या. मुंबई महापालिका कारभारावर मुख्यमंत्री म्हणून थेट एकनाथ शिंदे यांचे नियंत्रण असते अशावेळी ऋतुजा लटके यांच्या राजीनामा मंजुरी वरूनही मोठे राजकारण झाले. ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार असू नयेत याचे पुरेपूर प्रयत्न भाजपाने पडद्याआडून केले. आणि त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाठबळ मिळाले. मात्र विषय हायकोर्टात गेला आणि ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग अखेर हायकोर्टाच्या आदेशानंतर मोकळा झाला. खरे तर इथेच या पोटनिवडणुकीचा निकाल लागला होता. मात्र अंधेरी पूर्वची विधानसभा पोटनिवडणूक जर भाजपने लढवली नसती तर सामान्य जनतेमध्ये वेगळाच संदेश गेला असता आणि तसाच चुकीचा संदेश सर्वसामान्यांमध्ये जाऊ नये याची काळजी घेण्यासाठीच भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुरजी पटेल यांना भाजपकडून उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले.

- Advertisement -

मात्र शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरची ही पहिलीच विधानसभेची पोटनिवडणूक असल्यामुळे निवडणुकीच्या मैदानात जर उद्धव ठाकरे यांचा विजय झाला असता तर मुंबईसह राज्यामध्ये एकटे उद्धव ठाकरे हे भाजप तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पुरून उरले असा संदेश गेला असता. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बरोबर असलेल्या शिवसैनिकांचे मनोधैर्य यामुळे अधिक उंचावले असते. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले कुंपणावरील लोकप्रतिनिधी की जे भाजप शिंदे गट अथवा मनसेमध्ये जाऊ शकतात त्यांना अचानक ब्रेक लागला असता. अत्यंत प्रतिकूल आणि अडचणीत असलेल्या उद्धव ठाकरे यांना या माध्यमातून मिळणारा दिलासादेखील मिळू नये ही खरे तर त्यांच्या राजकीय विरोधकांची यामागची खरी रणनीती आहे असे म्हटल्यास ती अतिशोयोक्ती ठरू नये. शिवसेनेतून तब्बल 40 आमदार बाहेर पडल्यानंतरदेखील मुंबईतील मराठी मतदारांची सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे असे जे चित्र भाजपने अंधेरी पूर्वची निवडणूक लढवल्यामुळे निर्माण होऊ शकले असते ते भाजप मनसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिक धोकादायक होते.

मात्र भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप नेत्यांच्या या गोष्टी हळूहळू लक्षात आल्या. तसाही भाजप हा राष्ट्रीय आणि एका शिस्तीने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे एकदा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आणि त्यातही समोर शिवसेनेचा उमेदवार तोही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार समोर असताना भाजपने माघार घेणे हे म्हणजे अत्यंत अपमानास्पद ठरले असते. मात्र अशा गुंतागुंतीच्या अवस्थेत सन्मानजनक तोडगा कसा काढावा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रातील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी शिकण्यासारखे आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्री आणि कनिष्ठ संबंध हे सर्वश्रुत आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्वची विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत जे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले ते राजकीय वर्तुळात धक्कादायक वाटत असले तरी ते काहीसे अपेक्षितच होते. धक्कादायक यासाठी की जेव्हा स्वर्गीय रमेश वांजळे यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली होती तेव्हा वांजळे हे मनसेचे आमदार असतानादेखील राज ठाकरे यांनी त्यांच्या रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक बिनविरोध होण्याबाबत त्यावेळी कोणतीही मागणी केली नव्हती. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जर खरोखरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मनातून सहानुभूती असती तर त्यांनी मनसेचा पाठिंबा थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देऊन टाकला असता. कारण भाजपचा उमेदवार हा रिंगणात होता. मात्र कुशाग्र बुद्धीच्या राज यांनी असे काहीही न करता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून भाजपने अंधेरी पूर्वची निवडणूक लढवू नये, असे आवाहन केले. अगदी थोडक्यात बोलायचे झाल्यास ऋतुजा लटके यांच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदानातून मिळणारी सहानभूती तसेच मुंबईतील अंधेरीसारख्या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मराठी उमेदवाराचा होणारा विजय हा मुंबईचा महाराष्ट्रातील मराठी मतदारांचे ध्रुवीकरण करण्यास कारणीभूत ठरू शकला असता तसे होऊ नये आणि त्याचा कोणताही लाभ अथवा श्रेय उद्धव ठाकरे यांना मिळू नये याकरता राज ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपचा उमेदवार मागे घेण्याचे आवाहन केले याला यामुळेच अत्यंत महत्त्व आहे.

या सर्व राजकीय घडामोडीचे थोडक्यात आणि नेमक्या भाषेचे वर्णन करायचे झाले तर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आजच्या पेक्षाही उद्यासाठी घनघोर संघर्ष आहे. उद्धव ठाकरे यांचा हा संघर्ष केवळ भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाशी नाही तर राज ठाकरे यांच्या मनसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशीदेखील आहे. आणि उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा तसेच मराठी माणसाच्या एकजुटीचा पूर्वी मिळत असलेला कोणताही लाभ एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडानंतर मिळू नये यासाठीच अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून भाजपने अत्यंत चलाखपणे आणि धूर्तपणे माघार घेतली आहे. पण हे शहापण इतके उशिरा का सूचले हाही एक गूढ प्रश्न आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ऋतुजा लटके या जरी आमदार म्हणून निवडून येणार असल्या तरी जनमानसात याचे श्रेय उद्धव ठाकरे यांना न जाता ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडेच कसे जाईल याचीदेखील काळजी या निमित्ताने घेतली गेली आहे, एवढे जरी लक्षात घेतले तरी खूप झाले असे म्हणता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -