घरसंपादकीयओपेडएकमेकांना दूषणं देऊन प्रदूषण कसं थांबणार?

एकमेकांना दूषणं देऊन प्रदूषण कसं थांबणार?

Subscribe

प्रदूषण केवळ हवेमुळे होतंय असे नाही. ध्वनी, जल प्रदूषणही आहे. जंगल माफियांकडून, तसेच तथाकथित विकासाच्या नावाखाली वन संपत्तीचा नाश केला जात आहे. यामुळे प्रदूषण वाढण्यास आयता हातभार लागत आहे. प्रदूषण ही फक्त भारताची समस्या नाही, तर जागतिक समस्या आहे. गरीब आणि विकसनशील देशांना याचा फटका सर्वाधिक बसत आहे. श्रीमंत देश विविध प्रकारच्या प्रदूषणाला हातभार लावत असल्याचा थेट आरोप अलिकडे इजिप्त येथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत केला गेला. एकमेकांना दूषणं देऊन प्रदूषण कसं थांबणार, त्यावर गांभीर्याने कृती करण्याची गरज आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधील प्रदूषणाची सर्वाधिक चर्चा आहे. तेथील प्रदूषणात इतकी भयंकर वाढ झाली की शाळांना सुट्टी देण्याबरोबर अनेक चाकरमान्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले. दिल्लीभोवती प्रदूषणाचा विळखा घट्ट झालेला असताना काही दिवसांपूर्वी एक बातमी आली की दिल्लीपेक्षा अधिक प्रदूषण मुंबईत आहे. तसे मुंबई आणि प्रदूषण यांचे नाते बरेचसे घट्ट आहे. लाखोंच्या संख्येत असणारी छोटी-मोठी वाहने, विकासकामांसाठी होणार्‍या खोदाईमुळे उडणारा धुरळा अशी एक ना अनेक कारणे या प्रदूषणामागे आहेत. प्रदूषण वाढले की त्यावर चर्चा केली जाते, ज्यातून फलनिष्पत्ती शून्य असते. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कठोर नियमांची आणि त्यांच्या अंमलबजावणीची मोहीम तीव्र होण्याची नितांत गरज आहे. प्रदूषणाचा दुष्परिणाम थेट शारीरिक व्याधी निर्माण करीत असल्याने प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी जनजागृतीचीही आवश्यकता आहे.

प्रदूषण केवळ हवेमुळे होतंय असे नाही. ध्वनी, जल प्रदूषणही आहे. जंगल माफियांकडून, तसेच तथाकथित विकासाच्या नावाखाली वन संपत्तीचा नाश केला जात आहे. यामुळे प्रदूषण वाढण्यास आयता हातभार लागत आहे. प्रदूषण ही फक्त भारताची समस्या नाही, तर जागतिक समस्या आहे. गरीब आणि विकसनशील देशांना याचा फटका सर्वाधिक बसत आहे. श्रीमंत देश विविध प्रकारच्या प्रदूषणाला हातभार लावत असल्याचा थेट आरोप अलिकडे इजिप्त येथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत केला गेला. हवामानातील बदलाला विकसित, श्रीमंत राष्ट्रांना जबाबदार ठरविण्यात येऊन हवामान बदलासाठी गरीब देशांना फंड देण्याची मागणी लावून धरण्यात आली आणि त्यात यशही आले. याला अमेरिकेसारख्या बड्या राष्ट्राने विरोध केला. कारण हवामान बदलामुळे झालेल्या नुकसानीला या राष्ट्रांना कायदेशीररित्या जबाबदार धरले जाणार आहे.

- Advertisement -

विकासाच्या नावाखाली सर्वच ठिकाणी नंगानाच सुरू आहे. यासाठी निसर्गाला आव्हान देण्याचे भलते धाडस केले जात आहे. यातून निसर्गाचा समतोल बिघडला असून, त्याचा परिणाम ॠतुचक्र बदलण्यावर झाला आहे. लांबणारा पाऊस, भाजून काढणारा उन्हाळा आदी त्याचीच लक्षणे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील शास्त्रज्ञ निसर्गाला ओरबाडण्याच्या मानवी प्रवृत्तीवर उघडपणे नाराजी व्यक्त करून जगाने परिणाम भोगण्यास तयार रहावे असा इशारा देत आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अकस्मात उद्भवणारी हिमवादळे, भूस्खलन, हिमनग वितळण्यास सुरुवात होणे, समुद्रातील पाणी पातळी हळूहळू वाढणे हे निसर्गाचे संतुलन बिघडल्याची लक्षणे आहेत. एका निष्कर्षानुसार जगभरातील ५० कोटी बालकांना प्रदूषणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फटका बसत आहे. भविष्यात हा आकडा दोन अब्जांच्या पुढे जाण्याची साधार भीतीही व्यक्त केली गेली आहे.

भारतात दिल्ली, मुंबई, कोलकाता यासारख्या बड्या महानगरांमध्ये प्रदूषण वाढले की त्याची चर्चा होते. दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी प्रदूषणाची पातळी भयावहरित्या वाढलेली होती. दिल्लीला खेटून असलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा आदी राज्यातील सीमांवर जाळण्यात येणारा कचरा दिल्लीसाठी डोकेदुखी ठरत असतो. तसेच शेतीमधील जाळकाम हेही धूर निर्माण होण्यास मदत करत असते. दिवसभर धुक्यासारखे वातावरण राहिल्याने दिल्ली अस्वस्थ असल्याचे देशाने पाहिले. याकरिता तेथील सरकारने वाहनांच्या वापरावर निर्बंध आणण्यापासून ते शाळा बंद ठेवण्यापर्यंत, कर्मचार्‍यांना घरून काम करू देण्यास सांगण्यापर्यंत कार्यवाही केली. असे म्हणतात की त्यावेळी प्रदूषित हवेचा त्रास झालेल्या नागरिकांनी रुग्णालयात हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. श्वसनाचे विकार, खोकला, अन्नपचन धड न होणे अशा व्याधी झालेले ते रुग्ण होते. यात अर्थातच लहान मुलांची संख्या लक्षणीय होती. वाहनांमुळे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होत असल्याने सीएनजी, इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर येत असली तरी पारंपरिक वाहनांच्या तुलनेत त्यांची संख्या खूपच कमी आहे. पेट्रोल, डीझेलवर चालणार्‍या वाहनांतून होणारे प्रदूषण दखल घेण्याजोगे आहे. देशाच्या राजधानीतील बिघडलेले वातावरण चिंता करायला लावणारे आहे.

- Advertisement -

दिल्लीप्रमाणेच मुंबईतील प्रदूषण कायम चिंतेची बाब राहिलेली आहे. वाहनांचा विषारी धूर, जागोजागी सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेत वाढलेले धुलीकणांचे प्रमाण, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा दर्जा खालावलेला असणे यामुळे प्रदूषणाचा विळखा या महानगरीभोवती कायम पडलेला असतो. शहरात सीएनजीवरील वाहनांचे प्रमाण वाढलेले असले तरी त्याने लगेचच प्रदूषण कमी झाले असे काही नाही. बांधकामांमुळे धुळीचे लोट हवेत जात असल्याने त्याचाही त्रास नागरिकांना होतो. अनेक ठिकाणी एक प्रकारचे कोंदट वातावरण झालेले पहावयास मिळते. प्रदूषणाचा टक्का वाढला असला तरी ही बाब कधीच गांभीर्याने घेतली जात नाही. तज्ज्ञांनी हवामान बिघडल्याचा इशारा द्यायचा आणि आपण तो हसण्यावारी न्यायचा असे चालले आहे. मुंबईप्रमाणे पुणे, नागपूर, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, कोल्हापूर या आणि अशा मोठ्या शहरांतून प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. भावी पिढीच्या दृष्टीने धोकादायक अशी ही बाब असली तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही. वाहनांची संख्या बेसुमार वाढत आहे. एका कुटुंबाकडे किती वाहने असावीत याला धरबंध नाही. कोरोना काळात रस्त्यांवर शुकशुकाट असे तेव्हा सहजपणे मोकळा श्वास घेता येत होता. निर्बंध उठताच पुन्हा एकदा धुराचे आणि धुळीचे साम्राज्य निर्माण झाले.

जुळी मुंबई असलेल्या नवी मुंबईतील हवामानही चिंता वाढविणारे आहे. मुंबईपेक्षा नवी मुंबईतील हवेचा दर्जा खालावलेला आढळून येत आहे. प्रदूषणाची पातळी या सुनियोजित शहरासाठी गंभीर बाब आहे. आजुबाजूला असलेली कारखानदारी प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. कारखाने आले की आजुबाजूला गावे वसतात आणि त्याची पुढे शहरे होतात. तर काही वेळेला शहरांना खेटून कारखान्यांना परवानगी देण्याचा उपद्व्याप केला जातो. रासायनिक कारखानदारी कोकणासाठी घातक ठरली असली तरी नवी मुंबईप्रमाणे इतरत्र ती फोफावली आहे. या कारखानदारीमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. जीवनदायीनी असणार्‍या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. कारखान्यांतील सांडपाणी प्रक्रिया करूनच नंतर मग नदी, खाडी किंवा समुद्रात सोडण्यात येणे बंधनकारक असताना कित्येक ठिकाणी त्याचे सर्रासपणे उल्लंघन झालेले आढळून येते. रायगड जिल्ह्यातील कासाडी, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री या नद्यांना रासायनिक प्रदूषणाचा मोठा तडाखा बसलेला आहे. यापैकी काही ठिकाणी पूर्वी मोठ्या प्रमाणावर मच्छीमारी होत असे. आता ती बंद झाली असून, काही ठिकाणी माशांना रसायनाचा उग्र दर्प येत असल्याच्या तक्रारी वारंवार झाल्या आहेत. या रासायनिक प्रदूषणाकडे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे झालेले दुर्लक्ष नेमके कशामुळे, याचा ‘अर्थ’बोध अनेकांना झालेला नाही.

विकासासाठी काय वाट्टेल ते, अशी सध्या परिस्थिती आहे. इमारतींची बांधकामे करताना अडथळे ठरणारे डोंगर कापले जात आहेत, तर काही डोंगरांची माती भरावासाठी आणली जात आहे. वनांची होणारी निर्दयी कत्तल अनेक गहन प्रश्न निर्माण करीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे दाखविता येतील की तेथे घनदाट जंगले अस्तित्वात होती असे कुणाला सांगितले तर चटकन विश्वास बसणार नाही. जंगले कुरतडण्यासाठी सरळ आगी लावल्या जात आहेत, ज्याला आपण वणवा म्हणतो. वणवे प्रतिबंधात्मक योजना फक्त भाषणांपुरत्या मर्यादित आहेत.

नतद्रष्ट मंडळी डोंगर पेटवून देत असताना अपुरे मनुष्यबळ असलेले वन खाते त्यावर प्रतिबंध घालण्यास अपयशी ठरत आहे. परदेशात हेलिकॉप्टरमधून पाण्याचा मारा करून वणवे विझवले जात असताना आमच्याकडे वन खात्याचे कर्मचारी झाडाच्या ओल्या फांद्या हातात घेऊन आग विझवत असतानाचे केविलवाणे दृश्य पहावयास मिळते. वन खात्याकडे असलेली वणवा प्रतिबंधक साधने लाखो हेक्टरवरील वनांचे संरक्षण करण्यास कुचकामी किंवा तुटपुंजी ठरत आहेत. बोलघेवडे मंत्री, लोकप्रतिनिधी वनांच्या संरक्षणासाठी तत्पर असल्याचे दाखवत असले तरी त्यात तथ्य नाही. नामशेष होत असलेली जंगले किंवा वनसंपदा, त्यातील परागंदा होत असलेले प्राणी, किटक यामुळे वातावरणात प्रदूषणाला हातभार लागतोय हे कुणाच्या लक्षात कसे येत नाही, याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

आजमितीला मोठी शहरे वगळली तरी इतरत्र कचरा नेऊन टाकण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडची वानवा आहे. काही ठिकाणी तर मोकळ्या जागी ओला आणि सुका कचरा बिनदिक्कतपणे टाकला जातो. कचर्‍याचे ढीग वाढू लागल्यानंतर तो पेटविण्यात येतो. शहरातील डम्पिंग ग्राऊंडवरही कचरा जाळला जातो. यातून निघणार्‍या धुराच्या लोटांमुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होतो. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील देवनार कचरा डेपोमध्ये आग लागण्याचा (की लावण्याचा?) प्रकार वारंवार घडल्याने देवनारसह चेंबूर, गोवंडी, मानखुर्द ते थेट नवी मुंबईतील वाशीपर्यंतचा भाग घुसमटून गेला होता. यावर बरीच टीकाही झाली. असाच प्रकार इतर छोट्या-मोठ्या शहरांतून होत आहे. आधीच हवेचे प्रदूषण उच्च पातळीवर असताना त्यात डम्पिंग ग्राऊंडवर लागणार्‍या आगी या आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहेत. अनेक डम्पिंग ग्राऊंडभोवती संरक्षक जाळ्या नसल्याने गुरेढोरे तेथील कचरा खाण्यासाठी गर्दी करताना दिसतात. यात गुरांच्या पोटात प्लास्टिक जाते. यातून पर्यावरणाला हानी पोहचत आहे. विकासकामांचे इमले चढविले जात असताना या मूलभूत बाबींकडे होणारे दुर्लक्ष भविष्यासाठी धोकादायक आहे.

समुद्रात पर्यावरणाची होणारी हानी हा गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. कारखान्यांतील प्रदूषित पाणी समुद्राला जसे हानी पोहचवत आहे, तशीच हानी अजस्त्र बोटींतून सोडण्यात येणार्‍या तेलामुळे होत आहे. अनेकदा समुद्राचे पाणी काळे, तेलमिश्रित होण्याचे प्रकार मुंबई आणि शेजारी उरण, मुरुड, अलिबाग येथे घडल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम समुद्रातील जैवविविधतेवर न झाला तर नवल! समुद्रातील वाढते प्रदूषण धोक्याची घंटी वाजवत असताना त्यावर फक्त चर्चाच झडतात, परिणामकारक उपाययोजना काहीच होत नाहीत. जल, हवा प्रदूषण येणार्‍या काळात अनेक गंभीर धोक्यांना निमंत्रण देणारे आहे. यात भावी पिढीचे नुकसान होणार हे त्रिवार सत्य आहे. सध्या प्रदूषण कोण आणि कसे करतंय यावरून एकमेकांना दूषणे देण्याचे काम सुरू आहे. प्रगत-अप्रगत देश असो वा शेजारी-शेजारी राज्ये असो, अशी दूषणं देऊन प्रदूषण आटोक्यात येणार नाही. प्रदूषणाचा विळखा सैल करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी कठोर, प्रसंगी कडवट उपाययोजनांचा जमालगोटा देणे इष्ट ठरणार आहे. प्रदूषण रोखणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे भान प्रत्येकाने जपलेच पाहिजे. प्रदूषणामुळे जगात दरवर्षी मरण पावणार्‍यांचा आकडा लाखाच्या घरात असल्याचेही भान राहू देत!

एकमेकांना दूषणं देऊन प्रदूषण कसं थांबणार?
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -