घरसंपादकीयओपेडवंचितला योग्य जागा दिल्यास ‘इंडिया’ची वाट सोपी !

वंचितला योग्य जागा दिल्यास ‘इंडिया’ची वाट सोपी !

Subscribe

वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीला दिलेला जागावाटपाचा फॉर्म्युला अमान्य होण्याची शक्यताच अधिक आहे. असे असले तरी ‘वंचित’ची साथ सोडून ‘इंडिया’ला चालणार नाही. महाराष्ट्रात ठाकरे आणि पवारांबद्दल असलेली सहानुभूती अजून कमी झालेली नाही. याचा फटकाही भाजपला बसण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी ‘वंचित’ला सन्मानजनक जागा देऊन सोबत घेतल्यास हा विजय अधिक सोपा होण्याची शक्यता आहे. तेव्हा इंडिया आघाडी काय निर्णय घेते, यावर बरेच काही अवलंबून आहे.

इंडिया आणि महाविकास आघाडीत सहभागी नसलेले मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीला लोकसभा निवडणूक जागावाटपाचा फॉर्म्युला दिला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत मोदींचा पराभव करण्याच्या एकमेव अजेंड्यावर निवडणूक लढण्याचे ‘वंचित’ने निश्चित केले आहे. ‘इंडिया’ आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये झालेल्या बंडखोरीनंतर या दोन्ही पक्षांची ताकद कमी झाली असल्याचा दावा ‘वंचित’ने केला आहे.

तर काँग्रेसला २०१९ मध्ये एकमेव जागेवर विजय मिळाला होता. काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे काँग्रेस आता शून्यावर आली आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी जागावाटपासाठी ओढाताण करून न घेता ‘वंचित’ला इंडिया आघाडीत सहभागी करून घेऊन चारही पक्षांनी समसमान १२-१२ जागांवर निवडणूक लढण्याचा फॉर्म्युला वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. संविधानाचे रक्षण आणि मोदींचा पराभव याच अजेंड्यावर ही निवडणूक लढण्याचे आवाहनही वंचित बहुजन आघाडीने केले आहे.

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीने २०१९ मध्येही काँग्रेसकडे १२ जागांची मागणी केली होती. भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेस आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्याची चर्चा प्रत्येक लोकसभा निवडणुकीत होत असते. १९९८ आणि १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी केली होती. त्यावेळी अकोला मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर सलग दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर २००४, २००९, २०१४ व २०१९ च्या सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस वेगवेगळे निवडणुका लढले. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडीवरून चर्चेची अनेक चर्चासत्रे झाली, मात्र आघाडी होऊ शकली नाही. यंदा प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आधीच युती केली आहे. काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी वंचितसोबतच्या आघाडीसाठी स्थानिक नेते अनुकुल असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार हेदेखील सकारात्मक आहेत, मात्र चर्चा पुढे सरकत नाही. मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतही प्रकाश आंबेडकरांना बोलावले गेले नव्हते. काँग्रेस नेत्यांकडून काही चुका झाल्या आहेत, त्यामुळे त्यांना तुरुंगात जाण्याची भीती आहे. हे टाळायचे असेल, तर आता ‘वंचित’चा समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला मान्य करावा, असे इशारा वजा अवाहनच ‘वंचित’ने केले आहे.

- Advertisement -

वंचितच्या समसमान जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाकरे, पवार आणि काँग्रेसचे स्थानिक नेते कधीही तयार होणार नाहीत, अशीच गेल्या निवडणुकीतील स्थिती आहे. संजय राऊत यांनी आधीच जाहीर केले आहे की, ते २३ जागा लढणार. यात त्यांनी वंचितच्या १२ जागांचाही समावेश केला आहे का? हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. जो पक्ष जी जागा जिंकू शकतो, त्या आधारावर जागावाटपाचा फॉर्म्युला राऊतांनी दिला आहे. २०१९ मध्ये शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या. त्यातील १८ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले होते, पण त्यावेळी त्यांना नरेंद्र मोदींची सोबत होती.

आता त्यांच्यासोबत सहानुभूतीची लाट असली तरी करिष्माई चेहरा नाही. यासाठी शरद पवार १९७७ चा दाखला देतात, मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे आजचा डाव खेळत असताना ७७ चे नियम लावून चालणार नाही. २०१९ लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने २५ तर राष्ट्रवादी काँग्रेसने १९ जागा लढवल्या. तेव्हा काँग्रेस २५ वरून निम्म्यावर कशी येईल, हाही व्यावहारिक प्रश्न वंचितच्या नेत्यांना कसा पडला नसेल.

इंडिया आघाडीची आज शुक्रवारी महाराष्ट्रातील जागावाटपाची बैठक होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट – २१, काँग्रेस -१५ ते १७, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस – १० ते ११ जागा आणि वंचित बहुजन आघाडी सोबत आल्यास त्यांना अकोल्याची एकमेव जागा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत असेल, तर त्यांना हातकणंगलेची जागा राजू शेट्टींना सोडण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे. वंचित-एमआयएम आघाडीने महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जवळपास १७ उमेदवारांच्या विजयात खोडा घातला होता. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो नांदेड, बुलढाणा, गडचिरोली-चिमूर, सोलापूर, अकोला मतदारसंघाचा.

बुलढाण्यात प्रकाश आंबेडकरांनी बळीराम शिरस्कार यांना उमेदवारी दिली होती. त्यांना १,७२,६२७ मते मिळाली. येथे काँग्रेस उमेदवार राजेंद्र शिंगणेंचा १,३३,२८७ मतांनी पराभव झाला होता. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर स्वत: उमेदवार होते. त्यांचा पराभव भाजपच्या संजय धोत्रे यांनी केला. येथे वंचित आणि काँग्रेस उमेदवारांची मिळून ५,३३,२१८ मते झाली होती. या दोघांची मते एकत्र केली, तर फक्त २२ हजार मतांनी धोत्रेंचा विजय झाला. याचाच अर्थ वंचित आणि काँग्रेसची आघाडी असती, तर येथे याच आघाडीचा उमेदवार विजयी झाला असता. एमआयएमसोबत वंचितची आघाडी असताना अकोल्यात काँग्रेसने दिलेल्या मुस्लीम उमेदवाराला प्रकाश आंबेडकरांच्या बरोबरीने मते मिळाली होती. त्यामुळे एमआयएमची साथ स्वत: प्रकाश आंबेडकरांना मिळालेली दिसली नाही.

गडचिरोली-चिमूरमध्ये वंचितचे उमेदवार डॉ. रमेशकुमार गजबे यांना १,११,४६८ मते मिळाली होती. येथे काँग्रेस उमेदवाराचा भाजपच्या अशोक नेतेंनी ७७,५२६ मतांनी पराभव केला. यवतमाळ-वाशिममध्येही वंचितच्या उमेदवाराला लाखाच्या जवळपास मते मिळाली होती. नांदेडमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव हा वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगेमुळेच झाला. ही सल काँग्रेसला आजही असेल. परभणीमध्येही वंचितच्या उमेदवारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला होता. येथे वंचितच्या आलमगीर खान यांना १,४९,९४६ मते मिळाली होती.

हातकणंगले येथे वंचितचे अस्लम सय्यद यांच्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शट्टी यांचा पराभव झाला. येथे वंचितच्या सय्यद यांना १,२३,४१९ मते मिळाली होती, तर पराभूत शेट्टींचा पराभव ९६,०३९ मतांनी झाला होता. मराठवाडा, विदर्भात वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जोरदार फटका बसला होता. २०१९ लोकसभा निवडणुकीतील पराभवाची आठवण ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडीसाठी अनुकूलता दाखवली आहे, मात्र प्रकाश आंबेडकर मागील ४ लोकसभांप्रमाणे यंदाही १२ जागांवर अडून बसले तर ही आघाडी होण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे.

भाजप महाराष्ट्रात ४० जागा जिंकण्याचा दावा करत आहे. यामध्ये त्यांना वंचित वेगळी लढली तरच त्यांचे लक्ष्य गाठता येणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी मुंबईतील संविधान सभा आणि परवा नागपूरमधील स्त्री मुक्ती परिषदेत भाजपला रोखायचे असेल, तर भाजपेतर पक्षांना राज्यातून ३० जागा जिंकून देण्याचे आवाहन जनतेला केले आहे. प्रकाश आंबेडकरांचा हेतू आणि उद्देश स्पष्ट आहे. मनुस्मृतीचे राज्य येऊ द्यायचे नसेल, तर भाजपेतर पक्षांना म्हणजेच ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन ते वारंवार करत आहेत, मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर त्यांना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला फक्त एक-एक जागा देण्याची भाषा करत असतील, तर भाजपला रोखणे कठीण आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.

प्रकाश आंबेडकरांची ताकद दोन्ही काँग्रेस आणि ठाकरेंना गेल्या निवडणुकीत दिसून आली आहे. त्यामुळे राज्यातील नेते त्यांच्यासोबत आघाडीसाठी सकारात्मक आहेत. भाजपकडे यंदा राम मंदिर आणि ३७० कलम रद्द शिवाय दुसरा कोणताही निवडणुकीसाठी मोठा मुद्दा नाही. मत विभाजनाशिवाय त्यांना विजय मिळणे कठीण आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पुण्यातील कसबा पोटनिवडणूक तसेच ५ शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपला राज्यात सपाटून मार खावा लागला आहे.

त्यामुळे भाजपने त्यानंतर राज्यात कोणत्याही पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याचे टाळले, मात्र आता उत्तर भारतातील हिंदी पट्ट्यात मिळालेल्या विजयानंतर भाजपचे बळ वाढले आहे. महाराष्ट्राचे राजकारण मात्र हिंदी पट्ट्यापेक्षा वेगळे आहे. येथे ठाकरे आणि पवारांबद्दल असलेली सहानुभूती अजून कमी झालेली नाही. याचा फटकाही भाजपला बसण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी ‘वंचित’ला सन्मानजनक जागा देऊन सोबत घेतल्यास हा विजय अधिक सोपा होण्याची शक्यता आहे. तेव्हा इंडिया आघाडीच्या बैठकीत वंचितबद्दल काय निर्णय होतो, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -