घरसंपादकीयओपेड'Live with' की 'Leave it'? वेळीच निर्णय हवा

‘Live with’ की ‘Leave it’? वेळीच निर्णय हवा

Subscribe

 

मनोज जोशी

- Advertisement -

प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर दोघांनीही सावधान असले पाहिजे. काही कारणास्तव वितुष्ट आले तरी, पहिल्यांदा सामंजस्याचा प्रयत्न करावा. तडा गेलेल्या काचेच्या भांड्यातून भले पाणी पिता येणार नाही, पण त्याची छानपैकी फुलदाणी तरी करता येऊ शकते. पण तो किंवा ती वाट भरकटत असेल तर सोबत राहायचे की वेगळा मार्ग चोखाळायचा, याचा निर्णय वेळीच घेण्याची गरज आहे. कारण ‘यूज अँड थ्रो’ या ग्राहक संस्कृतीचा वैवाहिक संबंधांवरही परिणाम होत असून त्याचे घातक परिणाम दिसत आहेत.

‘मानसा मानसा कधी व्हशीन मानूस, लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस…!’ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या या ओळी सध्या आजूबाजूला जे घडत आहे, त्यासाठी तंतोतंत लागू पडणार्‍या आहेत. अलीकडेच मीरा रोड येथे घडलेली घटना अंगावर शहारा आणणारीच आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणापासून सुरू झालेला हा सिलसिला अजूनही सुरूच आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, पण या सर्व घटनांचा मथितार्थ एकच आहे तो म्हणजे, मानवी संवेदना बोथट होत चालल्या आहेत.

- Advertisement -

वसई परिसरात राहणारे श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला हे दोघे एकाच कंपनीत काम करायचे. त्यामुळे दोघांचे प्रेम जुळले. श्रद्धाच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध असल्याने ते दोघे दिल्लीला गेले आणि लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहायला लागले. लग्नाच्या कारणावरून दोघांमध्ये भांडणे व्हायची. आफताबने 18 मे 2022 रोजी श्रद्धाचा खून करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. ही घटना जेव्हा समोर आली, तेव्हा सर्वच हादरले. आफताबच्या क्रूरतेबद्दल सर्वत्र चीडच व्यक्त झाली. त्यानंतर अशा घटना कुठे ना कुठे तरी घडतच होत्या. काही घटना प्रसारमाध्यमांमुळे समोर आल्या, तर काही अज्ञातच राहिल्या. मुंबईतील मरिन लाइन्सजवळील सावित्रीबाई फुले वसतिगृहात 19 वर्षीय मुलीच्या हत्या त्याच क्रूरतेचीच होती. वसतिगृहाच्या वॉचमनने या मुलीवर अतिप्रसंग करून तिची हत्या केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्यानेही रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले, तर दिल्लीत शाहबाद डेअरी परिसरातील जे. जे. कॉलनीमध्ये 16 वर्षीय साक्षीचा 20 वर्षीय साहिलने अतिशय निर्घृणपणे खून केला.

या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये काही वाद झाल्याने साहिलने 28 मे 2023 रोजी साक्षीवर 40 वार करत तिची हत्या केली. साहिल फक्त तिच्यावर वार करूनच थांबला नाही तर त्याने तिला दगडाने ठेचलेही. गजबजलेल्या परिसरात ही घटना घडत असतानादेखील कोणीही पुढे येऊन साहिलला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. याचाच अर्थ, मघाशी म्हटल्याप्रमाणे मानवी संवेदना बोथट होत चालल्या आहेत. अशा प्रत्येक घटनांत माणसातील पशूचे दर्शन घडत राहिले. याला पशू तरी म्हणता येईल का? प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘आम्ही कोण आहोत? जनावरं? छे! आम्ही पूर्णत्वाने जनावरं झालो तर, चांगलं होईल. जनावरं वाजवीपेक्षा जास्त खात नाहीत. जनावरं बलात्कार करत नाहीत. जनावरं सज्जनांची राजरोस हत्या करून ‘दयेचा अर्ज’ करत नाहीत. मुंबई नजीकच्या मीरा रोडममध्ये मनोज साने याने सरस्वती वैद्य हिच्या मृतदेहाची ज्या पद्धतीने विल्हेवाट लावली, ती पशूत्वालाही मागे टाकणारी आहे. आफताबने श्रद्धा वालकरचा खून करून 35 तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले, तर मनोज साने यानेही सरस्वतीचे तुकडे करून ते शिजवले आणि नंतर कुत्र्यांना खाऊ घातले. शेजार्‍यांना आलेल्या मृतदेहाच्या वासामुळे या खुनाला वाचा फुटली. या घटनेवरून जवळपास 30 वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेल्या घटनेची आठवण होते. सुशील शर्मा याने चारित्र्याच्या संशयावरून आपली पत्नी नैना सहानी हिची गोळ्या घालून हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाचीदेखील अशाच प्रकारे विल्हेवाट लावली. सुशील आणि नैना यांचे लव्ह मॅरेज झाले होते, पण कालांतराने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. तिचे दुसर्‍या कोणाबरोबर तरी संबंध असल्याच्या संशयाचे भूत सुशीलच्या मानगुटीवर बसले आणि त्यातून त्याने अविचारीपणे पाऊल उचलले. 2 जुलै 1995 रोजी नैनाची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर त्याच्या मालकीच्या रेस्टॉरंटमध्ये तिचा मृतदेह घेऊन गेला आणि मॅनेजरच्या मदतीने तिचे तुकडे करून तंदूरच्या भट्टीत टाकले.

काही महिन्यांपूर्वी केरळ उच्च न्यायालयाने युवा पिढीच्या वैवाहिक संबंधांबद्दल महत्त्वाची टिप्पणी केली होती. ‘यूज अँड थ्रो’ या ग्राहक संस्कृतीचा वैवाहिक संबंधांवरही परिणाम झाला असून वाढत असलेली लिव्ह-इन-रिलेशनशिप पद्धती त्याचेच द्योतक आहे. वेगळे व्हायचे असेल तेव्हा फक्त गुडबाय म्हणायचे, असे मत न्यायालयाने नोंदवले होते. तरुण पिढी वैवाहिक संबंधांकडे गांभीर्याने नव्हे तर स्वार्थीपणाने पाहत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. लग्न ही एक वाईट प्रथा असून कोणतेही दायित्व किंवा जबाबदार्‍यांशिवाय मुक्त जीवन जगण्यासाठी ती टाळली जाऊ शकते, असे आजकालच्या तरुण पिढीला वाटते. पूर्वी ‘वाइफ’ या शब्दाची फोड ‘वाइज इन्व्हेस्टमेन्ट फॉर एव्हर’ अशी केली जात होती, पण आता ‘वरी इन्व्हायटेड फॉर एव्हर’ अशी केली जाते, अशी टिप्पणीदेखील न्यायालयाने केली. पिढी बदलत गेली, तसा पती-पत्नीच्या नात्यामध्येही बदल होत गेला. पत्नी ही अर्धांगिनी मानण्याचा काळ केव्हाच मागे पडला आहे. त्यानंतर पत्नीला सहचारिणी मानले गेले आणि आता न्यायालय म्हणते तसे, पत्नी ही ‘आयुष्यभराची चिंता’ वाटू लागली आहे.

आता नातेसंबंधातील ओलावा कमी होत चालला आहे. स्नेह, प्रेम याची जागा व्यवहाराने घेतली आहे. समोरची व्यक्ती आपल्या किती कामाची आहे, हे जाणून घेऊनच त्या व्यक्तीला आयुष्यात स्थान दिले जाते. मग ती व्यक्ती पती असो, पत्नी असो किंवा अगदी आई-बाप! अर्थात, ही फूटपट्टी सर्वच कुटुंबांना लागते असे नाही, पण तरीही हे प्रमाण वाढत चालले आहे, हे नाकारता येणार नाही. प्रत्येक गोष्ट व्यावहारिकतेच्या तागडीत मोजली जात असल्यामुळे आपोआपच दिखाव्याला महत्त्व आले आहे. दोघेही स्वत:च्या पायावर उभे आहेत. उच्च शिक्षणामुळे निर्णय घेण्याची क्षमताही आहे. मग सवते सुभे उभे राहिल्यानंतर नात्याची वीण घट्ट कशी होणार?

त्यातच आता एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. विभक्त कुटुंब पद्धती प्रचलित होत चालली आहे. शिवाय, काही घरांमध्ये वयस्कर, वृद्ध मंडळी अडसर ठरत असल्याने त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते. मग अडीअडचणीच्या काळात मार्गदर्शन करणारे आहेत कोण? प्रसिद्ध चित्रपट लेखक सलीम खान यांनी व्यावहारिक नातेसंबंधांवर खूप छान भाष्य केले आहे. ‘कुणालाही आपले अश्रू पुसायला देऊ नका, लोक त्याचा सौदा करतात,’ असे त्यांनी म्हटले आहे. अशी सौदा करणारी माणसे आसपास फिरत असतात, अनेक जण त्याला भूलतात आणि जाळ्यात अडकतात. त्यातूनच काही वेळा जोडीदार जीव गमावतो. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या विविध कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, आता पारावरच्या गप्पा बंद झाल्या आहेत, असा एका सर्वेक्षणाचा निष्कर्ष होता. हाच निष्कर्ष विभक्त कुटुंब पद्धतीलाही काही प्रमाणात लागू होतो. पती आणि पत्नी यांच्यात काही बिनसलेच तर कुटुंबातील वडीलधारी मंडळींचा आधार होता, पण तोच आता राहिलेला नाही, हेही एक कटू वास्तव आहे.

नातेसंबंध बेधडकपणे तोडले जातात आणि त्याचा गैरफायदा घेतला जातो, हेच अनेक घटनांमधून समोर आले आहे. श्रद्धा वालकर प्रकरणातही हेच दिसते. कुटुंबाने तिच्याशी संबंध तोडले आणि त्याचा फायदा आफताबने घेतला. तीन बहिणी असल्या तरी सरस्वती अनाथ आश्रमातच वाढली होती. त्यातूनच तिचे तुकडे करायला मनोज साने धजावला असावा. म्हणूनच यासाठी जीवाभावाची, कुटुंबीयांची गरज असते. आपण त्यांनाच दुरावत चाललो आहोत. वैवाहिक नातेसंबंध नष्ट झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होईल. अशांत आणि उद्ध्वस्त कुटुंबांतून निघणारा आक्रोश समाजाच्या विवेकीपणाला हादरवणारा असतो. भांडखोर दाम्पत्य, एकाकी पडलेली मुले आणि हताश घटस्फोटीत यांचे प्रमाण वाढले, तर सामाजिक जीवनातील आपल्या शांततेवर त्याचा परिणाम होईल आणि आपल्या समाजाची वाढ खुंटेल, अशी भीती केरळ न्यायालयाने व्यक्त केली आहे. आपण त्याच दिशेने चाललो आहोत, हेच विविध घटनांवरून तरी वाटते. शांतपणे अवती-भवती पाहिल्यावर यातील सत्यता लगेच लक्षात येऊ शकते.

मंगलकार्यात ‘शुभमंगल सावधान’ असे म्हटले जाते. दोघांनी एकमेकांची आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड केली आहे, ते आता विवाहबंधनात अडकत आहेत, या शुभ प्रसंगाकडे लक्ष द्या, असे सांगण्याचा तो प्रसंग असतो, पण सध्याच्या घडीला हे शुभमंगल ‘शुभसंसारा’कडे जाण्याची गरज आहे, त्यासाठी दोघांनीही सावधान असले पाहिजे. काही कारणास्तव वितुष्ट आले तरी, पहिल्यांदा सामंजस्याचा प्रयत्न करावा. तडा गेलेल्या काचेच्या भांड्यातून भले पाणी पिता येणार नाही, पण त्याची छानपैकी फुलदाणी तरी करता येऊ शकते. पण तो किंवा ती वाट भरकटत असेल तर सोबत राहायचे की वेगळा मार्ग चोखाळायचा, याचा निर्णय वेळीच घेण्याची गरज आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -