Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड सबसे आगे होंगे हिंदुस्तानी!

सबसे आगे होंगे हिंदुस्तानी!

Subscribe

जगभरातील जवळपास १० हून अधिक देशांचे नेतृत्व भारतीय वंशाचे नागरिक यशस्वीपणे करत आहेत. १४० कोटी भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहेच, पंरतु त्यासोबतच जगभरातील अनेक महत्वाच्या आणि आघाडीच्या कंपन्यांतील प्रमुख पदांवरही भारतीय वंशाचेच नागरिक कार्यरत आहेत. दिल्लीत नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेच्या निमित्ताने भारताचे जगातील महत्व उजळून निघाले आहे. त्यामुळे सबसे आगे होंगे हिंदुस्तानी, या ओळी भारतीय लोक जगभर खर्‍या करून दाखवत आहेत.

सुनो गौर से दुनिया वालों
बुरी नजर ना हमपे डालो
चाहे जितना जोर लगा लो
सबसे आगे होंगे हिंदुस्तानी…

बॉलिवूडमधील ‘दस’ सिनेमातील या गाण्याच्या ओळी सर्वत्र प्रसिद्ध आहेतच, परंतु या गाण्यांच्या ओळींप्रमाणेच आजच्या घडीला भारतीय वंशाच्या नागरिकांचा जगभरात डंका वाजतोय हेदेखील तितकेच खरे आहे, असे म्हटल्यास कदापि चुकीचे ठरणार नाही. कारण, जगभरातील जवळपास १० हून अधिक देशांचे नेतृत्व भारतीय वंशाचे नागरिक यशस्वीपणे करत आहेत. १४० कोटी भारतीयांसाठी ही तर अभिमानाची बाब आहेच, पंरतु त्यासोबतच जगभरातील अनेक महत्वाच्या आणि आघाडीच्या कंपन्यांतील प्रमुख पदांवरही भारतीय वंशाचेच नागरिक कार्यरत असल्याने गाण्यांच्या ओळींप्रमाणे सबसे आगे हिंदुस्तानी म्हणण्यास कुणाला काहीच हरकत नसावी.

- Advertisement -

राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर नुकत्याच यशस्वीपपणे पार पडलेल्या जी-२० शिखर परिषदेद्वारे भारताने आपण आगामी काळात जगाचे नेतृत्व करण्यास सिद्ध असल्याचे दाखवून दिले. या परिषदेदरम्यान उपस्थित असलेल्या अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांनी जगभरात भारतीयांकडून देण्यात येणार्‍या योगदानाचे महत्व अधोरेखित केले. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांकडून भारतीयांच्या जगभरातील योगदानाबाबतचा उल्लेख जी-२० सारख्या महत्वाच्या शिखर परिषदेदरम्यान होणे म्हणजेच जगात सध्याच्या घडीला भारताचे महत्व वाढल्याची पोचपावती या माध्यमातून देण्यासारखे आहे.

जागतिक बाजारपेठेतील व्यापारामध्ये चीनची वाढती एकाधिकारशाही आणि विस्तारवादी धोरणाला अनेक देश कंटाळले आहेत. व्यापारासोबतच चीन आपल्या विस्तारवादी धोरणाद्वारे अनेक देशांचे खच्चीकरण करत असल्याने जगभरातील विविध देश यासाठी पर्यायाच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत चीनप्रमाणेच मोठी बाजारपेठ असलेला देश म्हणून लोक भारताकडे वळत आहेत. जगभरातील लोक भारताला अधिक पसंती देत आहेत. म्हणूनच आजच्या घडीला भारताशी व्यापारवृद्धी करण्यासाठी अनेक देश पुढे सरसावत आहेत.

- Advertisement -

चीन आपल्या विस्तारवादी धोरणातून अनेक देशांसोबत व्यवहार करताना आपले दबावतंत्र अवलंबत असल्याने जगभरातील बहुतांश देश या वृत्तीला कंटाळले आहेत. चीनच्या या धोरणांमुळे फायदा कमी आणि तोट्याची डोकेदुखी अधिक वाढत असल्याने विविध देशांनी व्यापारासाठी पर्यायी मार्ग निवडण्यास सुरुवात केली आहे. भारताचे धोरण हे चीनपेक्षा फार वेगळे असून केवळ व्यवहारापुरतेच संबंध ठेवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याने हे अनेक देशांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळेच जगभरातील विविध देश नोकर्‍या आणि व्यवसायासाठी भारतीयांना संधी देण्यास प्राधान्य देत आहेत.

भारतीयही या संधीचे सोने करत असून आपल्या देशाचे नाव सातासमुद्रापार उंचविण्यात यश मिळवित आहेत. भारतीयांची प्रतिभा, कामाच्या पद्धती, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा, व्यवस्थित राहणीमान हे इतर देशांच्या तुलनेत वरचढ ठरत आहे. यामुळेच आपल्या देशात त्यांना कायमस्वरूपी स्थायिक करून घेण्यासही आघाडीचे देश प्रयत्नशील आहेत. आजच्या घडीला अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, आफ्रिका, सौदी अरेबिया अशा जगभरातील अनेक देशांमध्ये भारतीय नागरिक हे लाखोंच्या संख्येने वास्तव्यास आहेत. अनेकजण तेथे कायमस्वरूपी स्थायिकही झाल्याची नोंद असून त्या देशांचे नागरिकत्व मिळविण्यातही ते यशस्वी झाले आहेत, परंतु असे असले तरी त्यांची भारतीयत्वाशी जुळलेली नाळ कायम असून तेथे राहूनही आपले भारतीयपण त्यांनी टिकवून ठेवले आहे.

जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी सध्या कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या महिला कार्यरत आहेत. त्यांच्या आई श्यामला गोपालन या मूळच्या चेन्नईच्या होत्या. पेशाने डॉक्टर असलेल्या श्यामला या नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झाल्या. तिथेच त्यांनी डोनल्ड यांच्याशी लग्न केले, परंतु असे असले तरी श्यामला यांनी आपल्या मुलीचे नाव हे भारतीय वंशाप्रमाणेच कमला ठेवले. पुढे जाऊन कमला या उच्चशिक्षित झाल्या आणि त्यांनी डेमोक्रेटिक पक्षातून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर अमेरिकेच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली. आज संपूर्ण जग त्यांच्याकडे सर्वात यशस्वी आणि आघाडीच्या भारतीय वंशाच्या व्यक्ती म्हणून पाहत आहे. कमला हॅरिस यांच्यासोबतच अमेरिकेतील प्रमुख महत्वाच्या पदांवर जवळपास १३० भारतीय वंशाच्या व्यक्ती कार्यरत आहेत.

भारतीय वंशाच्या व्यक्ती जागतिक सत्ता असणार्‍या अमेरिकेतच केवळ प्रमुख पदांवर कार्यरत असल्याचे उदाहरण नाही. ज्या इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे आपली राजवट लादली त्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे व्यक्ती म्हणून विराजमान होण्याचा मान मिळवत ऋषी सुनक यांनी भारतीयांचे नाव संपूर्ण जगभरात उंचावले आहे. ऋषी सुनक यांचे आईवडील हे मूळचे भारतीय वंशाचे असल्याचा इतिहास आहे. भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी त्यांचे कुटुंब सध्याच्या पाकिस्तानमधील गुजरानवाला या गावी वास्तव्यास होते. फाळणीदरम्यान झालेल्या दंगलीमध्ये सुनक कुटुंबीयांनी पाकिस्तान सोडून दिल्लीत आश्रय घेतला.

त्यानंतर ते येथूनच ब्रिटनला गेले आणि तेथे स्थायिक झाले. त्यांच्या आई-वडिलांनी ब्रिटनमध्येच लग्न केले. ऋषी सुनक हे प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तींसोबत ऋषी सुनक यांनी लग्न केले असून त्यांना दोन मुली आहेत. ते सध्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कार्यरत असून नुकत्याच पार पडलेल्या जी-२० शिखर परिषदेनिमित्त भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट दिली आणि हिंदू धर्मातील विधीप्रमाणे पूजा प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या पत्नी अक्षताही सोबत होत्या.

ऋषी सुनक यांच्याप्रमाणेच आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकरही भारतीय वंशांचे आहेत. विशेष म्हणजे वराडकर हे मराठमोळ्या कुटुंबातील असून त्यांनी भारतासोबतच महाराष्ट्राचाही झेंडा सातासमुद्रापार डौलाने फडकविण्यात यश मिळविले आहे. लिओ वराडकर यांचे वडील अशोक वराडकर मराठी आहेत. ते सिंधुदुर्गमधील मालवण येथील मूळ रहिवासी आहेत. अशोक वराडकर यांचा जन्म मुंबईतला. त्यानंतर ते आयर्लंडला गेले आणि त्यांनी आयरिश वंशाच्या मरिअम यांच्याशी लग्न केले. लिओ वराडकर हे १९९९ मध्ये २० व्या वर्षी फिगल कन्ट्री निवडणुकीत विजयी झाले होते. २००७ पासून ते आयर्लंडमध्ये वेगवगेळ्या पदांवर मंत्री म्हणून काम करत आहेत, तर २०१७ मध्ये देशाचे १४ वे पंतप्रधान म्हणून ते निवडून आले. २०२० पासून ते आयर्लंडचे ट्रान्सेट म्हणजेच पंतप्रधानपदानंतरचे दुसरे सगळ्यात शक्तिशाली नेते आहेत. सध्या त्यांच्याकडे आयर्लंडमधील अनेक खात्यांचा कार्यभार आहे.

कमला हॅरिस, ऋषी सुनक, लिओ वराडकर यांच्याप्रमाणे जगभरातील अनेक देशांमध्ये महत्वाच्या पदावर भारतीय वंशाचे नागरिक कार्यरत आहेत. पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत. अँटोनियो कोस्टा यांचे वडील ओरलँडो अँटोनियो फर्नांडास दा कोस्टा यांचा जन्म गोव्यात झाला होता. त्यानंतर ते पोर्तुगालला स्थायिक झाले. तिथे पोर्तुगीज असलेल्या मारियो यांच्याशी त्यांनी लग्न केले आणि त्यानंतर अँटोनियो कोस्टा यांचा जन्म झाला. अँटोनियो यांना भारतीय वंशाचे असल्याचा प्रचंड अभिमान आहे. मॉरिशसचे ५वे राष्ट्राध्यक्ष प्रविंद जगन्नाथ-यादव, ७ वे राष्ट्रपती पृथ्वीराजसिंह रूपन, दक्षिण अमेरिकेतील देश सुरिनामचे ९वे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी, गुयानाचे १०वे आणि पहिले मुस्लीम राष्ट्राध्यक्ष मुहम्मद इरफान अली, गुयानाचे उपराष्ट्राध्यक्ष भरत जगदेव, सिंगापूरच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष हलिम्मा याकोब, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या विरोधी पक्षनेत्या कमला प्रसाद बिसेसर यादेखील भारतीय वंशाच्या आहेत.

केवळ राजकीय क्षेत्रातच प्रगती करत भारतीयांनी महत्वाच्या पदांवर विराजमान होण्याचा मान मिळविला असे नाही. अन्य विविध क्षेत्रांतही भारतीय वंशाच्या व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदावरही भारताचा झेंडा डौलाने फडकत आहे. अजयसिंग बंगा हे जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचा मान भारतीय वंशाच्या नागरिकाला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. जागतिक बँकेसोबतच ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला, ‘गुगल’ची एक कंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’चे सुंदर पिचाई, ‘अडोबी’चे शांतनु नारायण, आयबीएमचे अरविंद कृष्णा, मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे संजय मेहरोत्रा, पालो ऑल्टोचे निकेश अरोडा, वीएमवेअरचे रंगराजन रघुराम, अरिस्टा नेटवर्कच्या जयश्री उल्लाल, नेटअ‍ॅपचे जॉर्ज कुरियन हे भारतीयही उच्च पदांवर काम करत आहेत. इतकेच नव्हे तर आयआयटी मुंबईमधून शिक्षण घेतलेल्या पराग अग्रवाल यांनी एकेकाळी ट्विटरचे सीईओपदही भूषविले आहे, तर इंद्रा नूयी या भारतीय वंशाच्या महिला ‘पेप्सीको’ कंपनीच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. एका सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावरील निवडक ५०० कंपन्यांमध्ये सध्या ३० टक्के मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हे भारतीय अथवा मूळ भारतीय वंशाचे आहेत, ही बाब भारतासाठी अभिमानास्पद आहे.

रामचंद्र नाईक
रामचंद्र नाईकhttps://www.mymahanagar.com/author/ramchandra/
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
- Advertisment -