घरसंपादकीयओपेडरंग ही से फ़रेब खाते रहें, ख़ुशबुएँ आज़माना भूल गए

रंग ही से फ़रेब खाते रहें, ख़ुशबुएँ आज़माना भूल गए

Subscribe

ये लाल रंग कब मुझे छोडेगा, म्हणणारा राजेश खन्ना नक्कीच कडवा कम्युनिस्ट असावा. हे गाणं रचण्यामागे आनंद बक्षीसाहेबांना इथल्या भगव्याचं महत्त्वच कमी करायचं होतं, हे स्पष्ट आहे. पण प्रेम नगर बनवणार्‍या दिग्दर्शकांच्या हे ध्यानात यायला ते पुरेसे ‘राष्ट्रभक्त’ नव्हते, तर निले निले अंबर पर चाँद जब आए....या गाण्यामध्ये तर देशविरोधी कटकास्थान स्पष्ट व्हावं. निळं अंबर आणि चाँद एकत्र येण्याचं आवाहन या गाण्यात केलं गेलंय. कुणाल गोस्वामी या मनोज कुमारपुत्राकडून निळ्या अंबरातला चाँद दाखवून त्याला आंबेडकरवादी ठरवून रचलेलं हे देशविरोधी कुंभाड पिता मनोज कुमारांच्या ध्यानातही आलं नसावं, यामागचेे सुप्त हेतू ऐंशीच्या दशकात उघड झाले नाहीत. सोशल मीडियावर उघड व्हायलाच हवेत.

पठाण नावाच्या कुठल्याशा सिनेमातल्या ‘बेशर्म रंग’ गाण्याच्या निमित्ताने आपल्यातल्या बेशरमीचे रंग उधळण्याची ही संधी आपण सोडता कामा नये. कभी कभी मधलं नीला आसमाँ सो गया…किंवा नीले गगन के तले…धरती का प्यार पले, या गाण्यातल्या रंगांचा ‘लबाड’ हेतूही ध्यानात घ्यायला हवा.

त्या शाहरुखनं गेरुआ रंगांचा किती तो अवमान केला होता. रांझे की दिल से हु दुआ…रंग दे मुझे तू गेरुआ…यातल्या गेरुआ रंग म्हणजे केशरीच असताना स्वत: ‘शाहरुख खान’ असताना गेरूआ रंगानं रंगवण्याचं आर्जव तो नायिका काजोलला करूच कसं शकतो. हा त्या रंगाच्या धर्मसंस्कृतीचा अवमान त्यावेळी ध्यानात आला नव्हता, आता नक्कीच घ्यायला हवा. तक्षकमधली तब्बू नावाची कुणी नायिका, मुझे रंग दे…रंग दे.. म्हणत मंचावर धुमाकूळ घालत असताना अर्धसत्य बनवणार्‍या संवेदनशील दिग्दर्शक गोविंद निहलानींच्या मनात नेमका कोणता रंग होता? याचा जाब आताच विचारायला हवा. शाहरुख हा अतिशय लबाड आणि धोकादायक कलाकार आहे. दिल से मध्येही त्यानं ‘सतरंगी रे’ म्हणत असाच रंगांचा गोंधळ घातलेला आपण सहनच कसा केला. त्याला हिरव्या रंगाचं प्रमाणपत्र दिल्यानंतरही त्यानं हे दुःस्साहस केलंच कसं. रंग दे बसंती नावाचा दुसर्‍या आमिर नावाच्या खानाचा याच नावाचा सिनेमा सहन केल्यावर आपण धर्म आणि देशभक्ती सिद्ध करण्याच्या एका संधीला मुकलो आहोत. ‘मोहे मोहे तू रंग दे बसंती…’ यातला बसंती रंग नेमका कोणता याच्याशी आपल्याला रंग दे बसंती रिलिज झाल्यावर काहीच सोयरसुतक नव्हतं, मात्र आता रंगीत धर्माभिमान जागा करण्याची ही संधी आपण सोडता कामा नये.

- Advertisement -

आगीचा रंग पिवळा, भगवा असतो असं वाटण्याचं कारणच नाही, मात्र शाळेत असताना स्पिरिटच्या दिव्याची निळी ज्योत पेटवण्यामागे विज्ञानाच्या आडून आंबेडकरवाद रुजवण्याचा सुप्त हेतू आपण विद्यार्थीदशेत ओळखायला हवा होता. गुलाबी आँखे जो तेरी देखी… असं गाणार्‍या रफी साहेबांना हिरवा सोडून गुलाबी रंगांवर चर्चा केल्यानं त्यांच्यावरही बहिष्कार घालण्याची आज संधी आहे. बाजीराव मस्तानी नावाच्या सिनेमात याच दीपिकानं मोहे रंग दो लाल…असं म्हणत कम्युनिस्टांनाही आव्हान दिलं होतं. त्यामुळे दीपिका पदुकोन ही अभिनेत्री रंगांवरून धार्मिक तेढ निर्माण करणारी असल्यानं तिच्यावर तातडीने कारवाई होण्याची गरज आहे. दीपिकाच्या चित्रपटातील कपड्यांबाबत वाद होण्याचे दिवस मागे सरले आहेत. आता आपण असले नसलेले कपड्यांच्या रंगावरून आपल्या धर्माची महती ठरवणार आहोत. होळी हा आपल्या धर्माचा महत्त्वाचा सण असल्याचं सांगितलं जातंय. त्यात हिरवा, निळा, पांढरा, पिवळा असाच रंग यापुढे वापरू. इतर रंग वापरून आपल्याला आपल्या धर्म संस्कृतीचा र्‍हास करण्याचा काहीच अधिकार नाही. त्यामुळे यापुढे केवळ आणि केवळ केशरी रंगांनीच होळी नव्या वर्षात खेळायला हवी, असा आदेश काढण्याची गरज लक्षात घ्यायला हवी.

राज्यातल्या एका मंत्र्यावर शाई फेकल्याचं प्रकरण ताजच आहे. ही शाई निळी किंवा काळी किंवा लाल तसेच भगवी होती का, या प्रश्नावर या घटनेचं मूल्य ठरवण्याची ही संधी आपण सोडता कामा नये. काळा पैसा, काळं मनाचा…असं आपण कोणालाही रागाच्या भरात बोलून जातो, मात्र आंदोलनात काळ्या फिती, काळे झेंडे दाखवण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. या क्षणभंगूर मानवी देहात कितीतरी रंग वास करून असतात. पांढर्‍या रंगांची हाडं, काहीशा नीळसर, लालसर रक्त असतानाही निसर्ग हिरव्या रंगाच्या रक्तवाहिन्या का साकारतो याचा जाब त्या परमपित्यालाही विचारायला हवा. सरडा रंग बदलल्यानं त्याला बदनाम केलं गेलंय. माणसालाही रंग बदलणार्‍या सरड्याची उपमा दिली जाते, पण सरड्यासारखा सर्वच रंगांना समान न्याय देणारा समतावादी तोच असावा. त्याला देणं घेणं नसतं, कुठल्याही रंगाशी, तरीही नेहमीच रंग बदणारा आणि जे रंग डोळ्यांनाही दिसत नाहीत असे निसर्गाच्या पलिकडचेही रंग ढंग दाखवणार्‍या माणसाला मात्र त्याच्या विशिष्ट रंगांचा अभिमान असतो. तांबडालाल थोडक्यात भगव्या सूर्याचा रंग भेटीदाखल स्वीकारणारा समुद्रही इतर वेळेस निळाच असतो. या समुद्राच्या पाण्यामुळे अवकाशातून पृथ्वी निळीच दिसते म्हणतात, पण त्यामुळे या वसुंधरेच्या रंगबदलावर आजन्म बंदी घालून आपण तिला शोषित ठरवूनच टाकावं.

- Advertisement -

तर सुरेश भट यांनी रंगावर गझल लिहून ठेवलीय, रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा, गुंतून गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा, या रंगांच्या गुंत्यांचा ‘गुंताडा’ करण्याचा प्रयत्न समाजमाध्यमांमध्ये सुरू आहे. विविध रंगांचे धागे एकात एक हळूवार गुंतवल्यावर सुंदर कापड तयार होतं. यातला एक धागा जरी खेचून काढला तरी कापडाची रया जाते. कापडाचे आपापल्या रंगांचे मालकी असलेले धागे खेचून कापडातला माणूस भोंगळा करण्याचं काम सुरू आहे. निसर्गातल्या रंगांवर मालकी सांगणारे यात सर्वात पुढे आहेत. निसर्गानं माणसाला सात रंग पाहण्याची सवलत देऊन पातक केलेलं आहेच. काळा आणि पांढर्‍या रंगातच सगळं जग कृष्णधवल दिसलं असतं तर आज दीपिका पदुकोनच्या ‘पठाण’मधल्या कापडरंग मुद्यावर आपल्या आत दडलेल्या नावालाच उरलेल्या माणसातल्या नागडेपणाचा विजय साजरा करण्याची संधी ‘त्यांना’ मिळाली नसती. आता कृष्णधवल म्हटल्यावर काळा पांढरं म्हणून कृष्णाला त्यातला जाणीवपूर्वक ‘काळा सावळा’ ठरवण्यातही धर्मविरोधी कृत्य असावं. त्यावर ठोस उपाय आहे. आपापल्या आवडीच्या रंगांचे चष्मे वापरून हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढता येणं शक्य आहे. ज्यांना निसर्गातला हिरवा रंग पाहायचा नाही, त्यांनी पाहूच नये, निळं आभाळ पहायची सक्ती कुणावरही नाही. सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी तांबडं पिवळं अवकाश पाहायचं नसेल तर आपल्या आवडीच्या रंगांचा चष्मा खास बनवून घ्यावा, म्हणजे एकाच रंगात सगळं जग दिसेल.

तर विषय दीपिकाच्या ‘त्या’ रंगांच्या कपड्याचा आहे. मुळात दीपिकानं दीपिका हे नावच धारण करू नये, दीपिका दिव्याच्या जवळ जाणारं नाव असल्यानं देवापुढं श्रद्धेनं लावला जाणारा दीपकही बदनाम होत नाही का? कपड्याच्या रंगांचा मुद्दा फार नंतर येतो. हमपे ये किसने हरा रंग डाला, अलिकडच्या देवदासमधलं गाणं आठवावं, हिरवा रंगच का, भगवा रंग किंवा गुलाल टाकायला या बॉलिवूडवाल्यांना हिरव्या रंगाची काविळ झाली होती का, असा प्रश्न त्या संजय लीला भन्साळीला विचारायला हवा. या हिरव्या रंगांची दहशत किती आहे. त्यामुळे आम्ही मुळात कच्ची हिरवी कैरी खातच नाही, पिवळी किंवा भगवी होऊन त्याचा आंबा झाल्यावरच खावी. त्यात देशप्रेमाचा किती गोडवा भरलेला असतो, नाही का, कैरी पन्हे टाळून उन्हाळ्यात ऑरेंज सरबतच प्यावं. मनोज कुमारच्या देशप्रेमाविषयी शंका नाहीतच, पण त्यांनीही काही चुका केलेल्या आहेत. ‘हरियाली और रास्ता’ नावाच्या सिनेमात ‘हरियाली’ जाणीवपूर्वकच पेरली गेली होती. हा सिनेमा भारत अर्थात मनोज कुमारांनी करावा हे त्याहून मोठं दुर्दैव.

‘हिरवी पिलावळ, हिरवे’…असल्या द्वेषमूलक शब्दांचे कॉपी राईट्स आपल्याकडे असताना विजय भट्ट यांनी या नावाचा वापर करून सिनेमा बनवलाच का? या हिरवळीतून जाणारा रस्ता शेजारच्या अशांततेच्या देशात जात असल्याचं त्यांना माहीत नव्हतं काय? हिरवे हिरवे गार गालिचे…म्हणताना त्या बालकवींना या हिरवळीचा धोका लक्षात आला नव्हता का? पुन्हा ‘हरित तृणा’च्या मखमली गालिच्यावर खेळणार्‍या सुंदर फुलराणीला ‘लव्ह जिहाद’च्या कचाट्यात अडकवण्याचा हा कट आपण उधळून लावायला हवा. त्यामुळे हरित क्रांती, हरित भारत असले शब्दच शब्दकोशातून वगळून टाकायला हवेत. हा धोका वेळीच ओळखायला हवा. त्यापेक्षा आपण असं करू, या हिरव्या रंगालाच ‘उपभगवा’ असं नाव घोषित करून टाकू. त्यामुळे या धोक्यातून सुटका व्हायचा मार्गही मोकळा होईल आणि आपल्या रंगात अडकलेल्या धर्मभावनेचंही रक्षण होईल, सोबतच या रंगावरही मालकी सांगून आपल्या देशधर्माचा अभिमानही मिरवता येईल.

सिग्नलमधून हिरवा रंग धोका दर्शवत नसतो, तर आता मार्ग सुरक्षित आहे. आपण पुढे जाऊ शकता…या आशयात केलेली वाहतूक व्यवस्थेतली चूक आपण तात्काळ दुरुस्त करायला हवी. खरंतर ‘लाल’ रंग धोक्याचा असताना हिरवा रंग सुरक्षेचा म्हणून वापरण्याऐवजी तिथं केशरी रंगाचा उपयोग व्हायला हवा. सरकारच्या वाहतूक विभागाने या महत्त्वाच्या मुद्यावर तातडीनं पावलं उचलावीत. विषय चित्रपटांतील रंगसंगतीचा होता. सगळा सिनेमा आपल्याला हव्या त्या रंगातच बदलून घ्यावा, सिनेमाच कशाला, अवघं जगच आपल्याला हव्या त्या रंगात बदलून घ्यायला हवं. निसर्गानं सात रंगांच्या अनुभूतीची जाणीव मानवाला देऊन केलेली ही चूक आपण तातडीनं दुरुस्त करायला हवी. ग्रीन टी, ग्रीन सलाड, वडापावमधली हिरवी चटणी यावर बंदी घालावी. त्याऐवजी ऑरेंज किंवा ब्लॅक टी, ऑरेंज सलाड आणि हिरव्या चटणीचाच आग्रह धरावा. हिरवं काहीच नको, हिरव्या पालेभाज्या पिवळ्या किंवा काळ्या पडेपर्यंत खाण्यासाठी दम धरायला हवा. हा देशासाठी केलेल्या त्याग असेल आणि त्यातून संयमाची परीक्षाही घेतली जाईल. एकजात सगळीकडे भगवाच भगवा पसरायला हवा.

तिकडे बुद्धाच्या चिवराचा रंग भगवा असं म्हटलं जातंय. निळ्या रंगानंतर आता भगव्यावर ‘त्यांनी’ मालकी सांगण्याआधी आपण त्याचे कॉपी राईट्स आपल्याकडे घ्यावेत. बुद्धांना ‘भगवान’ म्हटलं जातं. भगवानचा अर्थ ज्याच्या अपेक्षा, आसक्ती भग्ग झाल्यात, म्हणजेच शेष उरलेल्या नाहीत असा महामानव, मात्र आपण या रंगाचा अर्थच बदलून भगवा म्हणजे फक्त केशरी असा करून घेऊ. बागेत सगळ्याच रंगांच्या फुलांना फुलण्याचा अधिकार आहे. हा अधिकार निसर्गानंच त्यांना दिला आहे. केशरी गडद रंगांचा सूर्य पिवळ्या, हिरव्या किंवा निळ्या पाना फुलांवर स्वत:च्या पहाट किरणांचा अभिषेक करणं टाकण्याचं ज्या दिवशी बंद करेल, त्या दिवशी आपण आपल्या भगव्या रंगांचा रंगजल्लोष साजरा करू. त्यासाठी सूर्योपासनेत योग्य ते बदल करण्याची सूचना करायला हवी, मात्र यात मोठी अडचण आहे.

निसर्गात जीवन मानलं जाणारं पाणी निरंग असतं. त्यात कुठलाही रंग मिसळतो. मनोज कुमारचंच रोटी कपडा और मकानमधलं पानी रे पानी तेरा रंग कैसा…हे गाणं साफ खोटं ठरवण्याची आज गरज आहे आणि हा रंगगोंधळ घातल्यानं भारत कुमारांना दिलेला फाळके पुरस्कारही परत घेण्याची ही सुसंधी आहे. ज्या दिवशी आभाळातून विशिष्ट रंगांच्या पाण्याचा पाऊस पडण्यासाठी वरुणराजाकडेही साकडं घालावं. सूर्यफुलांनी पांढरंफटक व्हावं, चिखलात उगवलेल्या कमळाने लालिमा सोडून द्यावी, गुलाबांनी काळ्या रंगातच उगवावं, हे सगळे रंगबदल आपल्या हाती आहेत. कारण आपण सगळेच धर्माभिमानी आहोत. निसर्गानं आपल्या बरहुकूमच वागावं यासाठी त्यालाही बहिष्कृत करण्याची धमकी देण्यात यावी. तो निसर्ग नावाचा परमेश्वर, परमपिता नक्कीच आपलं ऐकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -