घरसंपादकीयओपेडरेल्वे अपघात टाळण्यासाठी हवे प्रभावी कवच!

रेल्वे अपघात टाळण्यासाठी हवे प्रभावी कवच!

Subscribe

भारतात रेल्वे अपघात रोखण्यासाठी सध्या ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम’ तंत्रज्ञान कार्यरत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये रेल्वे अपघात रोखण्यासाठी ती महत्वाची मानली जाते, परंतु ओडिशातील रेल्वे अपघातानंतर या तंत्रज्ञानाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून याहीपेक्षा प्रगत तंत्रज्ञान आता राबविण्याची गरज भासू लागली. त्यामुळे आगामी काळात रेल्वे अपघात रोखण्यासाठी ‘टीसीएएस’ म्हणजेच ‘कवच’ ही सर्व रेल्वेगाड्यांमध्ये लावण्यासाठी आता भारतीय रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येणार आहेत.

ओडिशा येथील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी २ जून रोजी घडलेल्या मृत्यूतांडवानंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेकडो प्रवाशांचा मृत्यू ओढवल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा हा सर्व पातळीवर अधोरेखित होणारच. वारंवार हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आगामी काळात रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणखी ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याचे किंवा याहूनही आणखी प्रभावशाली तंत्रज्ञान आणण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात येणार यात शंका नाही.

ते होईलच, काही काळ ते तंत्रज्ञान व्यवस्थितरित्या काम करते, मात्र योग्य देखभाल दुरुस्तीच्या अभावी अथवा नैसर्गिक संकटांमुळे नवे तंत्रज्ञानही व्यवस्थितरित्या काम करत नाही. त्यामुळे अनेकदा समस्यांना निमंत्रण मिळते. अशा वेळी जर तंत्रज्ञानच जर कार्यरत राहिले नाही अथवा त्यात तांत्रिक बिघाड झाल्यास काय? याचाही विचार आता होणे गरजेचे आहे. केवळ तंत्रज्ञानावर विसंबून न राहता यासोबतच आणखीही पर्यायी व्यवस्था राबवण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाने प्रयत्नशील राहण्याची ही खरी वेळ आहे.

- Advertisement -

आपल्याकडे अपघात रोखण्यासाठीच्या तंत्रज्ञानाची काही कमी नाही. भारतात १९६०च्या दशकापासून ते आतापर्यंत अनेक मोठे रेल्वे अपघात घडल्याचा इतिहास आहे. शेकडो प्रवाशांचे मृत्यू होण्यासारखे अपघात घडल्यानंतर त्याची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीने आपल्याकडे प्रयत्न होताना दिसतात, परंतु काही काळानंतर पुन्हा पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीप्रमाणे जे व्हायचे ते होतेच. १९६०च्या दशकापासून ते आतापर्यंतच्या काळात शेकडोंच्या संख्येने अधिक प्रवाशांचे मृत्यू होणारे जवळपास १३ अपघात घडल्याची नोंद आहे.

सुरुवातीच्या काळात अपघात रोखण्यासाठी काही सक्षम तंत्रज्ञान भारतीय रेल्वेकडे नव्हते, परंतु अनेकदा घडलेल्या रेल्वे अपघातांच्या प्रकारांनंतर भारतीय रेल्वेने अपघात रोखण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. यातूनच भारतीय रेल्वेने अपघात रोखण्याच्या दिशेने आतापर्यंत विविध तंत्रज्ञानाचा वापर केला. एकामागोमाग एक प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात आणत भारतीय रेल्वेने विकासाच्या दृष्टीनेही सक्षमपणे वाटचाल करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

भारतात रेल्वे अपघात रोखण्यासाठी सध्या ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम’ तंत्रज्ञान कार्यरत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये रेल्वे अपघात रोखण्यासाठी ती महत्वाची मानली जाते, परंतु ओडिशातील रेल्वे अपघातानंतर या तंत्रज्ञानाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून याहीपेक्षा प्रगत तंत्रज्ञान आता राबविण्याची गरज भासू लागली. त्यामुळे आगामी काळात रेल्वे अपघात रोखण्यासाठी ‘टीसीएएस’ म्हणजेच ‘कवच’ ही सर्व रेल्वे गाड्यांमध्ये लावण्यासाठी आता भारतीय रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येणार आहेत. ‘कवच’च्या वापरातून भारतीय रेल्वे विकासाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकणार यात शंका नाही. कारण ‘कवच’ तंत्रज्ञानाचा वापर जगभरातील काही मोजक्या श्रीमंत देशांकडूनच करण्यात येत असून यात आता भारताचाही समावेश झाला आहे.

या यंत्रणेने रेल्वेगाड्यांचे एकमेकांना धडकण्याचे प्रकार रोखता येतील, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारतीय रेल्वेमध्ये ‘कवच’ची व्याप्ती वाढेल यात शंका नाही, परंतु ‘कवच’च्या वापरानंतरही रेल्वे अपघात थांबतील का, हे येणारा काळच ठरवेल. हिरव्या, लाल आणि पिवळ्या रंगांच्या झेंड्यांचा वापर करून आवश्यकतेनुसार रेल्वे वाहतुकीचा गाडा हाकण्यात येतो. जेणेकरून गैरव्यवस्थापनाचे प्रकार टाळता येतात. हे झाले सिग्नल यंत्रणेचे. अशाच प्रकारे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये सध्या ज्या यंत्रणा कार्यरत आहेत त्यामध्ये जर बिघाड झाला तर त्या जागीही पर्यायी व्यवस्था असलीच पाहिजे. येथे जर पर्यायी व्यवस्था असेल तर अपघात रोखण्यासाठी मदत होईल हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही.

ओडिशा रेल्वे अपघातासाठी अनेक कारणे असल्याचे आता तपासामधून समोर येत आहे. यामागचे खरे कारण समोर येईल तेव्हा येईल, परंतु काही गोष्टींकडे रेल्वे प्रशासनाला अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात असले तरी काही प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. सिग्नल यंत्रणेत जर बिघाड होता तर त्याजागी पर्यायी स्टेशन मास्तरांकडून झेंडा दाखवण्याची सुविधा करण्यात येते. अपघात घडलेल्या स्थानकावर याचे पालन झाले होते की नाही, याची सध्या चौकशी करण्यात येत आहे, परंतु ते न झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याने या ठिकाणी घातपात घडल्याच्या संशयालाही बळ मिळत आहे.

त्यामुळे जोपर्यंत या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत ओडिशा रेल्वे अपघाताचे कारण समोर येणार नाही. एवढा मोठा अपघात मानवी चुकीमुळे घडला आहे की तांत्रिक चूक कारणीभूत आहे? यादृष्टीने रेल्वे सुरक्षा आयोगाबरोबरच सीबीआय तपास करीत आहे, तथापि याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिग्नल नियंत्रक किंवा स्टेशन मास्तर यांच्याबद्दलचा संशय बळावतो. कारण स्थानकाजवळच्या लूप लाईनवर मालगाडी गेल्यानंतर ते ट्रॅक पूर्वस्थितीत आले नव्हते. अशा वेळी सिग्नल हा लालच राहतो. ट्रॅक पुन्हा मेन लाईनला जोडले गेल्यानंतर सिग्नल हिरवा होतो. मग कोरोमंडल एक्स्प्रेसला हिरवा सिग्नल कसा मिळाला, हा प्रश्न उपस्थित होतो.

याशिवाय तांत्रिक बिघाड गृहीत धरला तर तो केवळ एकाच सिग्नलमध्ये होणार नाही. सिग्नलचे नियंत्रण करणार्‍या ‘रिले रूम’च्या परिघात असलेल्या इतर सिग्नलमध्येही तो बिघाड दिसला असता. सिग्नल नियंत्रणासाठी जी ‘रिले रूम’ असते आणि त्याला दोन कुलूपे असतात. एका कुलूपाची किल्ली सिग्नलची देखभाल करणार्‍याकडे (सिग्नल मेन्टेनर) असते, तर दुसर्‍या कुलूपाची किल्ली ऑन ड्युटी स्टेशन मास्तरकडे असते. त्यामुळे त्या रूममध्ये जायचे असल्यास दोघांची उपस्थिती आवश्यक असते. या रिले रूममधून सिग्नलमध्ये मॅन्युअली बदल करता येतो. विशेष म्हणजे तेथील उपकरणांमध्ये होणार्‍या स्वयंचलित किंवा एखाद्या व्यक्तीने केलेल्या प्रत्येक बदलांची नोंद (डाटा लॉगर) होते. त्यामुळे ही नोंद तपासल्यानंतर वास्तव समोर येईलच.

भारतीय रेल्वे आता विकासाच्या नव्या टप्प्यावर वाटचाल करत आहे. भारतात अनेक शहरांमध्ये मेट्रो ट्रेन धावत आहेत. बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प प्रगतीशील आहे. विना मोटरमन मेट्रो धावण्याच्या तंत्रज्ञानाकडे आपण वाटचाल करत आहोत. त्यामुळे तांत्रिक बिघाडासारख्या प्रकारांना वेळीच आळा घालण्याकडेही रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. रेल्वे वाहतुकीला सध्या अनेक पर्याय देशभरात निर्माण झाले असले तरी देशभरातील अनेक नागरिकांची सर्वाधिक पसंती ही आजही रेल्वे प्रवासालाच आहे. त्यामुळे साहजिकच रेल्वे प्रवासी संख्याही इतर सेवांच्या तुलनेत अधिक असणारच.

भारताची रेल्वे वाहतूक व्यवस्था जगातील सगळ्यात मोठी वाहतूक व्यवस्था आहे. दरवर्षी रेल्वेतून २.५ कोटी लोक प्रवास करतात. भारतातल्या रेल्वेगाड्या १ लाख किमी अंतर कापतात. १०० किमी प्रतितास या वेगाने जाण्यासाठी रुळांचे आधुनिकीकरण केले जात आहे. काही मार्गाचे १३० किमी प्रतितास आणि काही वेगवान गाड्यांसाठी १६० किमी प्रतितास वेगाने जाण्यासाठी रेल्वे रुळ तयार केले जात आहेत. प्रवासी संख्या मोठी असली तरी आपण आधुनिकतेकडेही वाटचाल करत आहोत हे विशेष.

प्रवासी अधिक असल्याने अपघात घडल्यानंतर येथे होणारी जीवित आणि वित्तहानीदेखील मोठीच असणार आणि याची चर्चाही सर्व पातळीवर होणारच. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे प्रकार रोखण्यासाठी काळजी घेणे हे क्रमप्राप्त ठरते. रेल्वेगाड्या रुळावरून घसरणे हा आजही रेल्वेसाठी अतिशय चिंतेचा मुद्दा आहे. रेल्वे रुळांची नीट देखभाल न करणे, रेल्वेगाड्यांचे डबे, इंजिन नादुरुस्त असणे तसेच मोटरमन आणि गार्डकडून होणार्‍या चुका आदी कारणे रेल्वेगाड्या रुळावरून घसरण्यासाठी कारणीभूत मानली जातात. एका अहवालानुसार ७० टक्के रेल्वे अपघात हे गाड्या रुळावरून घसरल्यानेच होतात.

रेल्वे रुळांच्या बाबतीत आणखी एक बाब म्हणजे हे धातूनिर्मित असल्याने उन्हाळ्यात ते काही प्रमाणात प्रसरण पावतात. पावसाळ्यात गंज पकडणे आणि हिवाळ्यामध्ये आकुंचन पावणे असे ऋतुमानानुसार काही प्रमाणात त्यात बदल घडत असतात. त्यामुळे त्यांना सतत देखभालीची गरज असते. रुळ एकमेकांना घट्ट लावणे, वेळोवेळी त्यांचे स्लीपर्स बदलणे, स्विचेसमध्ये तेल घालणे अशा अनेक प्रकारच्या निगा रेल्वे रुळांच्या बाबतीत राखल्या गेल्या पाहिजेत. तसेच निष्काळजीपणाने रेल्वे चालवणे आणि अतिवेगसुद्धा डबे रुळावरून घसरण्याची मुख्य कारणे आहेत. त्यामुळे येथे दुर्लक्ष करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे.

रामचंद्र नाईक
रामचंद्र नाईकhttps://www.mymahanagar.com/author/ramchandra/
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -