घरसंपादकीयओपेडतो तुमचा कल्पनाविलास...वुई टूक इट जोकिंगली!

तो तुमचा कल्पनाविलास…वुई टूक इट जोकिंगली!

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बंड पुकारून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे असे दोन गट पडले आहेत. नेहमी दादांबाबत सौम्य भूमिका घेणार्‍या सुप्रिया सुळे दादांवर अत्यंत संतापलेल्या दिसल्या, पण पुढील काळात परिस्थिती बदलू शकते. कारण पवार फॅमिलीचा सहकार तत्त्वावर विश्वास आहे. त्यामुळे राज्यात पवार फॅमिलीचा प्रभाव टिकून राहण्यासाठी दादा आणि ताई पुन्हा एकत्र येऊ शकतात. आमच्यामधले मतभेद आम्ही जोकिंगली घेतो, असे ताई म्हणू शकतात.

देवेंद्र फडणवीस २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला सोबत घेऊन मुख्यमंत्री झालेे होते. महाराष्ट्रातील नितीन गडकरी सोडले तर भाजपच्या सगळ्याच नेत्यांना ओरडून बोलायची सवय आहे हे सर्वज्ञात आहे. भाजपचा नेता पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाला असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा जोश तर अधिकच वाढला होता. त्यामुळे अगोदरच जोरात बोलणार्‍या फडणवीसांचा जोर अधिकच वाढला होता. त्यांच्या त्या बोलण्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते की, ‘हा मुख्यमंत्री नळावरच्या बायकांसारखा भांडतो, ओरडून बोलतो.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर प्रस्तुत लेखकाने ‘आपलं महानगर’मधून ‘ताईंची दादागिरी’ असा लेख लिहिला होता. त्यात असे म्हटले होते की, सुप्रियाताई या सुज्ञ राजकीय नेत्या आहेत, तसेच त्यांच्या संयमीपणासाठी त्या ओळखल्या जातात.

अनेक राजकीय नेते आणि त्यांची मुले सत्तेच्या पदासाठी उतावीळ झालेले दिसतात, तशा सुप्रियाताई नाहीत. राज्याचे मुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे त्या पदावर बसलेली व्यक्ती जरी आपल्या विरोधी पक्षाची असली तरी तिच्याविषयी आदराने बोलणे आवश्यक आहे. ताईंना संसदरत्न पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे दिल्लीत कमावले ते गल्लीत गमावले असे होऊ नये, असे लेखात म्हटले होते. त्यानंतर सुप्रियाताईंनी माननीय मुख्यमंत्री असा उल्लेख करायला सुरुवात केली. ‘आपलं महानगर’मधील माझा लेख वाचल्यावर त्यांनी फोन करून तुमचा लेख मी वाचला. तुम्ही चांगला लेख लिहिला आहे. त्यातून राजकीय नेत्यांनाही मार्गदर्शन होते, असे म्हणाल्या. या लेखानंतर मी ‘दादा-ताईंची लढाई’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता. त्यानंतर मंत्रालयासमोरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटीत सुप्रियाताईंनी त्या लेखाविषयी नाराजी व्यक्त केली होती.

- Advertisement -

त्यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय वारसदार अजित पवार की सुप्रिया सुळे या चर्चेनेही जोर धरला होता. सुप्रियाताईंना महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान मिळणार का, अशीही चर्चा सुरू होती. या एकूणच पार्श्वभूमीवर मी लेख लिहिला होता. त्यात पुढील काळात अजितदादा आणि सुप्रियाताई असे दोन गट होऊ शकतात. अजित पवारांना मानणारे नेते त्यांच्यासोबत जातील आणि शरद पवारांना मानणारे नेते सुप्रिया सुळे यांना साथ देतील, असे म्हटले होते. ‘तुमचा लेख मी वाचला, तसेच शरद पवारसाहेबांनीही वाचला, तुम्ही माझ्याबद्दल आणि दादाबद्दल जे लिहिले आहे तो तुमचा कल्पनाविलास आहे, वुई टूक इट जोकिंगली. तुम्ही जे अंदाज बांधले आहेत त्याकडे आम्ही विनोद म्हणून पाहिले,’ असे त्या म्हणाल्या होत्या. याला आता ९ वर्षांचा काळ लोटला आहे. त्यानंतर आज काय परिस्थिती उद्भवलेली आहे ते आपण सगळेच पाहत आहोत.

अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड करून फडणवीस आणि शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊन खरी राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच आहे, असा दावा केला आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर अजित पवार यांनी केलेल्या भाषणात त्यांनी आपली आजवर जी कोंडी झाली त्याला वाट करून दिली. त्या भाषणात त्यांचा मुख्य रोख सुप्रिया सुळे यांच्यावर होता. कारण आपण कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का, असा सवाल त्यांनी केला. याचा अर्थ मी इतकी वर्षे तुमच्यासोबत काम करूनही तुम्ही मला डावलले आहे.

- Advertisement -

मुलगी या नात्याने सुप्रिया सुळे यांना पुढे आणत आहात. खरेतर अजितदादा यांच्या या नाराजीची सुरुवात सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय झाल्यापासून झाली. सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय झाल्याचे एका सभेत शरद पवारांनी जाहीर केले. त्यावेळी तिथे अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरील नाराजी ते लपवू शकले नाहीत. कारण शरद पवार यांच्यानंतर अजित पवार हे समीकरण रुढ झालेले असताना सुप्रियाताईंच्या प्रवेशामुळे अजित पवारांसाठी दुसरे समांतर सत्ताकेंद्र तयार झाले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे राज्यसभेची एक टर्म आणि लोकसभेची आता ही तिसरी टर्म पूर्ण करतील.

अजितदादांनी यापूर्वी २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, पण काका शरद पवारांनी ते बंड मोडून काढले, मात्र त्याच वेळी अजितदादांना पुन्हा स्वगृही आणण्यात सुप्रिया सुळे यांचीही मोठी भूमिका होती. त्यामुळे दादा जेव्हा सिल्व्हर ओकवर परतले तेव्हा ताईंसाठी त्यांनी बरोबर घेतलेले कॅडबरीचे मोेेठे चॉकलेट मीडियाच्या कॅमेर्‍यात उजळून दिसले, पण यावेळी जेव्हा अजितदादांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड करून राष्ट्रवादी पक्षावरच दावा सांगितला आणि आपल्या मनातील खदखद व्यक्त केली, तेव्हा तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी माझ्या दादाशी माझे भांडण होणार नाही, आमच्यात दुही निर्माण होणार नाही, असे ठामपणे सांगणार्‍या ताई दादा भाजपच्या सत्तेत सहभागी झाल्यावर नाद नाय करायचा, असे दादांना ठाणकावून सांगताना दिसल्या. नेहमी आपल्या दादाविषयी मऊ मुलायम शब्द वापरणार्‍या ताई इतक्या आक्रमक झालेल्या सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिल्या असतील.

अजितदादांच्या अगोदर एकनाथ शिंदे शिवसेनेतील नाराजांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्तेत आलेे आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीत अनेक वर्षांपासून नाराज असलेले अजितदादा आपल्या समर्थकांसोबत भाजपसोबत आले आहेत. त्यात पुन्हा शिंदे आणि अजितदादा यांनी आपल्या स्वत:च्या वेगळ्या पक्षांचे अस्तित्व कायम ठेवले आहे. ते भाजपमध्ये विलीन झालेले नाहीत. त्यामुळे हे ट्रिपल इंजिन सरकार दाखवायला छान वाटत असले तरी ते चालवताना मोठी कसोटी लागणार आहे. कारण फडणवीस, शिंदे आणि अजितदादा यांची या सरकारमध्ये अप्रत्यक्ष स्पर्धाच लागणार आहे. कारण आता भाजपने दाबण्याचा प्रयत्न केला तर शिंदे आणि अजितदादा एकत्र येतील.

त्यामुळे भाजप हा जरी यजमान असला तरी पाहुण्यांची पालखी त्यांना वाहावी लागणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. यामुळे कोंडी झाल्यामुळे शिंदे आणि अजितदादांचा जसा स्फोट झाला तसा उद्या कोंडी झाल्यामुळे भाजपमधील नाराजांचाही स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पक्ष कुठलाही असला तरी सगळी माणसे सारखीच असतात हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे उद्या ही तीन इंजिने एकत्र राहतील की आपापले डबे घेऊन पळून जातील हे काहीच सांगता येत नाही. कारण राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या सगळ्या कसरती या मोदींच्या प्रभावामुळे चालत आहेत. तसेच मोदींचा कधीच पराभव होऊ शकत नाही असे नाही.

महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार ही घराणी राजकारणात प्रमुख मानली जातात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वेगळे झाल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. आता अजितदादांनी बंड करून पक्षावर दावा सांगितल्यामुळे अजितदादा आणि सुप्रियाताई असे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत, पण पवार कुटुंब हे सहकार क्षेत्रात वावरणारे आहे. आजही त्यांचे संयुक्त कुटुंब आहे. सहकाराविना नाही उद्धार, हे तत्त्व त्यांच्या अंगात भिनलेले आहे, पण ठाकरे कुटुंबीयांची गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते करीत असले तरी मुख्य नेत्यांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही, मात्र पवार कुटुंबीयांची गोष्ट वेगळी आहेे. आता लवकरच रक्षाबंधन येईल.

तेव्हा सुप्रियाताईंकडून राखी बांधून घेण्यासाठी अजितदादा बारामतीच्या घरी पोहचले तर आश्चर्य वाटू नये. कारण पवारांचे संयुक्त कुटुंब सर्व सणांना बारामतीच्या घरी एकत्र येत असते. मोदींच्या केंद्रातील सत्तेमुळे आज राज्यात भाजपची जरी चलती असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा लॉबीचा प्रभाव असतो. म्हणूनच मोदी शरद पवारांना आपले गुरू मानतात. शरद पवारांचे आता वय झाले आहे हे कितीही नाकारले तरी ती काही आता लपून राहणारी बाब नाही. त्यामुळे पुढील काळात अजितदादा आपल्या धाकड आणि राकट भूमिकेमुळे भाजपला डोईजड होऊ लागले तर कदाचित भाजप त्यांचा हात सोडायलाही मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पवार फॅमिलीचा प्रभाव कायम राखण्यासाठी दादा आणि ताई पुन्हा एकत्र येऊ शकतात. काही झालं तरी तो माझा दादा आहे, आमच्यात काही विसंवाद झाला असला तरी वुई टूक इट जोकिंगली, असे ताई म्हणू शकतात.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -