घरसंपादकीयओपेडसंघ सुधारण्याची आयडिया केली आणि फुकट गेली!

संघ सुधारण्याची आयडिया केली आणि फुकट गेली!

Subscribe

रोहित शर्मा, विराट कोहली या तडाखेबाज फलंदाजांना पूर्वीप्रमाणे फॉर्मात आणण्यासाठी हार्दिक पंड्याच्या खांद्यावर नेतृत्वपदाची जबाबदारी सोपविण्याची आगळी-वेगळी योजना आखण्यात आली होती. ही योजना योग्य प्रकारे मार्गी लागली असती तर भारतीय संघाची मोठी डोकेदुखी दूर झाली असती, परंतु झाले नेमके उलटेच. हार्दिक पंड्या आणि संघातील नवख्या युवा खेळाडूंची कामगिरी पाहता रोगापेक्षा इलाजच भयंकर अशी परिस्थिती वाटू लागली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, संघ निवडकर्ता, प्रशिक्षक, कर्णधार यांच्यासह तमाम क्रिकेटप्रेमींचा मोठा अपेक्षाभंग झाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० फॉरमॅट सुरू झाल्यानंतर या प्रकारातील सर्वात पहिला-वहिला विश्वचषक जिंकण्याचा बहुमान मिळवणार्‍या भारतीय पुरुष संघाची सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळाची चिंता भेडसावल्यावाचून राहत नाही. नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाची कामगिरी ही अनेकांना विचार करायला लावणारी आहे, असे म्हटल्यास मुळीच वावगे ठरणारे नाही. भारतीय संघाचा या मालिकेत ३-२ असा पराभव झाला. खेळ म्हटल्यावर जय, पराजय हा भाग आलाच.

३-२ हा पराभव काही तितका लाजीरवाणा नाही, परंतु ज्या पद्धतीने भारतीय संघातील खेळाडूंनी कामगिरी केली ती पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारतीय संघाच्या भवितव्याचा विचार आणखी प्रकर्षाने करण्याची वेळ आली आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, संघ निवडकर्ता, प्रशिक्षक, कर्णधार यांच्यासह तमाम क्रिकेटप्रेमींना सध्या एकच प्रश्न सतावतोय तो म्हणजे भारतीय पुरुष संघाचे असेच सुरू राहिल्यास आगामी काळात हा संघ विश्वचषक स्पर्धा कशी जिंकणार?

- Advertisement -

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने तर गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाच्या कामगिरीवर बोट ठेवत हा संघ विश्वचषक स्पर्धा जिंकू शकत नसल्याचे भाकीत वर्तवले होते. भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी संघ निवडीमध्ये आत्ताच काही महत्वाचे बदल करावे लागतील, हाच उद्देश युवराज सिंगचा यामागे असावा. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा जिंकणार की नाही? ही येणारी वेळच ठरवेल, परंतु भारतीय संघात मधल्या क्रमवारीतील फलंदाजांचा प्रश्न २०१९च्या विश्वचषकापासून अद्यापही कायम आहे, हे मात्र तितकेच खरे. चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळणार आणि डाव सावरणार, हा प्रश्न निरुत्तरच आहे. युवराज सिंगनेदेखील याच मुद्यावर बोट ठेवले होते. मध्यम क्रमवारीतील फलंदाजी आणि तडाखेबंद गोलंदाजी हे भारतीय संघातील कच्चे दुवे असून येथेच भारतीय संघाला सुधार करण्यासाठी काम करावे लागणार आहे.

आपल्या संघातील कमकुवत बाजू भक्कम करण्याच्या उद्देशाने भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौर्‍यावर अनेक प्रयोग करण्याचे योजिले. हे केले ते उत्तमच केले. कारण आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी प्रयोग करण्याची ही अंतिम संधी म्हणून वेस्ट इंडिजच्या दौर्‍याकडे पाहिले जात होते. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही ही सल जाहीरपणे बोलून दाखवली. प्रयोगासाठी ही अखेरची संधी असल्यानेच आम्ही अनेक वरिष्ठ खेळाडूंऐवजी युवा खेळाडूंना संघात स्थान दिले, असे द्रविड यांनी म्हटले होते. कारण वेस्ट इंडिजचा संघ सध्या पूर्वीप्रमाणे म्हणावा तितका मजबूत संघ नाही. आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी गाठणेही या संघाला अशक्य झाले. नुकत्याच गेल्या महिन्यात पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा संघ हा नेदरलँड्स, स्कॉटलँड आणि झिम्बॉम्ब्वेसारख्या दुबळ्या संघांविरूद्ध पराजित झाला होता.

- Advertisement -

दुबळ्या संघांविरूद्ध पराभूत झाल्याने वेस्ट इंडिज संघामधील अनेक खेळाडूंचे मानसिक खच्चीकरणही झाले होते. त्यामुळे या संघातील अनेक खेळाडू हे त्याच दडपणाखाली खेळत होते. अशा संघाविरूद्ध आपला भक्कम संघ मैदानात उतरवण्याऐवजी काही वरिष्ठ खेळाडूंना आराम करण्याची संधी देवून या जागी इतर खेळाडूंना आजमावण्याचे भारताने ठरविले होते. युवा खेळाडूंना संधी मिळण्याच्या उद्देशाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान भारतीय संघात अनेक प्रयोग करण्यात आले. मुख्य नियमित (रेग्युलर) कर्णधार रोहित शर्मा, भारतीय संघाच्या फलंदाजीचा मुख्य कणा मानला जाणारा विराट कोहली या दोन वरिष्ठांसह काही खेळाडूंना आगामी आशिया चषक आणि त्यानंतर भारतात खेळविल्या जाणार्‍या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आराम करण्याची संधी देण्यात आली होती. त्यामुळे युवा खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी ही सोनेरी संधी मानली जात होती. काही खेळाडूंचा अपवाद वगळता अनेकांनी या संधीचे सोने करण्याऐवजी अक्षरशः मातीच केली.

आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केल्याने काही युवा खेळाडूंची निवड वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी करण्यात आली होती. आयपीएलसारख्या जगप्रसिद्ध स्पर्धेतील अनेक सामन्यांचा अनुभव गाठिशी असतानाही अनेक खेळाडूंनी मात्र अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. याचाच फटका भारतीय संघाला बसला. खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे न केलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघावर वेस्ट इंडिजसारख्या संघाकडून मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली. तिलक वर्मा, यशस्वी जयस्वाल यांनी उत्तम कामगिरी केली, परंतु संजू सॅमसन, रवी बिश्नोईसह इतर यंग ब्रिगेडने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यश मिळविले नाही. केवळ नवखे खेळाडूच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघामध्ये यापूर्वी आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर स्थान मिळवणार्‍या काही खेळाडूंनीही पार निराशा केली.

मुख्य म्हणजे कर्णधार हार्दिक पंड्याचे नाव यात सर्वात आधी घेतले तर कदाचित ते चुकीचे ठरणार नाही. हार्दिक पंड्या हा या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू होता. इतर खेळाडू हार्दिक पंड्याच्या तुलनेत हे नवखे होते. त्यामुळे या संघाला सावरण्याची जबाबदारी ही हार्दिकच्या खांद्यावर मुख्यत्वे इतरांच्या तुलनेत अधिक होती, परंतु संपूर्ण मालिकेतील हार्दिकच्या कामगिरीवर नजर टाकली तर ती कर्णधारपदाला साजेशी नव्हती. हार्दिक हा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. क्रिकेट विश्वातील निवडक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून त्याचा नावलौकिक आहे, परंतु असे असले तरी त्याच्या नावलौकिकाप्रमाणे हार्दिकची कामगिरी या मालिकेत झाल्याचे पहायला मिळाले नाही. हार्दिकने पाच सामन्यांत अवघ्या ७७ धावा काढल्या, तर ३ गडी बाद केले. कर्णधारच जर आपली कामगिरी चोखपणे बजावण्यात अपयशी ठरत असेल तर संघातील इतर खेळाडूंवरही त्याचा परिणाम होणारच.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर पार पडलेल्या टी-२० विश्वचषक सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात झालेल्या दणदणीत पराभवानंतर भारतीय संघाच्या टी-२० संघाचे नेतृत्व बदलण्याची जोर धरू लागली. रोहित हा एकटाच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत असल्याने त्याच्यावर अधिक भार येत आहे. किमान टी-२० प्रकारात तरी त्याच्याजागी एखाद्या दुसर्‍या खेळाडूची निवड करण्याची मागणी होऊ लागली. टी-२० प्रकारात रोहित शर्मासाठी भारतीय संघाकडे अनेक पर्याय उपलब्ध होते.

हार्दिक पंड्याचे नेतृत्व जर यशस्वी ठरले असते, तर टी-२० मधील भारतीय संघाचा भावी कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. कारण भारतीय संघासाठीही ते फायद्याचे गणित म्हणून पाहिले जात होते. रोहित शर्मा, विराट कोहली या दोन्ही खेळाडूंची कामगिरी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना तितकी प्रभावशाली ठरलेली नाही जितकी कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर नसताना. त्यामुळे जर हार्दिक पंड्याचे नेतृत्व यशस्वी ठरले असते तर हे संघासाठी एक प्रकारे चांगलेच ठरले असते. म्हणूनच वेस्ट इंडिज दौर्‍यादरम्यान हा प्रयोग करण्यात आला होता. रोहित शर्मा, विराट कोहली या तडाखेबाज फलंदाजांना पूर्वीप्रमाणे फॉर्मात आणण्यासाठी हार्दिक पंड्याच्या खांद्यावर नेतृत्वपदाची जबाबदारी सोपविण्याची आगळी-वेगळी योजना आखण्यात आली होती. ही योजना योग्य प्रकारे मार्गी लागली असती तर भारतीय संघाची मोठी डोकेदुखी दूर झाली असती, परंतु झाले नेमके उलटेच.

हार्दिक पंड्या आणि संघातील नवख्या युवा खेळाडूंची कामगिरी पाहता रोगापेक्षा इलाजच भयंकर अशी परिस्थिती वाटू लागली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, संघ निवडकर्ता, प्रशिक्षक, कर्णधार यांच्यासह तमाम क्रिकेट प्रेमींचा मोठा अपेक्षाभंग झाला. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आदी सर्व आघाड्यांवर भारतीय संघ प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिजच्या तुलनेत अपयशी ठरत असल्याचे दिसून आले. टी-२० मालिकेच्या आधी झालेल्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिजपेक्षा सर्व आघाड्यांवर वरचढ असल्याचे पहायला मिळत होते, परंतु टी-२० मालिकेत सर्वच विपरीत घडताना दिसले.

यासाठी निवड समिती आणि संघाच्या प्रशिक्षकांना कदापि जबाबदार ठरवता येणार नाही. कारण कसोटी आणि एक दिवसीय मालिकेदरम्यान संघ निवडकर्ते, प्रशिक्षक तेच असताना भारतीय संघाला यश मिळत होते, परंतु टी-२० मालिकेत मात्र भारतीय संघाची कामगिरी योग्य प्रकारे न झाल्यामुळे अपयश आले. कटू असले तरी ते वास्तव आहे. ते न स्वीकारून चालणार नाही. म्हणूनच यातून आता धडा घेऊन यापुढे काही तरी नव्या पद्धतीने योजना आखाव्या लागणार आहेत, हे सांगणारी ही वेळ आहे.

रामचंद्र नाईक
रामचंद्र नाईकhttps://www.mymahanagar.com/author/ramchandra/
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -