घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आतां येचिविशीं पार्था । तुज सांगेन एक मी कथा । जैं सृष्ठ्यादि संस्था । ब्रह्मेनें केली ॥
पार्था, आता तुला मी याविषयी एक कथा सांगतो. ज्या वेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली,
तैं नित्ययागसहितें । सृजिलीं भूतें समस्तें । परी नेणतीचि तिये यज्ञातें । सूक्ष्म म्हणौनि ॥
त्या वेळेस प्राणी व त्यांनी नित्य आचरण्याचे धर्म ही दोन्ही बरोबर उत्पन्न केली; परंतु ते गहन असल्यामुळे प्राण्यांना समजले नाहीत.
ते वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा । देवा काय आश्रयो एथ आम्हां । तंव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति ॥
तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली की,‘देवा, या ठिकाणी आम्हाला काय तरणोपाय आहे?’ तेव्हा तो भगवानाच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव त्यांना म्हणाला-
तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे । यातें उपासा मग आपैसे । पुरती काम ॥
तुमच्या वर्णाश्रमाप्रमाणे आम्ही पूर्वीच धर्म नियमित केले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही आचरण करा म्हणजे तुमचे हेतु सहज पूर्ण होतील.
तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें । दुरी केंही न वचावें । तीर्थासी गा ॥
तुम्ही व्रतवैकल्ये करू नका, उपासतापास करून शरीरास कष्ट देऊ नका व तीर्थयात्रेकरिता दूर जाण्याचे श्रम करू नका.
योगादिकें साधनें । साकांक्ष आराधनें । मंत्रयंत्रविधानें । झणीं करा ॥
योगादिक साधने, तसेच कामनिक आराधना व मंत्रतंत्रादी अनुष्ठाने करण्याच्या कदाचित् नादी लागाल हो! तसेच
देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावें । तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ॥
इतर देवास भजू नका व वरील गोष्टी करू नका, तर तुम्ही आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे जो धर्म सांगितला आहे, त्याचे सुखाने आचरण करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -