घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे । तैसा सर्वस्वें जो मज भजे । तो मीचि होऊनि ठाके ॥
ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यात पहिला कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे जो
सर्वभावाने मला भजतो, तो मद्रूपच होऊन राहतो.
मग माझी नित्य शांती । तया दशा तेचि कांती । किंबहुना जिती । माझेनि जीवें ॥
मग त्याला माझी स्थिती, माझी कांती व माझी नित्य शांती प्राप्त होते. फार तर काय! तो माझ्या जीवानेच जिवंत राहतो.
एथ पार्था पुढतपुढती । तेंचि तें सांगों किती । जरी मियां चाड तरी भक्ती । न विसंबिजे गा ॥
पार्था, इथे वारंवार तेच-ते किती सांगू! पण जर कोणाला माझ्या प्राप्तीची इच्छा असेल, तर त्याने माझी भक्ती विसरता कामा नये.
अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । आभिजात्य झणीं श्लाघा । व्युत्पत्तीचा वाउगा । सोसु कां वाहवा? ॥
अरे, कुळाच्या चांगुलपणाची आवश्यकता नाही, चांगल्या जातीचीही अडचण नाही, आणखी मग विद्वत्तेची तरी उगीच हाव पाहिजे कशाला!
कां रूपेवयसा माजा । आथिलेपणें कां गाजा?। एक भाव नाहीं माझा । तरी पाल्हाळ तें ॥
अथवा रूपाची आणि वयाची प्रतिष्ठा किंवा संपत्तीचा डौल (यापैकी काहीसुद्धा नको) एक माझ्या ठिकाणी भक्ती नसली तर ही सर्व व्यर्थ.
कणेंविण सोपटें । कणसें लागलीं घनदाटें । काय करावें गोमटें । वोस नगर? ॥
दाण्याशिवाय रिकामी कणसे जरी पुष्कळ दाट लागली असली अथवा सुंदर शहर असून ते जर ओसाड असले, तर त्याला काय करावयाचे आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -