घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तरी आतां पवित्र तयाचेंचि कुळ । आभिजात्य तेंचि निर्मळ । जन्मलेयाचें फळ । तयासीच जोडलें ॥
तर त्याचे कुळ आता पवित्रच झाले, त्याला निर्मळ कुलिनता प्राप्त झाली आणि त्याच्याच जन्माचे सार्थक झाले.
तो सकळही पढिन्नला । तपें तोचि तपिन्नला । अष्टांग अभ्यासिला । योगु तेणें ॥
त्याला सर्व शास्त्रे वगैरे अवगत झाली, त्याला तपाचेही आचरण केल्याचे श्रेय आले व त्याने अष्टांगयोगाभ्यास केला.
हें असो बहुत पार्था । तो उतरला कर्में सर्वथा । जयाची अखंड गा आस्था । मजचिलागीं ॥
पार्था, फार काय सांगावे! एकनिष्ठारूप पेटीत मनोबुद्धीचे सर्व व्यापार भरून ती माझ्याच ठिकाणी जो ठेवितो.
अवघिया मनोबुद्धीचिया राहटी । भरानि एकनिष्ठेची पेटी । मजमाजीं किरीटी । निक्षेपिली ॥
अशा प्रकारे ज्याचे अखंड प्रेम माझ्याच ठिकाणी असते, तोच निश्चयेकरून सर्व कर्मापासून उत्तीर्ण झाला.
तो आतां अवसरें मजसारिखा होईल । ऐसा हनभाव तुज जाईल । हां गा अमृताआंत राहील । तया मरण कैचें? ॥
तो काही अवकाशाने (मरणोत्तर) मजसारखा होईल असा तुझा कदाचित समज होईल, पण जो अमृतातच वास करितो, त्याला मरण कोठून प्राप्त होणार!
पैं सूर्यु जो वेळु नुदैजे । तया वेळा कीं रात्रि म्हणिजे । तेवीं माझिये भक्तीविण जें कीजे । तें महापाप नोहें? ॥
हे बघ-ज्या वेळी सूर्य उदय पावत नाही त्याच वेळेला रात्र असे म्हणतात, त्याचप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय जे करणे ते महापाप नव्हे काय?
म्हणौनि तयाचिया चित्ता । माझी जवळिक पंडुसुता । तेव्हांचि तो तत्त्वता । स्वरूप माझें ॥
हे पंडुसुता, त्याच्या चित्ताला जेव्हा माझा योग होतो, त्याचे चित्त मद्रूप होते, तेव्हाच खरोखर तो माझ्या स्वरूपाला पावतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -