घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तंव अर्जुन म्हणे हें कायी । चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं? । जगचि निवविजे हा तयाच्या ठायीं । स्वभावो कीं जी ॥
तेव्हा अर्जुन म्हणतो, हे काय? चकोराशिवाय चांदण्याचा उपयोग नाहीच की काय? जगाला शांत करणे हाही त्याचा स्वभावच आहे.

येरें चकोरें तियें आपुलिये चाडे । चांचू करिती चंद्राकडे । तेवीं आम्ही विनवूं तें थोकडें । देवो कृपासिंधु ॥
चकोर पक्ष्याने मात्र आपल्या गरजेकरिता ज्याप्रमाणे चंद्राकडे चोच करावी, त्याचप्रमाणे आम्ही आपल्याला विनंती करावी हे थोडेच, परंतु जगाचे कल्याण करण्याविषयी आपण कृपासिंधू आहात.

- Advertisement -

जी मेघ आपुलिये प्रौढी । जगाची आर्ती दवडी । वांचूनि चातकाची ताहान केवढी । तो वर्षावो पाहुनी? ॥
मेघ आपल्या थोरपणाने जगाची अडचण निवारण करितो, त्या त्याच्या मोठ्या वर्षावाच्या मानाने पाहिले असता चातकाची तहान ती केवढी असणार?

परि चुळा एकाचिया चाडे । जेवीं गंगेतेंचि ठाकणें पडे । तेवीं आर्त बहु कां थोडे । तरी सांगावें देवें ॥
परंतु एक जरी चूळ भरण्याची इच्छा झाली तरी ज्याप्रमाणे गंगेकडे जावे लागते, त्याप्रमाणे आमची इच्छा थोडी असो की फार असो, तरी ती देवांनी पूर्ण केलीच पाहिजे.

- Advertisement -

तेथें देवें म्हणितलें राहें । जो संतोषु आम्हां जाहाला आहे । तयावरी स्तुति साहे । ऐसें उरलें नाहीं ॥
तेव्हा देव म्हणाले, अर्जुना, आता तुझे बोलणे राहू दे. आम्हाला जो सांगण्याविषयी संतोष झाला आहे, त्याला स्तुतीची आवश्यकता उरली नाही.

पैं परिसतु आहासि निकियापरी । तेंचि वक्तृत्वा वर्‍हाडीक करी । ऐसें पुरस्करोनि श्रीहरी । आदरिलें बोलों ॥
परंतु तू ज्याप्रमाणे लक्ष देऊन एवढा वेळ ऐकलेस तसेच लक्ष देऊन आमच्या बोलण्यास मेजवानी कर. (पुढेही तसेच ऐक.) अशा रीतीने श्रीहरीनी अर्जुनास मान देऊन बोलण्यास सुरुवात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -