घरसंपादकीयअग्रलेखविश्वास कधी फळाला येणार!

विश्वास कधी फळाला येणार!

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या अठराव्या वर्धापन दिनी नाशिक येथे मेळावा घेऊन सगळ्या राजकीय पक्षांची पोलखोल केली. आतून सगळे एकच आहेत, तुम्हाला वेडे बनवले जात आहे. त्यांचे राजकारण सुरू आहे, असे अगदी लोकांना पटणारे विचार त्यांनी मांडले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या अठराव्या वर्धापन दिनी नाशिक येथे मेळावा घेऊन सगळ्या राजकीय पक्षांची पोलखोल केली. आतून सगळे एकच आहेत, तुम्हाला वेडे बनवले जात आहे. त्यांचे राजकारण सुरू आहे, असे अगदी लोकांना पटणारे विचार त्यांनी मांडले. राज ठाकरे यांनी पक्षाची स्थापना करून आता १८ वर्षे झाली आहेत. राज यांच्या सभांना प्रचंड गर्दी जमते. इतकेच काय तर राज यांचे भाषण सुरू झाले की, सगळ्या इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्या इतर कार्यक्रम आणि इतर नेत्यांची भाषणे बाजूला ठेवून राज यांचेच भाषण दाखवतात. इतका राज यांचा जबरदस्त टीआरपी आहे. इतकी लोकप्रियता असूनही त्यांच्या पक्षाला राज्यात सत्ता का मिळत नाही, यावरून अनेक राजकीय विश्लेषक संभ्रमात आहेत. कारण एका बाजूला नेत्यांच्या सभांना गर्दी जमवण्यासाठी त्यांना बर्‍याच उठाठेवी कराव्या लागतात, तर राज यांच्या सभेला लोक स्वत:हून मोठी गर्दी करतात. राज यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्रात सुरुवातीला मोठे यश मिळाले. राज यांनी पक्षस्थापनेपासून एकला चलोची भूमिका घेतलेली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला नेहमी सांगितलेले आहे की, महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात द्या, मी तुम्हाला राज्याचा कायापालट करून दाखवतो. पण महाराष्ट्रासारख्या राज्याची एक हाती सत्ता मिळवणे वाटते तितके सोपे नाही. कारण ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही जमले नाही. सत्तेत येण्यासाठी त्यांनाही युती किंवा आघाडी करावी लागली.

एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. जेव्हा काही वर्षांपूर्वी काँग्रेस हा इथला प्रमुख पक्ष होता, तेव्हा त्यांची बहुमताची सत्ता राज्यात येत असे. पण त्यांच्यातही गटबाजी असायची. एकमेकांची सरकारे पाडली जायची. पण जेव्हा महाराष्ट्रात शिवसेनेचा, भाजपचा विस्तार होऊ लागला, तसेच पुढे काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा परिस्थिती बदलली. इतकेच काय, पण राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा शिवसेना कमजोर झाली. राज हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वार्थाने प्रतिरूप वाटत असल्यामुळे सुरुवातीच्या काळात यांच्या पक्षाला चांगले यश मिळाले. पण पुढील काळात ते यश ओसरत गेले. एकदा तर राज ठाकरे यांनी पक्षामध्ये व्यापक ऊर्जा भरण्यासाठी मी स्वत:च मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढणार असे जाहीर केले, पण पुढे प्रत्यक्ष राजकारणात उतरणे हे ठाकरे घराण्यातील लोकांच्या जीन्समध्ये नाही, असे सांगून त्यांनी माघार घेतली. पण पुढे त्यांचे मोठे भाऊ उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षे काम पाहिले. राज जे बोलतात ते लोकांना पटते, मराठा आरक्षणाबाबत त्यांनी मांडलेल्या भूमिकेचा प्रत्यय सध्या येत आहे, कारण आरक्षणाचे गणित सोडवणे वाटते तितके सोपे नाही. आजही बरेचदा लोक आपल्या समस्या घेऊन राज ठाकरे यांच्याकडे जातात, कारण त्यांच्या आवाजात दम आहे, असा लोकांचा विश्वास वाटतो. वर्धापन दिनी भाषण करताना राज म्हणाले, मी जेव्हा विविध ठिकाणी दौर्‍यावर जातो आणि तिथल्या माताभगिनींना नमस्कार करतो, तेव्हा त्या माझे हात दोन्ही बाजूंनी धरून सांगतात की, आता फक्त तुमच्यावर विश्वास आहे. हे अगदी खरे आहे, पण या विश्वासाचे रूपांतर निवडणुकीच्या यशात का होत नाही, असा प्रश्न राज ठाकरे यांना स्वत:लाही पडत असेल.

- Advertisement -

राज यांनी लाव रे तो व्हिडीओ या मोहिमेतून केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमधून तुम्ही काय वेगाने फापडा आणि ढोकळा खायला गुजरातला जाणार का, अशी खिल्ली उडवली होती. पण त्यानंतर राज ठाकरे यांच्यामध्ये बरेच परिवर्तन झाले. त्यांनी टोकाचा मोदीविरोध बाजूला ठेवला. इतकेच नव्हे तर त्यांच्या भाषणातून ते भाजपला पोषक ठरणारी भूमिका घेत आहेत, असे दिसू लागले. राज ठाकरे बाळासाहेबांप्रमाणे भाजपशी युती करणार असे वाटत असताना एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे भाजपला सत्ता मिळाली. त्यानंतर भाजपला राज ठाकरे यांची तशी गरज राहिली नाही. देशभरात आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीच्या तारखा केव्हाही जाहीर होतील. त्यावेळी राज ठाकरे यांनीही आपल्या पक्षात नवी ऊर्जा भरायला सुरुवात केली आहे. आजच्या घडीला राज ठाकरे यांच्या पक्षाकडे एकच आमदार आहे. लोकसभा निवडणुकीचा आवाका तर मोठा असतो. अजूनही मनसेला आपला खासदार निवडून आणता आलेला नाही. मनसेचा सुरुवातीचा यशस्वी काळ सोडला तर त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकांसाठी उभे केलेल्या उमेदवारांना जिंकणे सोडा, त्यांना त्यांचे डिपॉझिटही वाचवता आले नव्हते. सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागावाटपासाठी जी रस्सीखेच सुरू आहे आणि जी गटबाजी उसळलेली आहे, ते पाहता मतदारही गोंधळात पडतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे राज ठाकरे जसे म्हणतात, काही माताभगिनींनी आता तुमच्यावरच आमचा विश्वास आहे, असे सांगितले. सध्याच्या राजकीय गोंधळाच्या परिस्थितीत राज ठाकरे यांच्यावरील हा विश्वास मतदान यंत्रात उतरतो का, हे पहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -