घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडूं शके? । तेविं जो उजू वाट देखे । तो अव्हांटा न वचे ॥
जो विष आणि अमृत ही दोन्ही ओळखतो, तो अमृत टाकील का? त्याचप्रमाणे जो सरळमार्ग पाहतो, तो आडमार्गाला जाणार नाही.
म्हणौनि फुडें । पारखावें खरें कुडें । पारखिलें तरी न पडे । अनवसरें कहीं ॥
म्हणून प्रथम खर्‍याखोट्याची पारख करावी. ती पारख झाली म्हणजे मग तो केव्हाही संकटात पडत नाही.
एर्‍हवीं देहांतीं थोर विषम । या मार्गाचें आहे संभ्रम । जन्में अभ्यासिलियाचें हन काम । जाईल वायां ॥
बाकी अंतसमयी या मार्गाची प्राप्ती होण्याला मोठी भीतीच आहे. कारण, हा काळ जर प्राप्त झाला नाही, तर जन्मभर केलेला अभ्यास व्यर्थ जातो.
जरी अर्चिरा मार्गु चुकलिया । अवचटे धूम्रपंथें पडलिया । तरी संसारपांथीं जुंतलिया । भंवतचि असावें ॥
जर अर्चिरा मार्ग चुकला आणि तो योगी अकस्मात धूम्रमार्गात पडला, तर जन्ममरणाच्या फेर्‍यात गुंतून फिरत रहावे!
हे सायास देखोनि मोठे । आतां कैसेनि पां एकवेळ फिटे । म्हणौनि योगमार्गु गोमटे । शोधिले दोन्ही ॥
अशी ही मोठाली संकटे पाहून, ती एकदा कशाने दूर होतील, म्हणून दोन्ही योगमार्गाचे चांगले स्पष्टीकरण केले.
तंव एकें ब्रह्मत्वा जाइजे । आणि एकें पुनरावृत्ती येइजे । परि दैवगत्या जो लाहिजे । देहांतीं जेणें ॥
एका मार्गाने योगी मोक्षाला जातो आणि दुसर्‍या मार्गाने जन्ममरणाच्या फेर्‍यात पडतो; परंतु देहावसानाच्या वेळेस प्राक्तनानुसार ज्याला जो प्राप्त होईल, तो खरा.
ते वेळीं म्हणितलें हें नव्हे । वायां अवचटें काय पावे । देह त्याजूनि वस्तु होआवें । मार्गेंचि कीं? ॥
अकस्मात कोणत्या वेळेस काय प्राप्त होईल याचा काही नेम आहे? म्हणून ही गोष्ट राहू दे; तर देहांती ब्रह्मप्राती करून घेण्यास मार्गच कशाला हवा?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -