घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे । तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥
त्याप्रमाणे, ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही, ज्यांना आत्मसुखाचा नेहमी तोटा असतो, त्यांनाच हे विषयसुख चांगले असे वाटते!
एर्‍हवीं विषयीं सुख आहे । हें बोलणेंचि सारिखें नोहे । तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥
सहज पाहिले असता विषयात सुख आहे हे म्हणणेच योग्य नाही; तथापि सुख आहे असे धरून चालले तर मग विजेच्या चमकण्यापासून पडणार्‍या उजेडात जगातील व्यापार का न व्हावे?
सांगैं वात वर्ष आतपु धरे । ऐसे अभ्रच्छायाचि जरी सरे । तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां ॥
तू हे सांग की, वारा, पाऊस आणि ऊन यांचे निवारण जर ढगांच्या छायेपासून होईल, तर तीन मजली घरे बांधण्याचे कारण तरी काय?
म्हणौनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे । जैसें महूर कां म्हणिजे । विषकंदातें ॥
म्हणून, विषाच्या कांद्याला (बचनागाला) ज्याप्रमाणे अज्ञानाने गोड म्हणतात, त्याप्रमाणे, विषयाचे ठिकाणी सुख आहे हे व्यर्थ बडबडणे आहे.
नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु । तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥
किंवा भौम या ग्रहास जसे मंगल हे नाव आहे, परंतु त्याचा अनुभव तसा नाही किंवा मृगजलाला जल म्हणतात, तसे विषयसेवनात सुख आहे, हे म्हणणे व्यर्थ आहे.
हे असो आघवी बोली । सांग पां सर्पफणीची साउली । ते शीतल होईल केतुली । मूषकासी? ॥
हे सर्व बोलणे राहू द्या; परंतु तू असे सांग की, नागाच्या फणीची छाया उंदराला कितपत सुखावह होईल बरे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -