घरमनोरंजनबिग बींनी केलं 'या' मराठी अभिनेत्रीचं कौतुक

बिग बींनी केलं ‘या’ मराठी अभिनेत्रीचं कौतुक

Subscribe

नुकताच गोवा येथे पार पडलेल्या 'इफ्फी' आणि 'न्यूयॉर्क साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये उषा जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

बॉलीवूडचे महानायक बिग-बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांची कौतुकाची थाप पाठीवर बसणे ही चित्रपट कलाकारांसाठी मोठी बाब ठरते. नवोदित, उदयोन्मुख कलाकारांच्या कलेला अमिताभ बच्चन नेहमीच दाद देतात. बिग-बींची अशीच कौतुकाची थाप पडली आहे मराठी अभिनेत्री उषा जाधवच्या पाठीवर. त्याचे झाले असे की, नुकताच गोवा येथे पार पडलेल्या ‘इफ्फी’ आणि ‘न्यूयॉर्क साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये उषा जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ही बातमी उषाने तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केली. उषाच्या कामगिरीबद्दल बिग-बींच्या लक्षात येताच त्यांनीसुद्धा ट्विटरवर उषा जाधवचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

बिग-बींचं ट्विट

उषाचे अभिनंदन करताना बिग-बींनी ट्विट केलं की, ‘मला अभिमान आहे की मला तुमच्यासोबत ‘भूतनाथ रिटर्न्स’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. तसंच, तुमच्या आई-वडिलांसाठीही हा अभिमानाचा क्षण असेल.’

‘माई घाट’ – आईच्या संघर्षाची कहाणी

अभिनेत्री उषा जाधव हिचा ‘माई घाट’ या बायोपिक सिनेमामधील अभिनय वाखाणण्याजोगा आहे. ‘माई घाट’ या बायोपिक सिनेमामध्ये एका आईच्या एकुलत्या एक मुलाला पोलिसांकडून छळ करून ठार मारले जाते. आपल्या मुलाच्या मृत्युनंतर त्याला न्याय मिळावा याकरता अनेक दशकांहून अधिक काळ या आईने केलेल्या संघर्षाची ही खरी कहाणी आहे. अनंत महादेवन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून मोहिनी गुप्ता या त्याच्या निर्माता आहेत. ‘माई घाट: क्राईम नं. १०३/२००५’ या मराठी चित्रपटातील प्रभा माईन या भूमिकेसाठी उषाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. आठ देशांतील चौदा चित्रपटांतून पहिल्या सहामध्ये निवड झाल्यानंतर ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’, ‘संकलन’ व ‘छायाचित्रण’ असे पहिल्या श्रेणीतील तीन महत्वाचे पुरस्कार पटकावून बाजी मारलेला आजपर्यंतचा हा एकमेव मराठी चित्रपट आहे.

- Advertisement -

अभिनेत्री उषा जाधव विषयी

उषा मुळची कोल्हापूरची असून तिचं शालेय आणि अभिनयाचं शिक्षण तिथंच झालं. मधुर भंडारकर यांच्या ‘ट्रॅफिक सिग्नल’ या सिनेमातून उषाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तर २०१२ मध्ये ‘धग’ या मराठी सिनेमातील अभिनयामुळे उषाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अपार कष्ट आणि मेहनतीने यशाची शिखरे गाठून उषाने मराठी मनाचे नाव उंचावले आहे. ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘धग’, ‘भूतनाथ रिटर्न्‍स’, ‘स्ट्रायकर’, ‘वीरप्पन’, ‘लाखों में एक’ अशा अनेक चित्रपटांत तिनं भूमिका साकारल्या आहेत. ‘धग’ या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -