माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांना उत्तर प्रदेश न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. उत्तर प्रदेश न्यायालयाने आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणात हा निर्णय दिला आहे. पाच वर्षांपूर्वी जयाप्रदा यांनी आचारसंहितेचा भंग केला होता. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. तसंच इतर दोन प्रकरणाच्या सुनावणीलाही जया प्रदा उपस्थित राहिलेल्या नाहीत. जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही लागू करण्यात आला आहे. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतरही जया प्रदा न्यायालयासमोर आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, भारतीय जनता पक्षाने चित्रपट अभिनेत्री जया प्रदा यांना रामपूर लोकसभा जागेसाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी युतीचे उमेदवार आझम खान यांच्या विरोधात उमेदवार म्हणून उभे केले होते. निवडणूक प्रचारादरम्यान जयाप्रदा यांच्यावर आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. हा आरोप लागण्याचं कारण म्हणजे त्यांनी नूरपुर या गावात रस्त्याचं उद्घाटन केलं. या प्रकरणात जयाप्रदा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याच प्रचाराच्या वेळी जया प्रदा या कैमरी भागातल्या पिपलिया गावात पोहचल्या तेव्हा तिथल्या सभेत त्यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं. हे प्रकरणही पोलीस ठाण्यात गेलं आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जयाप्रदा बराच वेळ कोर्टात हजर झाल्या नाहीत. त्यानंतर न्यायालयाने अनेकवेळा अजामीनपात्र वॉरंटही बजावले. मंगळवारीही कोर्टात सुनावणी होणार होती, मात्र जयाप्रदा कोर्टात पोहोचल्या नाहीत. त्यानंतर न्यायालयाने सीआरपीसी कलम 82 अंतर्गत कारवाई केली आहे.
जयाप्रदा यांना फरार घोषित करण्यात आलं आहे
2019 मध्ये घडलेल्या दोन प्रकरणांमध्ये कैमरी आणि स्वार ठाण्यात दोन्ही प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे. त्यानंतर विशेष न्यायालयात चार्जशीट फाईल करण्यात आली. जया प्रदा यांची साक्ष या प्रकरणात नोंदवायची आहे. गेल्या काही तारखांना त्यांना बोलवण्यात आलं. यानंतर त्यांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्या कोर्टात हजर झाल्या नाहीत. यानंतर आता न्यायालयाने जयाप्रदा यांना थेट फरार घोषित केलं आहे.
#WATCH | Rampur, UP: Amarnath Tiwari, Senior prosecution officer, MP/MLA Court says, “Former MP and actor Jaya Prada, against whom election code violation cases were registered in 2019, has been declared absconder in the case under section 82 of CrPC. The court has ordered action… pic.twitter.com/t99t7s8mdQ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 28, 2024
अंतिम तारीख दिली
त्यावर न्यायालयाने जयाप्रदा यांच्यावर सीआरपीसी कलम 82 अन्वये कारवाई केली असून पोलीस अधीक्षकांना अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करून 6 मार्च रोजी जयाप्रदा यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोण आहेत जया प्रदा?
जया प्रदा अभिनेत्री असण्यासह राजकारणातदेखील सक्रीय आहेत. कन्नड, तामिळ, मल्याळम, बंगाली, मराठी, हिंदी अशा वेगवेगळ्या भाषांतील सिनेमांत विविधांगी भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 2004 ते 2014 या काळात त्या उत्तर प्रदेशातील राजपूर येथील खासदार होत्या. मवाली, तोहफा, आखिरी रास्ता, औलाद, घर-घर की कहानी, मैं तेरा दुश्मन, ऐलान-ए-जंग, जादुगर आणि आज का अर्जुन, अशा अनेक सिनमांचा त्या भाग आहेत. भारतीय मनोरंजनसृष्टीतील महान अभिनेत्रींपैकी जया प्रदा एक आहेत.