घरमनोरंजनप्रेक्षकांना आकर्षित करणारा चुंबक

प्रेक्षकांना आकर्षित करणारा चुंबक

Subscribe

लोखंडाला चुंबकापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. तरी लोखंड हे चुंबकाकडे आकर्षिलं जातंच. त्याचप्रमाणे माणसांचही असतं, आपण एखाद्या व्यक्तीपासून कितीही दूर पळण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती आपल्या मागे लागतेच. असच काहीसं घडलंय ‘चुंबक’ या चित्रपटात. गीतकार स्वानंद किरकिरे यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी त्यांनी साकारलेला प्रसन्न ठोंबरे तुम्हाला चित्रपटात खिळवून ठेवतो.

भालचंद्र उर्फ बाळू (साहील जोशी) आणि डिस्को (संग्राम देसाई) हे दोघं मित्र मुंबईत छोटंमोठं काम करून आपला उदरनिर्वाह चालवत असतात. बाळू हा एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत असतो. गावी असलेल्या आई आणि आजीची जबाबदारी ही बाळूवर असते. गावच्या नवीन सुरू झालेल्या एसटी स्टॅण्डवर रसवंतीगृह काढायचं त्याचं स्वप्न असतं. त्यासाठी तो पैसेही गोळा करत असतो. सुरूवातीला एका मित्राच्या नादी लागून एका स्कीममध्ये तो पैसे गुंतवतो पण त्याची फसवणूक होते. आता जवळ एकही रूपया शिल्लक राहिलेला नसतो. शातच त्याचा मित्र डिस्को त्याला एक आयडीया देतो. या कल्पनेनुसार सगळ्यांना लॉटरी लागल्याचे एसएमएस पाठवायचे आणि लोकांनी बक्षीसासाठी फोन केला की, त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी म्हणून वीस हजार रूपये घ्यायचे आणि अखेर डिस्कोच्या या आयडीमध्ये प्रसन्न ठोंबरे नावाचा मासा अडकतोच. हे दोघे प्रसन्नला रिझर्व्ह बँकेजवळ पैसे घेऊन बोलवतात. पैसे घेऊन आलेल्या प्रसन्नला बघून बाळू थोडा हळवा होते. आपण एका साध्या गरीब माणसाला फसवतोय याची जाणीव त्याला होते. पण डिस्कोपुढे त्याच काहीच चालत नाही. प्रसन्न हा काहीसा भोळसट, गतीमंद असतो. बाळू प्रसन्नकडून घेतलेले पैसे परत करण्याचा निर्णय घेतो आणि सुरू होतो बाळू आणि प्रसन्नचा प्रवास. लोह- चुंबकाप्रमाणे हे दोघं पुढे सतत एकमेकांच्या संपर्कात येतात. भोळसट प्रसन्न आणि साधा बाळू यांच्यात संपूर्ण चित्रपटात घडणाऱ्या गमतीजमती प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

- Advertisement -

संपूर्ण चित्रपटात प्रसन्न, बाळू आणि डिस्को यांच्या मुख्य भूमिका आहेत. या तिघांनी चित्रपटात आपल्या सहज वावरण्याने गंमत आणली आहे. स्वानंद किरकिरे यांना प्रसन्न ठोंबरेच्या भूमिकेत बघण्यात एक वेगळी मज्जा आहे. आपल्या बोलण्यातून, देहबोलीतून उत्तम प्रसन्न ठोंबरे जमून आला आहे. हा वेगळा चित्रपट ठरण्यामागे साहील जोशी आणि संग्राम देसाई यांचाही मोठा हातभार आहे. या तिघांचाही हा पहिलाच चित्रपट आहे हे चित्रपट बघताना जाणवत नाही.

मात्र चित्रपटातील गाणी फारशी जुळून आली नाहीत. गाण्याचे बोल, संगीत लक्षात राहात नाही. तरी स्वानंद किरकिरे चित्रपटात आहे म्हटल्यावर त्यांनी लिहीलेलं एखादं सुंदर गाणं चित्रपटात असायला हवं होतं असं वाटतं राहतं. पण सिनेमोटोग्राफी उत्तम जमून आली आहे.

- Advertisement -

चित्रपटाची कथा हलकी फुलकी असली तरी ती मनाला भावते. एक उत्तम दर्जेदार कलाकृती पडद्यावर बघण्याचा आनंद हा चित्रपट देतो.

कलाकार – स्वानंद किरकिरे, साहील जोशी, संग्राम देसाई
दिग्दर्शक – संदीप मोदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
स्वानंद किरकिरे यांना प्रसन्न ठोंबरेच्या भूमिकेत बघण्यात एक वेगळी मज्जा आहे. आपल्या बोलण्यातून, देहबोलीतून उत्तम प्रसन्न ठोंबरे जमून आला आहे. पहिलाच प्रयत्न उत्तम.प्रेक्षकांना आकर्षित करणारा चुंबक