घरमनोरंजन'नाळ' सुपरहिट! पहिल्याच आठवड्यात कोट्यावधींची कमाई

‘नाळ’ सुपरहिट! पहिल्याच आठवड्यात कोट्यावधींची कमाई

Subscribe

नाळ’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यातच १४ कोटींची विक्रमी कमाई केली असून, तो यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.

झी स्टुडिओजची व नागराज मंजुळेंची प्रस्तुती असलेला आणि सुधाकर रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेला ‘नाळ’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. ‘नाळ’ प्रदर्शित झाला आणि रसिकांनी चित्रपटगृहांवर एकच गर्दी करत चित्रपटावर आपल्या पसंतीची मोहोर उमटवली. पहिल्या सात दिवसांतच या चित्रपटाने सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड झळकावत तब्बल १४ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवणा-या ‘नाळ’ चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही आपली तुफानी घोडदौड कायम ठेवली असून, प्रेक्षागृहातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रेक्षक भारावून गेल्याच्या प्रतिक्रिया देत आहे. सोशल मीडियावरुनही चित्रपटाबद्दल, लहानग्या चैतूच्या म्हणजेच श्रीनिवास पोकळेच्या अभिनयाबद्दल प्रेक्षक भरभरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. ‘नाळ’ ने तब्बल १४ कोटींची कमाई करत सैराट पाठोपाठ पहिल्याच आठवडयात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरून एक नवा विक्रम रचलाय.

राज्यभरात ‘नाळ’चा दणका

मुंबई पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि इतर शहरांमध्येही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय. याशिवाय महाराष्ट्रासह हा चित्रपट इतर राज्यातही प्रदर्शित झाला असून, तामिळ आणि मल्याळम भाषिक चित्रपटांची मक्तेदारी असणाऱ्या चेन्नई आणि बंगलोर इथे प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी खेचण्यात ‘नाळ’ यशस्वी झाला आहे. यातील चैतन्यच्या भावविश्वाने प्रेक्षकांच्या थेट काळजाला हात घातलाय. दुसऱ्या आठवड्यातसुद्धा हा चित्रपट सुमारे ४५० चित्रपटगृहे आणि ११,००० खेळांमधून (शो) प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.

- Advertisement -

नाळच्या या यशाबद्दल दिग्दर्शक सुधाकर रेड्डी म्हणाले, “नाळ हा चित्रपट बनवणं हे माझं स्वप्न होतं. हा चित्रपट बनवताना तो प्रत्येकाला भिडावा असाच आमचा उद्देश होता. आज ‘नाळ’ ला मिळालेलं यश पाहता आम्ही आमच्या उद्देशात यशस्वी झालोय असं वाटतंय. याचा मला आणि पूर्ण टीमला खूप आनंद होतोय.”

‘नाळ’चे निर्माते आणि अभिनेता नागराज मंजुळे म्हणाले, “सर्वसामान्य माणसांचं जगणं रूपेरी पडद्यावर मांडणाऱ्या, लोकभाषेत अभिव्यक्त होणाऱ्या एका साध्या तरीही तरल कथेला प्रेक्षकांनी दिलेला हा उदंड प्रतिसाद म्हणजे रसिकांच्या अभिरुची संपनतेची पावती आहे. मराठीमध्ये चांगल्या सिनेमाच्या पाठिशी प्रेक्षक नेहमी उभा राहतो हे या यशामधून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यासाठी मी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे आभार तर मानेनच पण त्यांच्या सुजाण अभिरुचीचेही अभिनंदन करीन.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -