घरफिचर्सकलाकार आणि पैसा, असा...आणि असाही!

कलाकार आणि पैसा, असा…आणि असाही!

Subscribe

दिलीपकुमारनं म्हटलं आहे... मी माझ्याही नकळत हळूच त्या पैशानं भरलेल्या बॅगकडं बघत होतो. त्यावेळी मला पैशांची खूपच गरज होती. वार्‍यानं ती बॅगही जराशी हलत होती. माझ्या मनासारखीच तिची अवस्था झालीय, अन ती माझ्याकडंच बघतीय, असं मला वाटलं. पण नंतर मात्र मी नम्रपणानं त्याची गोष्ट पुढं ऐकण्याची विनंती नाकारली.

पैशासाठी लोक काहीही करतात आजकाल. म्हणजे सर्वच नाही, पण बरेच जण त्यात काही गैर आहे, असं मानत नाहीत. त्यामुळेच काही प्रसिद्ध कलाकार पुरुष व महिलाही मंगलकार्यात हजेरी लावायला जातात. मग वधूवर माहितीचे असोत का नसोत. तिथं लोकांना म्हणजे अगदी यजमानांनाही वधुवरांपेक्षा त्यांच्यातच रस असतो म्हणे. असे कलाकार उपस्थित राहिले म्हणजे सारं काही भरून पावलं, असं त्यांना वाटतं. वधूवरालाही त्यांच्याबरोबर छायाचित्रे का व्हीडिओ शूटिंग केलं की मोठं समाधान मिळतं म्हणे, आणि ते द्विगुणित होतं असे कलाकार बारातमध्ये नाचतात तेव्हा! त्यासाठी अर्थात पैसेही तेवढेच भक्कम मोजावे लागतात त्यांना, असं जाणकार सांगतात. अशा या युगात काहीजण मात्र पैसा म्हणजे सारं काही, अशी भावना बाळगत नाहीत. कारण आपला आत्मसन्मानही गमावण्याची त्यांची तयारी नसते.

थोडं जुनं उदाहरण आहे. दिलीप कुमारनं त्यांच्या आत्मचरित्रात दिलंय. साधारण भारत स्वतंत्र झाला त्या काळातलं. युद्धामुळे काही लोकांच्या हातात मुबलक पैसा खेळत होता. आणि त्यांना निर्माते होऊन मिरवण्याची मोठी हौस असे. कलाकाराला ते भक्कम मानधन देण्यास का कू करत नसत. असाच एक होतकरू निर्माता एकदा दिलीप कुमारकडे आला. अर्थातच त्यानं आपल्या चित्रपटात भूमिका करावी म्हणून, कारण दिलीप कुमार तयार झाला, तर त्याला चित्रपटावर लावलेला पैसा आणि त्यावरील नफा जास्त मिळण्याची शक्यता होती. तो एक बॅग बरोबर घेऊन आला होता. त्यात नोटा खच्चून भरलेल्या होत्या. आणि दिलीप कुमारला हे कळावं म्हणून त्यानं ती बॅग अर्धवट उघडूनच ठेवली होती.

- Advertisement -

प्राथमिक, औपचारिक बातचीत झाली. त्यानंतर कसं येणं केलंत, असं दिलीपकुमार यांनी विचारलं. त्यानं अर्थातच तू माझ्या चित्रपटात काम करावंस अशी माझी इच्छा आहे, असं सांगितलं. नंतर अर्थातच प्रघाताप्रमाणं तो आपल्या चित्रपटाची कथा सांगू लागला. दिलीपकुमार ऐकत होते. कारण कथा आवडली तरच पुढचं पाऊल उचलायचं, एरवी नाही, अशी त्याची रीत होती. कथा पुढं सरकत होती. नायक आता खेड्यात आला होता. तिथं तो चक्कर मारण्यासाठी बाहेर पडतो तो म्हशीवर बसून, असं त्या होतकरू निर्मात्यानं सांगितलं. दिलीपकुमारनं एकदम त्याला थांबवलं. त्यानं प्रश्नार्थक मुद्रा केली तेव्हा दिलीप कुमारनं विचारलं. गावात भटकणं ठीक आहे, पण म्हशीकरून का? त्यावर त्या निर्माता बनण्याची इच्छा असलेल्यानं सांगितलं की, माझी ती विनोदाची कल्पना आहे.

दिलीपकुमारनं त्याला विचारलं… मी कथेमध्ये काही बदल केले तर चालेल का? त्यावर तो होतकरू निर्माता खूश झाला. त्याला वाटलं की, लागला मासा गळाला. तो खुशीत म्हणाला, हरकत नाही, तुमच्या मनाप्रमाणं बदल करा, पण एक मात्र ध्यानात ठेवा, तो नायक म्हशीवरून फेरफटका मारतो, तो प्रसंग मात्र कायम राहायला हवा.दिलीपकुमारनं म्हटलं आहे… मी माझ्याही नकळत हळूच त्या पैशानं भरलेल्या बॅगकडं बघत होतो. त्यावेळी मला पैशांची खूपच गरज होती. वार्‍यानं ती बॅगही जराशी हलत होती. माझ्या मनासारखीच तिची अवस्था झालीय, अन ती माझ्याकडंच बघतीय, असं मला वाटलं. पण नंतर मात्र मी नम्रपणानं त्याची गोष्ट पुढं ऐकण्याची विनंती नाकारली. क्षणभर त्याला मी काय बोललो त्यावर विश्वासच बसला नाही. आपली एवढी चांगली गोष्ट आणि जोडीला भरपूर पैसा असा आकर्षक प्रस्ताव मी नाकारतो आहे. यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण माझ्यासाठी तो बरंच काही शिकवून जाणारा अनुभव होता. त्या काळी अशा प्रकारच्या होतकरू निर्मात्यांचं पेवच फुटलं होतं. त्यांना माझ्यासारख्या अभिनेत्यांच्या लोकप्रियतेचा मिळेल तितका फायदा उठवायचा होता. पण ज्याप्रकारे अगदी चटकन मी ती पैशानं भरलेली बॅग घ्यायला नकार दिला त्यामुळे माझा आत्मसन्मान आणि आपल्या अटींवरच काम स्वीकारायचं हा माझा निश्चय पक्का झाला.

- Advertisement -

दुसरं उदाहरण वेगळं आहे. पैशाचंच… बडे गुलाम अली खान यांचं नाव ऐकलेलं नाही, आणि त्यांची थोरवी माहीत नाही, असा संगीतप्रेमी विरळाच. के. असीफ यांना त्यांचं गाणं मुगल ए आझमसाठी पाहिजे होतं. अकबराच्या दरबारी अन्य गायक कसा चालणार? खाँसाहेब चित्रपटासाठी गात नाहीत, असं असीफ यांना बर्‍याच जणांनी सांगितलं होतं. पण त्यांचा हट्ट कायम होता. ते या चित्रपटासाठी गातीलच असं ते ठासून सांगत होते. ते खाँसाहेबांना भेटले. तेव्हा खरंच खाँसाहेब चित्रपटात गाण्यासाठी तयार नाहीत असं त्यांना दिसलं. पण असीफच ते, ते म्हणाले तुम्ही पैशांची काळजी करू नका, तुमच्या मैफिलीच्या बिदागीपेक्षाही मी जास्त पैसे देईन. पण तुम्ही गायला हवं. खाँसाहेब चक्रावले. आता काय करावं म्हणजे ही ब्याद टळेल, असा विचार ते करू लागले.

खरं तर नकाराचाच एक प्रकार होता तो. त्यांनी विचार केला, अव्वाच्या सव्वा मागणी करावी, म्हणजे झालं. हा माणूस काही ती पुरी करणार नाही. असं म्हणून त्यांनी सांगितलं, पंचवीस हजार रुपये घेईन.(1950 च्या दशकातील ही रक्कम आज त्याच्या अनेक पटींनीच मोजावी लागेल.) पण जराही चलबिचल न होता असीफ मियाँ म्हणाले. ठीक आहे. असं म्हणून त्यांनी काही हजारांची रक्कम आगाऊच दिली. पुढे काय झालं ते सर्वांना माहीत आहे. ते गाणं, शुभ दिन आयो… खाँसाहेब मनापासून गायले. त्यांची एकच अट होती. त्यांना चित्रपटाचा काही भाग दाखवण्यात आला होता आणि त्यातील मधुबाला त्यांना भलतीच आवडली होती. त्यामुळं ते असीफना म्हणाले, अनारकलीला पुढे ऐकायला बसवा म्हणजे मी गातो…ही अट कोण नाकारणार?

आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -