घरफिचर्सपुतळा, प्रतिकांचे राजकारण नको

पुतळा, प्रतिकांचे राजकारण नको

Subscribe

विचारधारा, तत्वज्ञान, राजकीय भूमिका वा संघटनांची प्रतिके सर्वत्र असतात. कधी ती नेत्यांच्या प्रतिमांमध्ये असतात, तर कधी ती विचारांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आकारांची रेखाटनांची असतात. जेव्हा अशी प्रतिके एका बाजूसाठी पक्षपात करतात, तेव्हा त्यातून दबलेल्या भावनांची दुसरी बाजू तयार होत असते. तो विरोध दिसू लागला मग त्यातले बलदंड असतात, ते गट दुसर्‍याला थेट चेपून टाकत असतात; पण अशा दडपण्याने कधी दुसरी बाजू संपत नसते.

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. त्यासाठी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. इतके पैसे खर्च करून खरंच हा पुतळा उभारण्याची गरज होती का? तो पैसा गरिबांसाठी खर्च केला असता तर, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. काहींनीतर त्या पुतळ्यासमोर उभे राहून मोदींनी आपली उंची तपासण्याचाही सल्ला दिला. भारत या देशात असे सल्ले देणारे अनेक असतात. विशेषत: जेव्हा विकास किंवा प्रगतीची कामे होत असतात तेव्हा त्यापेक्षा प्रायॉरिटी ठरवणारी कामे का केली नाहीत म्हणून दुषणे दिली जातात. मात्र मग हिच कामे प्रायॉरिटीची होऊन जातात. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेची गरज काय? त्यापेक्षा गरिबांसाठी तो पैसा खर्च करा, असे म्हटले जात होते. आता मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेच प्रायॉरिटी झाला आहे.

पुतळ्यांबाबत अजून एक बौद्धिक युक्तिवाद केला जातो. तो म्हणजे पुतळा हा निर्जिव असतो. त्यामुळे अशा प्रतिक, पुतळ्याने कुठल्या भावना आणि निष्ठा उत्पन्न होत नाहीत. त्यामुळे असे पुतळे हे केवळ आणि केवळ राजकारणासाठी उभारले जातात. मध्यंतरी त्रिपुरात भाजपला मोठे बहुमत मिळाले. त्यानंतर त्रिपुरात लेनिन यांचा पुतळा तोडण्यात आला. त्यावरून देशभर एकच गजहब झाला. अनेकांनी या कृत्याला हुकूमशाही, हिटलरशाही म्हणून संबोधले. मात्र त्यापूर्वी आणि त्यादरम्यान, पुण्यात दादोजी कोंडदेव आणि राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेबाबत कोणीही बोलायला तयार नव्हते. पुन्हा बौद्धिक युक्तिवादाचा विचार केला तर, पुतळा हा कुठल्या भावना आणि निष्ठा उत्पन्न करत नसेल तर सरदार पटेल, दादोजी कोंडदेव, गडकरी यांच्या पुतळ्याबाबतच ते लागू होते? लेनिनचा पुतळ्याला मात्र ते लागू होत नाही. तो उद्ध्वस्त झाला अथवा त्याची निर्मिती झाली की भावना, निष्ठा जागृत होतात काय? मध्यंतरी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे म्हणून तेथे रणगाडा, लढावू विमाने हे राष्ट्रप्रेमाचे प्रतिक म्हणून बसवण्याचे ठरवले होते. तेव्हाही त्याला विरोध झाला होता.

- Advertisement -

रणगाडा वा लढावू विमानांच्या प्रतिकांनी राष्ट्रप्रेम जन्माला येत नाही. असे त्यावेळी ठामपणे सांगितले गेले होते. ज्या विद्यापीठात भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा दिल्या गेल्या, तिथे देशप्रेम नक्कीच निपजत नाही, हे वेगळे समजावण्याची गरज नाही. अशा घोषणा दिल्या जातात, तेव्हा त्याची प्रतिक्रियाही उमटत असते. त्या घोषणांनी ज्यांच्या भावना व देशप्रेमाला धक्का लागला होता, त्यांना मग तिथे देशाच्या सुरक्षेचे प्रतिक असलेल्या रणगाड्यांची गरज वाटू लागलेली होती. उलट तशा प्रतिकांनी आपल्या देशविरोधी घोषणांच्या मक्तेदारीचा पाया उखडला जाण्याची भीती दुसर्‍या बाजूला वाटलेली होती. म्हणूनच तशा कल्पनेला कडाडून विरोध झाला होता. ती प्रतिके तिथे लावण्यापूर्वीच तो विचार उखडण्याचा उत्साह कोणी कशाला दाखवला होता? ती दुसर्‍या विचारांची गळचेपी होती. पण अशा दबावाला विचार म्हणायचे आणि आपण लादलेल्या प्रतिकांची महती सांगायची, असा हा खेळ असतो. कारण विचारधारा, तत्वज्ञान, राजकीय भूमिका वा संघटनांची प्रतिके सर्वत्र असतात.

कधी ती नेत्यांच्या प्रतिमांमध्ये असतात, तर कधी ती विचारांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आकारांची रेखाटनांची असतात. जेव्हा अशी प्रतिके एका बाजूसाठी पक्षपात करतात, तेव्हा त्यातून दबलेल्या भावनांची दुसरी बाजू तयार होत असते. तो विरोध दिसू लागला मग त्यातले बलदंड असतात, ते गट दुसर्‍याला थेट चेपून टाकत असतात. पण अशा दडपण्याने कधी दुसरी बाजू संपत नसते. कारण माणूस हा विचार करणारा प्राणी आहे आणि तो विवेकाने आपल्या भूमिकांना मुरड घालून योग्य संधीची प्रतीक्षा करत असतो. अनेकदा त्यात दोनचार पिढ्याही निघून जातात. पण चिरडलेला मुस्कटदाबी केलेला आवाज व बाजू मान खाली घालून सर्व सहन करत आपल्या संधीची प्रतीक्षा करत असते. जेव्हा ती संधी येते, तेव्हा ज्वालामुखी फाटत असतो.

- Advertisement -

कालपरवा महाराष्ट्रात भीमा कोरेगावचा विषय रंगला होता. त्या निमित्ताने शनिवारवाड्याच्या परिसरात एक मोठा सोहळाही साजरा झाला. त्यात सहभागी व्हायला आज वल्लभभाईंच्या पुतळ्याच्या नावाने रडणार्‍यांपैकी अनेकजण अगत्याने हजर होते आणि त्या सोहळ्याला नवा एल्गार असे विशेषण चिकटवण्यात आलेले होते. त्या मंचावर बसलेले कितीजण असेच पुतळे फोडणे व उद्ध्वस्त करण्यातला पुरूषार्थ सांगणारे होते? पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा उखडून नदीपात्रात फेकून देणारे त्या व्यासपीठावर नव्हते काय? किल्ल्यावरील शिवरायांचा कुत्रा म्हणून उभे असलेले शिल्प उखडणारे वा लालमहालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा रातोरात कापून काढणार्‍यांचा त्या मंचावर कोणी विरोध केला होता काय? पुतळे सगळेच निर्जीव असतात आणि सहिष्णूता एकाच बाजूची दाखवून कोणाला संहिष्णूतेचे मक्तेदार होता येत नसते. झुंडी एकाच बाजूला नसतात.

आपल्याला पहिली संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत झुंडी असतात आणि आज त्रिपुरातील दुसर्‍या झुंडीला शिरजोर होण्याइतकी मते मिळालेली आहेत. आधी जी झुंड सत्तेत होती, ती मतांसाठी जीवंत माणसांनाही दगडांनी ठेचून मरायला मागेपुढे बघत नव्हती. आज दुसरी झुंड त्याच पद्धतीने आपला उन्माद दाखवते आहे. त्यात कोणावर पांघरूण घालण्याची गरज नाही. त्यापैकी आज कोणी दुर्बळ झाला म्हणून त्याने आपणच अत्याचाराचे बळी असल्याचे नाटक रंगवून सहानुभूतीचा वाडगा फिरवण्याचे काही कारण नाही. ज्याची सुरुवात करता त्याची कडू फळेही चाखायची तयारी ठेवली पाहिजे. जेव्हा कुठलेही प्रतिक अन्याय अत्याचार व छळवादाचे प्रतिक होते, तेव्हा त्याला कितीही पावित्र्य चिकटवून वा संस्कृतीची झालर लावून उपयोग नसतो. असली नाटके युक्तीवादात चालतात आणि झुंडी सबळ दुर्बळातली निर्दय निष्ठूर लढाई असते. त्यात वैचारिक लुडबुड चालत नसते.

कारण झुंडी निर्बुद्ध असतात. ही झुंड कधी उजवी तर कधी डावी असते. तिला नियंत्रित करणारे प्रत्येकजण आपल्या स्वार्थाप्रमाणे तिचा वापर करत असतात. त्यातूनच मग वेगवेगळे प्रतिक आणि पुतळ्यांची निर्मिती होत असते. भारत हा देश डोक्याने नव्हेतर हृदयाने चालतो असे म्हणतात. येथे बुद्धीपेक्षा भावनेला जास्त महत्त्व आहे. भावना जेव्हा बुद्धीपेक्षा वरचढ होतात तेव्हा सारासार विचार खुंटतो. त्यातून मग भव्यदिव्य पुतळे आणि प्रतिकांची निर्मिती होते. त्यासाठी केवळच एकाच विचारधारेला दोषी ठरवून चालणार नाही. आपलीच विचारधारा इतरांपेक्षा श्रेष्ठ असा आग्रह धरणारे प्रत्येकजण त्याला दोषी असतात. लेनिनचा पुतळा फुटल्यावर ज्यांना दु:ख होते त्यांना दादोजी कोंडदेव, गडकरी यांचे पुतळे तुटल्यावर आनंदाच्या उखळ्या का फुटतात? किंवा सरदार पटेल यांच्या पुतळ्याने ज्यांना हर्षवायू होतो ते लेनिनचा पुतळा तुटल्यावरही आनंद का साजरा करतात? याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा. या देशात भव्य दिव्य काही व्हावे, याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. मात्र त्यातून राजकारण होत असेल तर मात्र अशा कृत्यांना वेळीच आवार घालायला हवा.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -