घरफिचर्सजनजागृतीची मात्राही आवश्यक

जनजागृतीची मात्राही आवश्यक

Subscribe

जागतिक आर्थिक महासत्तेच्या दिशेने कूच केलेल्या चीनची व्युत्पत्ती असलेल्या करोना विषाणूने सार्वत्रिक हाहाकार माजवला आहे. अवघ्या जगाला कवेत घेणार्‍या करोनाची दहशत रावापासून रंकापर्यंत सर्वच घटकांनी घेतल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी चीनमधल्या वुहान शहरात करोनाची लागण झाल्याचे प्रथम निदर्शनास आले. हळूहळू करोनाचा प्रादुर्भाव चीनभर पसरला आणि इतर सव्वाशे देशांत त्याचा प्रवेश झाला. या व्यापकतेमुळे जागतिक आरोग्य संघटनेने त्याला वैश्विक महामारीचे स्वरूप देऊन योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले. यापूर्वी अशी परिस्थिती क्वचितच निर्माण झालेली असावी. चीन, इटली, इराण, अमेरिका या देशांसोबत भारतातही करोना विषाणूने प्रवेश केला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनामुळे प्राण गमावलेल्यांची संख्या नगण्य असली तरी त्याची दहशत त्या देशांमधील वातावरणापेक्षा वेगळी नाही. आतापर्यंत भारतात दीडशेच्या जवळपास करोनाग्रस्त असल्याचे शासकीय आकडेवारी सांगत असली तरी या विषाणूची भीती देशभरातील दीडशे कोटी लोकांना सतावत आहे. घरे, वसाहती, शासकीय व खासगी आस्थापने, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे एवढेच नव्हे तर रस्तोरस्ती करोना विषाणूने घबराटीचे वातावरण पसरले आहे. किमान त्याच्या चर्चेने सारे काही व्यापले आहे. महाराष्ट्रही करोनाच्या कमालीच्या सावटाखाली आहे. वास्तविक, केवळ बाहेरच्या देशांतून आलेल्या निवडक व्यक्ती सोबत ही बिमारी घेऊन आल्याने अस्वस्थता पसरली आहे. भितीपोटी सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. प्राथमिक उपाययोजना म्हणून चालू महिन्याच्या अखेरपर्यंत दक्षता घेण्याचे मुक्रर झाले आहे. तथापि, याचा देशाच्या एकूण वाटचालीवर दूरगामी परिणाम होणार हे निश्चित आहे. करोनाचा फैलाव अथवा त्यामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण आतापर्यंत जरी मर्यादित असले तरी त्यामुळे जग कमालीचे सचिंत झाल्याचे नाकारता येणार नाही. केवळ मास्क अथवा सॅनिटायझर वापरून या महामारीचा बिमोड करता येणे शक्य नाही. त्यासाठी जनजागृतीच्या माध्यमाचा तात्काळ व प्रभावी वापर होणे गरजेचे आहे. आताच्या परिस्थितीत बंद अथवा बंदीच्या कचाट्यात सापडलेल्या अनेक लहान-मोठ्या उद्योग-व्यवसायांवर अवलंबून असणार्‍यांची संख्या कमी नाही. या उद्योग-व्यवसायांचा गाडा चालला तर त्यावर विसंबून असणार्‍यांच्या हाती रोजगाराची पत्ती पडणार आहे. शासन अथवा प्रशासन आपापल्या परीने करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्थाही या कामात हिरीरीने सहभागी झाल्या आहेत. तथापि, हे प्रयत्न नक्कीच पुरेसे नाहीत. एखाद्या सामाजिक वा राजकीय घटनेनंतर भाष्य करण्यात पुढावा घेणारे राजकीय पक्ष अथवा माध्यमप्रेमी या कामात मात्र पुढे होताना दिसून येत नाही. शेवटी इथला श्रेयवाद कसा मोजणार, या हिशेबाने हे बापुडे स्वत:ला या सामाजिक जागृतीच्या यज्ञात समिधा टाकण्यापासून रोखत असावेत. भारतासारख्या देशात इतर ठिकाणाहून येणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. पर्यटन अथवा इतर अनेक कारणांसाठी येणार्‍या या मंडळींना आपल्याकडे येण्यापासून रोखण्याची कर्तव्यकठोरता आधी अंमलात आणायला हवी. कारण आतापर्यंत लागण झालेल्या बहुतेक सर्वांनीच करोनाची देण इतर ठिकाणावरून आणल्याचे सिध्द झाले आहे. केवळ स्थानिक ठिकाणी बंदसदृश्य परिस्थिती निर्माण करण्यातून करोना नियंत्रणाची कार्यसिध्दी होईल, या भाबड्या मानसिकतेत वावरण्यात काय हाशील आहे? करोनाची व्यापकता लक्षात घेता दक्षता असायलाच हवी, मात्र त्याचा अधिक बाऊ होणे समाजमनाला अतिवेदनादायी होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. बनावट मास्क अथवा सॅनिटायझर अव्वाच्या सव्वा दरांत विकणारे समाजाचे शत्रू मानायला हरकत नाही. आपले बांधव चिंताक्रांत असताना, मृत्यूच्या छायेत वावरत असताना काही महाशयांना स्वत:चे खिसे भरण्याची दुर्बुध्दी सुचावी, यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते असू शकते? सध्याची परिस्थिती लक्षात घेता सर्वांनी एकीची वज्रमूठ बांधण्यावाचून गत्यंतर नाही. शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या निर्देशांचे कटाक्षाने पालन करताना ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचतील अशी जागृती आता अपेक्षित आहे. या प्रक्रियेत मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमांची भूमिकाही निर्णायक ठरते. काही वर्षांपूर्वी उद्भवलेल्या स्वाईन फ्लूने अशाच चिंतेच्या वातावरणाची निर्मिती करून देशवासियांना त्रस्त केले होते. त्यावेळी अगदीच शेवटच्या थराला लागण पोहचलेल्यांना मृत्यूने कवटाळले होते, ही वस्तुस्थिती आहे. तथापि, कोणत्याही आजाराची लागण होणे म्हणजे त्याचा शेवट मृत्यू हे प्रमेय जनमाणसावर बिंबवले जाऊ नये. कारण तशा आशयाची मानसिकता अनेक चांगल्यांचे खच्चीकरण करण्यास पूरक ठरते. आजार उद्भवणे ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही. मात्र, त्यावरील योग्य उपाययोजना अशा रुग्णांना ठणठणीत बरे करू शकते, हा संदेश दुर्दैवाने पसरवण्यात आपण सारेच कमी पडतो. करोना विषाणूच्या लागणीवर अजून तरी जगात कुठे लस शोधल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिध्द झालेले नाही. तशा संशोधनावर गतीने काम सुरू आहे. तथापि, त्याची लागण झालेल्यांना विलगीकरण कक्षांमध्ये ठेवण्यात येऊन योग्य उपाय करण्यातून ते बरे होतात, हे अनेक ठिकाणी प्रत्ययास आले आहे. आताची माध्यम सजगता जनजागृती मोहिमेचा भाग होणे गरजेचे आहे. कारण ते केवळ सर्वव्यापी अस्त्रच नव्हे तर त्याची विश्वासार्हता निर्विवाद आहे. सध्या व्यक्तिगत पातळीवर या आजाराची काळजी घेण्याबाबत वैद्यकीय विश्व आवाहन करीत आहे. सल्ला, चाचणी आणि उपचारांसाठी आरोग्य यंत्रणा अविरत कार्यरत आहेत. त्यांना सकारात्मक प्रतिसाद, आवश्यक वाटल्यास सजग मनुष्यबळ आणि मनोबल उंचावणार्‍या पाठिंब्याची गरज आहे. जगभरातील आरोग्य यंत्रणांप्रमाणे भारतातही करोनाच्या मुकाबल्यासाठी योग्य त्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. करोना विषाणूचा पहिल्यांदा उद्भव झालेल्या चीनमध्ये या आजाराची सत्यता सरकार अथवा सर्वसामान्यांपर्यंत जाऊ नये, यासाठी ताठर स्वरूपातील नोकरशाहीने पुरेपूर काळजी घेतली. कारण अशी माहिती दडवून ठेवण्यात आणि लोकांना वस्तुस्थितीपासून रोखण्यात प्रशासनाचा लाभ असल्याचे कारण पुढे केले गेले. आपल्याकडे सुदैवाने, तशी प्रणाली अवलंबण्यात आलेली नाही. जिल्हानिहाय ते राष्ट्रीय स्तरावर करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेण्यात येऊन वस्तुस्थिती जाहीर केली जात आहे. करोनाच्या चर्चेने भीती निर्माण होत असली तरी त्याची प्रत्यक्षात भयावहता काय, याबाबत लोक ज्ञात असतात. तूर्तास तरी ही राष्ट्रीय आपत्ती मानून तिच्या निर्मूलनार्थ व्यक्ती, संस्था स्तरांवर पुढे येऊन जनजागृती हाती घेणे व्यवहार्य उपाययोजनांच्या सूचीतील शीर्षक कलम असावे. प्राप्त परिस्थितीत कोणा व्यक्ती, शासन, प्रशासन अथवा यंत्रणांना दोष देत बसण्यापेक्षा जबाबदार सामाजिक घटक बनण्याचे भान प्रत्येकाने राखावयास हवे. घराघरांचा आणि मनामनांचा ताबा घेतलेल्या समाजमाध्यमांचा यानिमित्त योग्य वापर करणेही गरजेचे आहे. प्रत्येक कुटुंबात आलेली सजगताही व्यापक जनजागृतीचा भाग ठरू शकते. केवळ शिंक, खोकला आणि अंग दुखण्याच्या तक्रारींतून करोनाची लागण झाल्याचा निष्कर्ष काढण्यात येऊ नये. आपले शिक्षण आणि ज्ञान यांची अशाच संयमी व शहाणपणाच्या वृत्तीशी सांगड घातली जावी. करोनाचा भारतातील आणि एकूणच जगभरातील देशांमधील प्रवास अजून किती दिवस आहे, याबाबत कोणतेही आडाखे नाहीत. चीनमध्ये त्यावर शत-प्रतिशत नियंत्रण मिळवल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी उपरोल्लिखित ताठर नोकरशाहीने तसा समाधानाचा बागुलबुवा उभा करून तेथील राज्यकर्त्यांकडून पाठ थोपटून घेतले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भारतासारख्या अखंडप्राय देशात आरोग्य यंत्रणेची मर्यादित सबलता लक्षात घेता करोना ही राष्ट्रीय आपत्ती आणि त्यावरील नियंत्रण ही सामाजिक जबाबदारी समजून तिचा मुकाबला करण्यासाठी सर्व सजग समाज घटकांनी एकत्र येणे अपरिहार्य ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -