घरफिचर्सFlash Back 2020: बॉलिवूडचा लॉकडाऊन ते अनलॉक प्रवास

Flash Back 2020: बॉलिवूडचा लॉकडाऊन ते अनलॉक प्रवास

Subscribe

२०२० हे वर्ष सिनेसृष्टीचे सर्वात कठीण वर्ष होते. नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ल्यासारख्या अनेक घटना देशामध्ये वारंवार घडल्या. मात्र त्याचा फारसा परिणाम सिनेसृष्टीवर झाला नाही. कोरोनाने मात्र बॉलिवूडला हादरवून सोडले. बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवणारे बॉलिवूड ठप्प झाले.

बॉलिवूड म्हणजे झगमगती दुनिया, स्वप्नांचे शहर, रंगीत सोहळे, स्टारडम असलेले कलाकार, बिग बजेट सिनेमे. पण कोरोना महामारीत हा सगळा झगमगाट पूर्णत: झाकोळून गेला. कधीही न थांबणारे बॉलिवूड मात्र कोरोनामुळे थांबले. शुटींग रद्द झाले, कलाकार घरी बसले, चित्रिकरण थांबल्याने बॉलिवूडला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. कोरोनामुळे आर्थिक घडी बिघडली असताना अनेक दिग्गज कलाकारांचे अकाली निधन झाले. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. कोरोनामुळे झालेले बॉलिवूडचे नुकसान हे कधीच भरून न निघणारे आहे.

तीन महिन्यात अवघे ३६ चित्रपट

२०२० हे वर्ष सिनेसृष्टीचे सर्वात कठीण वर्ष होते. नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ल्यासारख्या अनेक घटना देशामध्ये वारंवार घडल्या. मात्र त्याचा फारसा परिणाम सिनेसृष्टीवर झाला नाही. कोरोनाने मात्र बॉलिवूडला हादरवून सोडले. बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवणारे बॉलिवूड ठप्प झाले. जानेवारी ते मार्चदरम्यान फक्त ३६ चित्रपट प्रदर्शित झाले. यातील तान्हाजी आणि बागी ३ या चित्रपटांनी १०० कोटींचा पल्ला गाठला. तान्हाजीच्या यशाने बालिवूडच्या नव्या वर्षाची सुरूवात दणक्यात झाली. त्यानंतर पुढील तीन महिन्यात आलेल्या ३६ चित्रपटांपैकी १० चित्रपटांनी चांगली कमाई केली. यामुळे हे वर्षे बॉलिवूडला चांगले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र कोरोनाने बॉलिवूडच्या चौफेर उधळणार्‍या वारूला रोखले. कोरोनामुळे चित्रपटगृह बंद झाल्याने येऊ घातलेले चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. मात्र लॉकडाऊन वाढतच गेल्याने चित्रपटांच्या प्रदर्शनाचा मार्ग अधिकच खडतर झाला.

- Advertisement -

बॉलिवूडचे तारे निखळले

एकीकडे कोरोनाने बॉलिवूड ठप्प झाले असताना बॉलिवूडमधील महत्त्वाच्या कलाकारांनी एकापाठोपाठ एक पडद्यावरून एक्झिट घेतली. कलाकारांच्या अकाली जाण्याने बॉलिवूडचे न भरून येणार नुकसान झाले. बॉलिवूडला पहिला धक्का बसला तो अभिनेता इरफान खानच्या जाण्याने. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने इरफानचा बळी घेतला. इरफानच्या धक्यातून बॉलिवूड सावरत असतानाच अभिनेता ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यानंतर असिफ अंसारी, मोहित भगेल, वाजिद खान, बासु चॅटर्जी, रतन चोप्रा, सरोज खान, चिरंजीवी यांसारख्या दिग्गजांनी एक्झिट घेतली. कोरोनाने यातील काही कलाकारांचा घास घेतला आणि काहींचा अन्य आजाराने तर काहींनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या ही सगळ्यांनाच चटका लावणारी ठरली. सुशांतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड हादरून गेले. बॉलिवूडच्या गोटात लपलेल्या अनेक गैरप्रकार यामुळे बाहेर आले.

कोरोनाचा सामना करण्यासाठी कलाकार सरसावले

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाली असली तरी कोरोनाचा सामना करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार पुढे आले. बॉलिवूडचा बादशाह समजल्या जाणार्‍य शाहरुख खानने आपले कार्यालय महापालिकेला वापरण्यास दिले. तसेच त्याने पीपीई किट, हॅण्ड ग्लोव्हज, मास्क यासारखे अनेक साहित्य राज्य सरकारला पुरवले. त्याचबरोबर खिलाडी अक्षय कुमार व अजय देवगणनेही मोठ्या प्रमाणात उपकरणे व साहित्य राज्य सरकारला मदत म्हणून दिले. एकीकडे दिग्गज कलाकारांनी सरकारला मदतीचा हात दिला असताना चित्रपटांमध्ये विलन असलेला सोनू सूद मात्र कामगार, मजुरांच्या गळ्यातील हिरो बनला. त्याने विविध राज्यात अडकलेल्या कामगार व मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

- Advertisement -

काम थांबल्याने कलाकार हतबल

कोरोनामुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाल्याने अनेकांची कामे पूर्णत: बंद झाली. आपल्याकडे असलेल्या पैशांवर सुरुवातीला काहीजणांनी गुजराण केली. मात्र त्यानंतर निर्मात्यांकडे पैशांसाठी तगादा लावला. परंतु कोरोनामुळे संपूर्ण आर्थिक गणित कोसळल्याने निर्मात्यांकडूनही पैसे येत नसल्याने कलाकारांसमोर जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झाला होता. अनेकांकडे घराचे भाडे देण्याचे पैसे नसल्याने त्यांना बेघर व्हावे लागले.

सोशल मीडियावर झाले अ‍ॅक्टिव्ह

बॉलिवूड कलाकार काय करतात, त्यांचे वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे, हे पाहण्यात सर्वसामान्यांना फार रस असतो. लॉकडाऊनमुळे घरात अडकलेले कलाकार काय करत आहेत याची उत्सुकता घरात अडकलेल्या प्रेक्षकांनाही होतीच. त्यामुळे अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधला. सोशल मीडियावरून आपण घरात काय करत आहोत याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. यातूनच सलमान खानने त्याच्या फार्महाऊसमध्ये केलेली शेती, मलायका अरोराने आपल्या मुलीसोबत शेअर केलेले फोटो, रणबीर कपूरने ऋषी कपूरसोबत शेअर केलेले फोटो, अर्जून कपूर, सारा अली खान, आलिया भट्ट यासारख्या कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला.

चित्रपटांनी बदलला मार्ग

लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद असल्याने चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले. याच काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्म पहायला मिळाले. एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत ओटीटी प्लॅटफॉर्मवर तब्बल ४७ पेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित झाले. दिल बेचारा, लक्ष्मी, लुडो, शकुंतला देवी, सडक, काली पीली, खुदा हाफिस यांसारखे अनेक बॉलिवूड चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात लोक घरी असल्याने त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटांना पसंती दिली.

चित्रपटगृहे सुरू पण प्रेक्षकांची पाठ

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हळूहळू अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली. त्यानंतर चित्रपटगृहे खुली करण्यात आली. प्रेक्षक पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे वळतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकच नसतील तर चित्रपट प्रदर्शित करायचा का असा प्रश्न उपस्थित राहिला. लाखोंचा गल्ला जमावणारी बॉलिवूड इंडस्ट्री कुठेतरी कोलमडून गेल्याचे चित्र दिसत आहेत. प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे वळविण्यासाठी कलाकार स्वत: चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू लागले आहेत. २०२० हे वर्ष बॉलिवूडला सर्वात निराशावादी गेले आहे. या वर्षात बॉलिवूडचे झालेले नुकसान हे कधीही भरून न निघणारे आहे.

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -