घरफिचर्सकोरोनाची महामारी...आलं, हळद, काळी मिरी भारी

कोरोनाची महामारी…आलं, हळद, काळी मिरी भारी

Subscribe

खाद्य पदार्थांमुळे कोरोना कालावधीत भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्याचे समोर आल्यानंतर इतर देशांनीही आपल्या खाद्यसंस्कृतीत बदल करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे याकाळात काही देशांमध्ये अचानक हळद, काळी मिरी, आलं, सुंठ, लवंग यांची मागणी वाढली आहे. युरोपीय राष्ट्रांमध्ये तर महिला आता जेवणात हळदीचा वापर करत असल्याचे एका मैत्रीणीने सांगितले. त्यासाठी काहीजणींनी भारतीय संस्कृतीची माहिती युट्यूबवरून मिळवली. खरंतर फ्रोझन फुडला येथे जास्त पसंती असते. थंड हवामान असल्याने शरीराचे तापमान राखण्यासाठी ऊर्जायुक्त पदार्थांचे येथे सेवन केले जाते. कोरोनाने त्यांची खाद्यपद्धती व संस्कृतीत फरक पडलाय. तेही भारतीयांसारखे स्वयंपाकात मसाले वापरू लागले आहेत.

जगभरात हाहा:कार उडवणार्‍या कोरोना व्हायरसने सगळ्यांना नव्याने जगायला शिकवले आहे. नुसतं जगायलाच नाही तर कोरोनाने प्रत्येकाची खाद्य संस्कृतीही बदलून टाकली आहे.

पण भारतीय मात्र यास अपवाद ठरले आहेत. कारण कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून घराघरात सध्या ज्या काही आयुर्वेदिक उपाययोजना केल्या जात आहेत त्या आपल्याकडे वर्षानुवर्षे प्रचलित आहेत. यात योगा, सकारात्मक विचार, मन:शांती, याबरोबरच वैयक्तिक स्वच्छता, घरातील स्वच्छता आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छता, घरगुती विविध काढे आणि सकस आहार यांचाही समावेश आहे. जे आज आवर्जून घेतले जात आहे. यामुळे कोरोनाने भारतीयांना नव्याने जगायला नाही तर विस्मरणात गेलेल्या जुन्या संस्कारांची व सात्विक खाद्य संस्कृतीची आठवण करून दिली आहे. शिवाय ती पुन्हा अंगिकारायलाही भाग पाडलं आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाला संबोधित करताना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भारतीय मसाले जगभरात वापरले जात असल्याचा उल्लेख केला होता. त्यातही खासकरून फास्ट फूडचे हब असलेल्या अमेरिका आणि युरोपमध्ये सध्या मध, आलं व हळदीला मागणी वाढल्याचही ते म्हणाले होते. हा भारतीय खाद्यपरंपरेचा ठेवा कोरोनासारख्या महासंकटात जर अमृताचं काम करत असेल तर ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब नक्कीच आहे. यामुळेच जगातील इतर देशांवर भारी पडणारा कोरोना भारतात मात्र जास्त उलथापालथ करू शकला नाहीये. कारण आपल्यात कोरोनाचा सामना करण्याची उपजतच रोगप्रतिकारशक्ती आहे.

अगदी स्पष्ट सांगायचं म्हटलं तर कोरोनाकाळात इतर देशांच्या तुलनेतील भारतातील कोरोनाबाधितांची संख्या, कोरोनामुक्त होणार्‍यांचा आकडा आणि मृत्यू दर बघून सगळं जग विचारात पडलं आहे.

- Advertisement -

यामागे भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती असल्याचे समोर आल्यानंतर इतर देशांनीही आपल्या खाद्यसंस्कृतीत थोडाफार बदल करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे याकाळात काही देशांमध्ये अचानक हळद, काळी मिरी, आलं, सुंठ, लवंग यांची मागणी वाढली आहे. युरोपीय राष्ट्रांमध्ये तर महिला आता जेवणात हळदीचा वापर करत असल्याचे एका मैत्रीणीने सांगितले. त्यासाठी काहीजणींनी भारतीय संस्कृतीची माहिती युट्यूबवरून मिळवली. खरंतर फ्रोझन फुडला येथे जास्त पसंती असते. थंड हवामान असल्याने शरीराचे तापमान राखण्यासाठी उर्जायुक्त पदार्थांचे येथे सेवन केले जाते. पण कोरोनाने त्यांची खाद्यपद्धती व संस्कृतीत फरक पडलाय. ते पण भारतीयांसारखे स्वयंपाकात मसाले वापरू लागले आहेत.

बियर, व्होडका, एनर्जी ड्रिंकऐवजी पाण्यात हळद, काळी मिरी, लवंग, दालचिनी, सुंठ टाकून काढे पिऊ लागले आहेत. हे सगळं ऐकल्यावर खरं तर गंमत वाटते. एकीकडे आताची भारतीय तरुण पीढी आपल्या खाद्यसंस्कृतीची टेर खेचत ज्यांच्या पिझ्झा, पास्त्याची तारीफ करताना दिसते तेच देश आता जेवणात आपले अनुकरण करत आहेत. यावरून या तरुणांनी खरं तर बोध घेण्याची गरज आहे.

जो वरण भात खाण्याचा मुलं कंटाळा करतात, पण त्यातूनच शरीरासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमीन मिळतात. आपल्या सगळ्याच भाज्यांमध्ये असलेल्या हळदीमध्ये ढीगभर औषधी गुण आहेत. जे संसर्ग रोखण्याचे काम तर करतातच, पण जखमही भरून काढतात. म्हणूनच आज घराघरात हळदीचे काढे उकळत आहेत.

जे कोरोनाचा घशातील आणि फुफ्फुसातील संसर्ग रोखण्यास मदत करते. तिखट चवीच्या आल्यातही असेल औषधी गुणधर्म आहेत. आल्यामध्ये व्हिटामीन ए, सी, ई आणि बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आर्यन, झिंक, कॅल्शियम. अँटीबॅक्टेरियल व तस्मम गुणधर्म असतात. म्हणूनच आल्याचा चहा प्यायल्यावर थकवा जातो. सर्दी खोकला जातो. शरीरात ऊर्जा निर्माण होते.

असेच सर्व गुण काळी मिरी, लवंग व दालचिनी आणि इतर गरम मसाल्याच्या पदार्थांमध्ये आहेत. म्हणूनच आज कोरोनासारख्या महामारीत भारतीय खाद्य संस्कृतीमधील हे पदार्थ व्हायरसचा सामना करण्यासाठी जगभरात लोकप्रिय होत आहेत. यामुळे भविष्यात जर कधी परदेशात जाणे झाले आणि बर्गरमध्ये हळद दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
कारण अजून काही दिवस आणि महिन्यात हेच मसाले जगातील प्रत्येक देशाच्या प्रत्येक घरातल्या मसाल्याच्या डब्यांमध्ये दिसणार आहेत.

कोरोनाने लोकांना नैसर्गिक पदार्थाचे महत्व तर समजावून दिलेच आहे, शिवाय शाकाहाराचेही महत्व पटवून दिले आहे. यामुळे भारताची खाद्यसंस्कृती पुन्हा एकदा जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. आयुर्वेदातही अशाच काही जिन्नसांचा वापर करण्यात येतो. तज्ज्ञांच्या मते आपले व्यक्तिमत्व हे आपण काय खातो यावरही अवलंबून असते.

आपले आचार विचार हे आपल्या आहाराशी संबंधित असतात. म्हणूनच आपल्याकडे शाकाहाराला विशेष महत्व आहे. शाकाहार केल्याने सात्विक वृत्ती तयार होते. तर मांसाहार माणसाला आक्रमक बनवतो. असे म्हटले जाते. पण आज कोरोनासारख्या आक्रमक व्हायरसला आपले शाकाहारी मसालेच पुरून उरत असल्याचे चित्र आहे.

यामुळे अनेक मांसाहारी व्यक्ती आता भारतीय शाकाहाराकडे वळल्या आहेत. एवढा बदल कोरोनाने नक्कीच केला आहे. तसेच भारतीय योगसाधनेचेही आहे. शरीरस्वास्थाबरोबरच मन:शांतीसाठीही योगा केला जातो. पण आता विशेष करून कोरोनाच्या दहशतीमधून बाहेर येण्याासठी व मनात सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी योगा केला जात आहे. योगा ही भारतीयांची देण असल्याने जगभरात भारतीय खाद्यसंस्कृतीबरोबरच भारतीय योगाचा डंका पिटला जात आहे. ही नक्कीच अभिमानाची गोष्ट असून येत्या काळात परदेशात योगा बरोबरच भारतीय खाद्य संस्कृती अधिक रुजणार हे मात्र नक्की आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -