घरफिचर्सकोरोनाचा लढा आणि धडा !

कोरोनाचा लढा आणि धडा !

Subscribe
कोरोनापेक्षा दहा पट अधिक घातक असलेला विषाणू सापडल्याच्या बातम्या येत आहेत. हा विषाणू मलेशियात आढळल्याची माहिती बातमीत असून या विषाणूचा फैलाव कोरोनापेक्षा कित्येक पट अधिक वेगाने होत असल्याचे  त्यात म्हटले आहे. या सोबतच कोरोनाविषयीची दुसरी बातमीही मुंबईसाठी महत्वाची आहे. कोरोनासोबतच स्थानिक संसर्गजन्य आजारांचा फैलाव येत्या हिवाळ्यात होण्याची शक्यता असल्याच्या या बातम्या आहेत. या दोन नकारात्मक बातम्या आहेत. तर गणेशोत्सवापूर्वी  मुंबईतील करोना पूर्णपणे आटोक्यात येणार असल्याची चांगली बातमीही आहे. सोबतच कोरोनाविरोधातील भारतीय लस निर्मिती अंतिम टप्प्याजवळ असल्याचे वृत्त आहे. रशियातील कोरोना लशीच्या यशस्वीतेबाबत घेतली जाणारी शंका, राजकीय आरोप प्रत्यारोप आदी आंतरराष्ट्रीय बातम्यांंची चर्चा होत आहे. असे असताना मागील पाच महिन्यात कोरोनाबाबत मानवी जगण्याचा दृष्टिकोन बराच बदललेला आहे. सकारात्मक आणि नकारात्मक स्थितीकडे तटस्थपणे कसे पाहावे, हे करोनाने शिकवले आहे.
साधारणतः मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव होण्याआधी या आजाराबाबत असलेले भीतीदायक चित्र आता पुरते ओसरले आहे. एखाद्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्या भागातील अर्धा किमी परिसरातील रस्ते बॅरिकेड्स, बांबू आडवे बांधून बंद केले जात होते. आता लगतच्या इमारतीत, घराशेजारी जरी  कोरोना रुग्ण असला तरी त्याविषयी भीती किंवा धास्ती निकाली निघाली आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील एका भागात एका कामगार व्यक्तीला केवळ खोकल्यामुळे नागरिकांनी मारहाण करून त्याची हत्या केल्याची बातमी माध्यमांत होती. आज या कमालीच्या संशय आणि भीतीची जागा पुन्हा सामावून, समजून घेण्यात बदलली आहे. मागील पाच महिन्यात मुंबईकर आणि ठाणेकर नागरिकांमध्ये कमालीचा बदल झालेला पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यावर ठाणे, मुंबईच्या खुल्या झालेल्या बाजारपेठांत गर्दी पहायला मिळत आहे. ही गर्दी मार्च आधीच्या सामान्य परिस्थितीची आठवण करून देत असताना त्यात कोरोनाकाळाने सजगता आणली आहे. हँड सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क या तीन गोष्टी जगण्याचा भाग झाल्या आहेत. रिक्षांमध्ये चालकाच्या मागे प्लास्टिकचे आवरण आहे,  मास्क लावले जात आहेत.  मागील सीटवर दोन प्रवासीच बसवले जात आहेत.  सार्वजनिक सेवेतील वाहतुकीमध्येही नियमांचे पालन केले जात आहे.
कोरोना आता जगण्याचा भाग झाला आहे. तो इतक्यात जाणार नाही, हे आता नागरिकांनी गृहीत धरलेले आहे. जोपर्यंत कोरोनाची लस सार्वत्रिक स्वरुपात टोचून घेतली जात नाही. ती बाजारात उपलब्ध होत नाही. तोपर्यंत कोरोनोसोबत जगण्याची तयारी नागरिकांनी केली आहे. गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, बुद्धपौर्णिमा. ईद, श्रावणातील सण, गौरी गणपतीनंतर आता दिवाळीही मर्यादित स्वरुपात कोरोनाला हरवून साजरी करण्याचे मन बनवले जात आहे. कोरोनाने सणवार साजरे करण्याबाबतचा दृष्टिकोन बदलला आहे.
कोरोनाला हरवण्यापेक्षा या लढाईत तह करण्याची मानसिकता अनेकांनी केली आहे. कोरोनाची लस कधी येणार याची आतुरता आता तेवढी राहिलेली नाही. रशियाच्या लशीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पुरेशा संशोधन आणि चाचणी अभ्यासाशिवाय ही लस येऊ नये अशी लोकांची धारणा झालेली आहे. भारतातही 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा होण्याची शक्यता निकालात निघाली आहे. कोरोनाविषयी राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या परिणामांची धास्ती आता राहिलेली नाही. मुंबई ठाणे, कल्याणमधील स्थिती सामान्य होण्याकडे वाटचाल करत आहे. कोरोना रुग्णांच्या आकड्यांची चर्चा आता केली जात नाही. दुसरीकडे हॉस्पिटल्समध्येही कोरोनासाठीचे बेड्स रिकामे असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे इशारे आता चार महिने पूर्वीच्या तुलनेत आता नागरिकांकडून गांभीर्याने घेतले जात नाहीत. मुंबईसारख्या जास्त घनतेच्या शहरात कोरोना फैलावाबाबत या संघटनेने व्यक्त केलेली भीती धारावीतील नियंत्रणामुळे कौतुकात बदललेली आहे. स्थिती सामान्य होताना त्यातील राजकारणही नियंत्रणात येत असल्याचे समाधान आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातही कोरोना नियंत्रणात येत आहे. राज्यातील कोविड १९ संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी  ग्रामपंचायत स्तरावर या आजाराच्या प्रतिबंधासाठी उपक्रमाचा केलेला गौरव स्थानिक संस्थांचा उत्साह वाढवणारा आहे. राज्यातील प्रत्येक विभागातून एका ग्रामपंचायतीचा या विषयावर प्रस्ताव पाठविण्याचे केंद्र सरकारने राज्यांना सांगितले होते. त्यानुसार कल्याण तालुक्यातील १० ग्रामपंचायत आणि १९ गावात अद्याप तरी कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.
ठाणे जिल्हा परिषदेच्या निळजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे गुरवली उपकेंद्र येथे कोरोनोचा पहिला रुग्ण सापडला. यानंतर मुरबाड व भिवंडी तालुक्यातदेखील कोरोनोचे रुग्ण आढळले. भिवंडी तालुक्यातील खारबाव, कोन, दिवा अंजूर अनगाव, मुरबाडमधील म्हसा, सरळगाव, शहापूरमधील वाशिंद अघई, शेद्रूण, टेंभा, कल्याण येथील निळजे, दहागाव आदी ठिकाणी हॉसस्पॉट जाहीर करण्यात आले होते. तसेच अंबरनाथ, बदलापूर, वांगणी येथेही परिस्थिती गंभीर होती. अशा वेळी स्थानिक संस्थांनी सरकारच्या निर्देशानुसार काम केल्यामुळे आणि कोरोनाविरोधातील लढ्यात सर्वात पुढे असलेल्या योद्यांमुळेच हे यश मिळत आहे.
ठाणे शहरातील स्थितीही 15 ऑगस्टपासून सामान्य होऊ लागली आहे. उल्हासनगरातील व्यापार्‍यांनी लॉकडाऊन वाढवण्यासाठी विरोध केला होताच. त्यामुळे आता कोरोनाविरोधातील बचावाचा पवित्रा आक्रमणात बदलला आहे. जगभरातील कोरोनाविरोधातील लढ्याला यश  येत  असताना अनेक ठिकाणी लसनिर्मिती अखेरच्या टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे आज ना उद्या कोरोनावर नियंत्रण येईलच हा विश्वास वाढलेला आहे. हा विश्वास वाढत असताना कोरोनापेक्षा जास्त प्रभावी नवा विषाणू सापडल्याचे म्हटले जात आहे. मात्र या बातम्यांची भीती आता वाटेनाशी झाली आहे. ठिकठिकाणच्या कोरोनाबाधितांचा आकडा कमी जास्त होण्यात आता नागरिकांना रस राहिलेला नाही. शहर आणि ग्रामीण भागातही परिस्थिती सामान्य झालेली आहे. दुकाने, सुरू आहेत. अनेकांचे व्यावसायही सुरू झालेले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनानंतर परिस्थितीत मोठा बदल झालेला आहे. ज्यांच्या नोकर्‍या गेल्या त्यांनी आपापले छोटे मोठे उद्योग धंदे सुरू केले आहेत. रस्त्यारत्यावर नव्याने भाजीपाला, वडापाव, चहाच्या टपर्‍या पुन्हा सुरु होऊ लागल्या आहेत. हॉटेल्स, बारमध्ये गर्दी जरी नसली तरी पार्सल ग्राहकांची संख्या कमी झालेली नाही. कोरोना संकटाला अनेकांनी संधीत रुपांतरित केले आहे. ठाणे, मुंबईतील अनेकांनी गृहउद्योग सुरू केले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समाजमाध्यमांवर कौतुकाने सांगितले जात आहे. कोरोनामुळे माणसांच्या सुखाच्या संकल्पनाही बदलल्या आहेत. बचत आणि पुरेशा गरजांच्या मर्यादांचे महत्व त्यांना समजले आहे. अनेक ठिकाणी नोकर आणि पगारकपात झाल्यामुळे आहे त्या परिस्थितीत जगण्याचा संघर्ष आता सामान्य माणसांच्या अंगवळणी पडला आहे. कोरोनामुळे माणसांच्या टोकदार झालेल्या धार्मिक भावनाही अहंकाराकडून सोशिकतेकडे आणि श्रद्धेकडे वळल्या आहेत. ईद साजरी करताना घेतलेली खबरदारी तसेच नुकत्याच झालेल्या गोकुळाष्टमीत उत्सवाच्या बडेजावालाही नियंत्रणात आण्यात आले. धार्मिक उत्सवात उत्सवापेक्षा श्रद्धा महत्वाची आहे. येत्या गणेशोत्सवातही अशीच बुद्धी बाप्पांनी त्यांच्या आगमनाआधी गणेशभक्तांना दिली आहे. त्यामुळेच  गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा यंदा रोखली गेली आहे. गणेशोत्वातील मोठा रोमहर्षक सजावटींचा खर्च रक्तदान शिबिरांसाठी आणि कोरोनाकाळातील देणगीसाठी वापरला जाणार आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तबलिगी मुद्यावरून निर्माण झालेला धार्मिक राजकीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न राम मंदिरापर्यंत ओढण्यात आला. परंतु करोनाविरोधातील लढ्यात आपले आणि आपल्या कुटंबाचे अस्तित्व कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सामान्यांनी या दोन्ही विषयांवर निर्माण होत असलेल्या राजकीय प्रयत्नांना भीक घातली नाही.
माणसाच्या जीवनात  भूक आणि जगण्याचा प्रश्न सर्वात प्राथमिक असतो. ही जाणीव येथील लोकांना झाली हेसुद्धा या कोरोनाकाळाचे यश आहे. कोरोनाची लस आल्यावर काही महिन्यात कोरोना हा आजार इतर आजारांसारखाच सामान्य गटात दाखल होईल. मात्र तोपर्यंत या आजाराने माणसांना माणसाचे महत्व शिकवलेले असेल, हा धडा लक्षात ठेवून पुढील निरोगी आणि उज्ज्वल भविष्याकडे मार्गक्रमण करायचे की, आपल्या अगदी जागतिकपासून ते अस्मितेच्या पातळीपर्यंत आपल्या संकुचित गटवादाला महत्व द्यायचे, हे माणसांना ठरवावे लागेल, कोरोना आता जगण्याचा भाग होणार आहे. मात्र त्याने संपूर्ण मानवांना शिकवलेला धडा आपण विसरता कामा नये.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -