घरफिचर्सचित्रपटांकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारा दिग्दर्शक, लेखक 'निशिकांत कामत'

चित्रपटांकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारा दिग्दर्शक, लेखक ‘निशिकांत कामत’

Subscribe

बॉलीवूड चित्रपटांचा मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामत (वय ५०) यांनी १७ ऑगस्ट २०२० रोजी हैदराबादमधील एआयजी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. तर ३१ जुलै रोजी त्यांना उपचारासाठी हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. व्हेंटिलेटरवर असलेल्या निशिकांत कामत यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली. त्यांनी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. २००४ ते २०२० या अवघ्या १६ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये केवळ आठ चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या निशिकांत कामत यांनी पहिल्याच दिग्दर्शित केलेल्या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शिवाय त्यांचे हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’, ‘दृष्यम’, ‘मदारी’ हे सिनेमे समीक्षकांच्या पसंतीस पडले.

मराठी चित्रपटांनी गेल्या काही वर्षांपासून कात टाकली आहे, अशी समीक्षकांकडून चर्चा होत असलेल्या त्या काळी अचानक मुंबई लोकलच्या वेगाने सुसाट धावणारा ‘डोंबिवली फास्ट’ (२००५) हा मराठी चित्रपट आला आणि पुन्हा एकदा प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे वळू लागला. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीची व्यथा मांडणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी केले होते. हा त्यांचा दिग्दर्शनाचा पहिलाच अनुभव होता. परंतू त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि हरहुन्नरी, वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक सिनेसृष्टीला लाभला. याआधी निशिकांत यांनी (२००४) साली ‘हवा आने दे’ या हिंदी तर त्याच वर्षी आलेला संजय सूरकर दिग्दर्शिक आणि स्मिता तळकळकर निर्मित ‘सातच्या आत घरात’ या मराठी चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मराठमोळ्या या तरुणाने ‘डोबिंवली फास्ट’ (२००५) आणि ‘लय भारी’ (२०१४) या अवघ्या दोनच मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. परंतू हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील इतके सुपरहिट ठरले.

- Advertisement -

निशिकांत कामत यांना बॉलीवूड सिनेमांचा दिग्दर्शक म्हणून संबोधलं तर वावग ठरणार नाही. त्यांनी दिग्दर्शिक केलेले ‘मुंबई मेरी जान’ (२००८), ‘फोर्स’ (२०११), ‘दृष्यम’ (२०१५), ‘रॉकी हँडसम’ (२०१६), ‘मदारी’ (२०१६) हे हिंदी चित्रपट प्रेक्षकांसह समीक्षकांचीही दाद मिळवणारे ठरले. त्यातही ‘मुंबई मेरी जान’, ‘दृष्यम’ आणि ‘मदारी’ या चित्रपटांनी निशिकांतच्या दिग्दर्शकीय पैलूचे दर्शन घडवले. ‘फोर्स’, ‘रॉकी हँडसम’, ‘लय भारी’ हे टिपिकल मारधाड, अॅक्शनपटवाले सिनेमे देणाऱ्या या निशिकांतने संवेदनशील विषय असणारे ‘डोबिंवली फास्ट’, ‘मदारी, ‘दृष्यम’ सारख्या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. तसेच निशिकांत यांनी ‘सातच्या आत घरात’, ‘रॉकी हँडसम’, ‘जुली २’, ‘भावेश जोशी सुपर हिरो’ या सारख्या चित्रपटांमधून अभिनयदेखील केला. मुंबईतील रुईया कॉलेजच्या विद्यार्थ्याने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही आपला वेगळा ठसा उमटवलेल्या या दिग्दर्शक, लेखक आणि कलाकाराची ही अचानक झालेली एक्झिट सर्वांनाच्याच मनाला चटका लावणारी ठरली.

हेही वाचा –

संजय राऊत डॉक्टरांची नाही तर सर्वसामान्य जनतेची तात्काळ माफी मागा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -