घरताज्या घडामोडीअरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…

Subscribe

सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वागणारे लोक आणि कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यानेच अनेक भागात कोरोनाने पुन्हा डोक वर काढले आहे. राज्यातील अनेक भागात आता कोरोनाचे रूग्ण एकापाठोपाठ एक आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना थांबणार नाही हे मात्र नक्की आहे. पुन्हा लॉकडाऊन, पुन्हा वर्क फ्रॉम होम आणि पुन्हा डिजिटल पर्यायांचा वापर हा आता सवयीचा भाग व्हायला हवा. दोन डोस झाल्यानंतर तरी यावर्षी कोरोना जाईल, असे वाटत होते, पण त्याचे नवे अवतार येतच आहेत, पण खचून न जाता आयुष्याच्या मशाली पुन्हा पेटवून पुढची वाटचाल करायचीच असा दृढनिश्चय सर्वांनी करायला हवा.

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या निर्बंधांची चर्चा वेळोवेळी झाली. अगदी लॉकडाऊनपासून ते कडक नियमावलीमुळे अनेक देशांमध्ये सार्वजनिक आयुष्यात आलेल्या मर्यादा या गेल्या दोन वर्षात लोकांना आता सवयीच्या झाल्या आहेत. मग सार्वजनिक वाहतूक असो वा वर्क फ्रॉम होम कल्चर किंवा ऑनलाईन शाळा असो. सगळ्या क्षेत्रातील समीकरणेच या कोरोनाच्या संक्रमणाने बदलली आहेत. पण एखाद्या महामारीचा फटका हा मानवी पिढीला बसण्याची ही पहिली वेळ नाही. इतिहासात अशा प्रकारच्या महामारीची वेळोवेळी नोंद आहे. त्यामध्ये झालेल्या लाखोंच्या संख्येने मृत्यूचीही नोंद झाल्याची आकडेवारी आहे. कोरोनाच्या आकडेवारीनेही महामारीतील विध्वंस समोर आणला. या सगळ्यातच डेल्टा, डेल्टा प्लस आणि आता ओमायक्रॉनच्या रूपाने या व्हायरसचे बदललेले रूप पहायला मिळते आहे. सगळ्या गोष्टीच्या मध्यवर्ती आहे ती गोष्ट म्हणजे कोरोना इथेच राहणार आहे. हा कोरोना कुठेही जाणार नाही. कोरोनासोबतच 2022 मध्ये जगायचं आहे हे अंगवळणी पाडून घेण्याची गरज आहे.

- Advertisement -

कोरोनाचे संकट आणि त्यानंतर दैनंदिन आयुष्यात घडलेले बदल, तंत्रज्ञानाचा वाढलेला वापर, सार्वजनिक आयुष्यात वावरताना आलेल्या मर्यादा याचा परिणाम हा दीर्घकालीन असा झाला आहे. अनेक ठिकाणी कोरोनाविरोधी लसीकरणाला आलेले महत्व तसेच लसीकरणाच्या अनुषंगाने अनेक सुविधांचा एक्सेस ही गोष्ट आता न्यू नॉर्मल झाली आहे. महाराष्ट्रात अनेक महिन्यानंतर सार्वजनिक ठिकाणी कोरोनासाठीचे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामध्ये फ्लाईट्सला उठवण्यात आलेल्या बंदीपासून ते थिएटर्स, नाट्यगृहांपासून ते शाळा खुल्या होण्यापर्यंत अनेक गोष्टींची बंधने उठवण्यात आली. ही बंधने उठवत असतानाच पुन्हा एकदा अनेक देशांमध्ये ओमाक्रॉनच्या संकटाने डोक वर काढले आहे. अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी सगळ्या गोष्टी जिथे नॉर्मल होतात, तिथेच पुन्हा एकदा आता लॉकडाईनचे संकट निर्माण झाले आहे. पण कोरोनाचे नवनवीन संकट, नवीन व्हेरीयंट आणि एकूणच येणारी बंधने ही यापुढच्या काळात जगण्याचा भाग होणार आहेत.
कोरोनाच्या नवनव्या व्हेरीयंटमुळे वैज्ञानिकांपुढेही आता मोठे आव्हान आहे ते सगळ्या नव्या व्हेरीयंटसाठीचे रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करणार्‍या लसनिर्मितीचे. अमेरिकेतही याच अनुषंगाने मोठी गुंतवणूक ही अशाच सुपर वॅक्सीनसाठी करण्याची तयारी सुरू झाली आहे. कोरोनाच्या महामारीत येणारे विविध व्हेरीयंट पाहता अशा महामारीच्या संकटाला समूळ नष्ट करण्यासाठी हे प्रयोग करणे गरजेचे आहे. जगभरातील वैज्ञानिकांसमोर कोरोनाच्या नवनव्या व्हेरीयंटनुसार लस निर्मितीचे एक आव्हान आहे. त्यासोबतच कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटनुसारच आरोग्याची यंत्रणा कायम सज्ज ठेवणे हे येत्या काही दिवसांमधील आव्हान असणार आहे. त्यामुळेच प्रत्येक परिस्थितीनुसार कोरोनाच्या महामारीमुळे आरोग्याच्या यंत्रणेचा कस लागणार हे नक्की आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच ओमायक्रॉन व्हेरीयंटबाबत बोलताना स्पष्ट केले की, ज्यानुसार ऑक्सिजनची गरज रूग्णांना लागणार त्यानुसारच लॉकडाऊनचे निकष ठरतील. त्यामुळे ही लॉकडाऊनची परिस्थिती आणायची की नाही, हे सर्वस्वी नागरिकांवरच अवलंबून असणार आहे. मोठ्या प्रमाणात देशात नागरिकांचा लसीचा पहिला आणि दुसरा डोस झाला आहे. अशावेळी सार्वजनिक ठिकाणी आपण कसे वावरतो यापासून सुरू आहेत. सार्वजनिक कार्यक्रम असो, राजकीय सभा, आंदोलने मोर्चा किंवा राजकारणी लोकांच्या मुलांचे बिग बजेट सोहळे असो. अशा स्थितीत कोरोनाचे निर्बंध पाळण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळेच जगभरातील मोठ्या देशांमध्येही कोरोनाची त्रिसुत्री पाळण्याचे आवाहन हे वारंवार करण्यात येत आहे. कारण कोरोनाचे जगभरातील म्युटेशन त्यामधून निर्माण होणे व्हायरस आणि एकूणच नवनव्या आव्हानांमुळे संपूर्ण वर्षात खबरदारी हा सर्वांसमोरील हा एकमेव उपाय आहे.

- Advertisement -

सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वागणारे लोक आणि कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यानेच अनेक भागात कोरोनाने पुन्हा डोक वर काढले आहे. राज्यातील अनेक भागात आता कोरोनाचे रूग्ण एकापाठोपाठ एक आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना थांबणार नाही हे मात्र नक्की आहे. पुन्हा लॉकडाऊन, पुन्हा वर्क फ्रॉम होम आणि पुन्हा डिजिटल पर्यायांचा वापर हा आता सवयीचा भाग व्हायला हवा. त्यासाठीच ज्या पद्धतीने कोरोना मुक्काम करणार आहे, त्यासोबतच ऑनलाईन आणि ऑफलाईन यासोबतच जुळवून घेण्याचीही गोष्ट आपल्याला जमायला हवी.

जगभरात तिसर्‍या कोरोनाच्या लाटेला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी चौथ्या लाटेचीही सुरूवात झाली. भारतात ओमिक्रॉनच्या निमित्ताने आता कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या परिस्थितीचे अंदाज बांधले जात आहेत. अशावेळी कोरोनाच्या चाचण्या, उपचार हे कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतरचे उपाय आहेत. तर कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी कोरोनाच्या नियमावलीचे पालन हाच शक्यतो आपल्याकडे असणारा पर्याय आहे. अनेक उद्योगांपासून ते अर्थव्यवस्थांनाही या जैविक आव्हानाचा सामना करणे ही गरजेची गोष्ट ठरणार आहे. कारण याच परिस्थितीशी जुळवून घेणार्‍या संस्था, उद्योगच आगामी काळात तग धरू शकतील. कोरोनाच्या आव्हानासोबतच सोबतच्या बदलांना जे स्वीकारतील आणि जुळवून घेतील त्यांनाच यापुढच्या काळात टिकून राहणे शक्य होईल.

नव्या वर्षात कोरोनाचे निर्बंध आणि नियमावली हे कोणालीही नको आहे. त्यामुळे येणारी बंधने ही पुन्हा एकदा सगळ्यांना मागे लोटण्यासारखी आहेत. अर्थात सध्याचे झालेले लसीकरण पाहता बेफिकिरी ही असता कामा नये. त्यामुळेच तिसरी लाट रोखणे ही आपल्या सर्वांची एकत्रित अशी जबाबदारी आहे. सध्याची दररोजची कोरोना रूग्णांची होणारी वाढ पाहिली तर नव्या वर्षातही लॉकडाऊन टाळणे अशक्य आहे. त्यामुळेच यापुढच्या काळात येणार्‍या नवनवीन नियमावली, बंधने आणि नियम याचे काटेकोरपणे पालन करणे हेच आपल्या हातात आहे. राज्यात अनेक ठिकाणचे चित्र पाहिले तर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला पूरक अशा बेशिस्तीचे वातावरण आहे. अशावेळी सार्वजनिक ठिकाणी बंधने यायला नको तर त्यासाठीचे भानही बाळगले जाणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरीयंटची सुरूवात ही महाराष्ट्रातून झाली हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच ज्या पद्धतीने ओमायक्रॉनचा संसर्ग फैलावतो आहे, त्याच वेगाने आपल्याला उपाययोजना आणि यंत्रणा सज्ज करण्यासाठी तयार असायला हवे. अनेक ठिकाणी तोकड्या पडणार्‍या यंत्रणा, पायाभूत सुविधांची कमतरता आणि अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणांमध्ये अद्ययावतीकरण यासारख्या गोष्टी सद्य:स्थितीला राज्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागातील आव्हान आहे. लसीकरणाच्या बाबतीत अनेक ठिकाणी आजही असणारे गैरसमज आणि लस न घेण्याची वृत्ती बदलणे आपलीच सामाजिक जबाबदारी आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांसोबतच धार्मिक संघटनांचीही आणि राजकीय पक्षांचीही तितकीच महत्वाची जबाबदारी आहे.

राज्यात बुस्टर डोसची तयारी आता सुरू होत आहे. अशावेळी आरोग्य यंत्रणांसाठी प्राधान्याने बुस्टर डोसची उपलब्धतता करून देणे आणि आरोग्य कर्मचारी सुरक्षित करणे हे आगामी वर्षातील आव्हान आहे. त्यासोबतच सहव्याधी असणारे लोक आणि जेष्ठ नागरिक यांनाही बुस्टर डोसची गरज ही तितकीच भासणार आहे. अशावेळी आधीचा अनुभव कुठेही कमी पडता कामा नये. राज्यात अनेक ठिकाणी अद्यापही दुसरा डोस न घेणार्‍यांचा मोठा टक्का आहे. एकीकडे अशा लसीकरण मोहिमेत शासन पातळीवर मोठा भार सरकार उचलत आहे. अशावेळी कोरोनाच्या महामारीत संसर्ग रोखण्यासाठी आणि जीवित हानी टाळण्यासाठी आपली सार्वजनिक जीवनात तितकीच महत्वाची अशी जबाबदारी आहे. तरच येणारी तिसरी लाट आपण थोपवू शकतो.

राज्यात अनेक ठिकाणी ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याचे चित्र आहे. अशावेळी बुस्टर डोससाठी आगामी काळात तयार राहणे ही वास्तविक परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी कोरोना डोक वर काढताना लोकांनी नियमित कोरोना चाचणी करणे, लसीकरण पूर्ण, बुस्टर डोससाठी तयारी करणे यासारख्या मूलभूत गोष्टी आपण यंत्रणेसाठी करू शकतो. कोरोनाचा मुक्काम वाढणार आहे ही वास्तविकता आहे. त्याचवेळी कोरोना जाणार नाही, त्यासोबतच जगावे लागणार आहे ही वास्तविकताही आपण स्वीकारायला हवी. यापुढच्या काळात केंद्र, राज्य, शहर पातळीवर येणार्‍या कोरोना निर्बंधांच्या सूचनांचे नियमित पालन करणे आणि संसर्ग रोखण्यासाठीचे शक्यतो प्रयत्न करणे हेच आपल्या हातात आहे. येत्या 2022 मध्ये याच साध्या गोष्टी आपण यंत्रणेला मदत करण्यासाठी नक्कीच करू शकतो. कारण कोरोनासोबत आपल्याला सुरक्षितपणे जगायची सवय अंगवळणी पाडून घ्यावी लागणार आहे.

 

 

 

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -