घरफिचर्सनववर्षाचे स्वागत करताना ‘आर्थिक संकल्प’ जरुर करा !!

नववर्षाचे स्वागत करताना ‘आर्थिक संकल्प’ जरुर करा !!

Subscribe

2019- निवडणुका होतील पण नंतरचे तडाखे भारी पडतील !!

डिसेंबर महिना सुरू झाला की ज्याला त्याला लागतात-येणार्‍या नवीन वर्षाचे वेध ! अकरा महिने जुने झालेले एक वर्ष आता कसेबसे संपवण्याची झाली असते सगळ्यांनाच घाई. वीस तारीख उलटून गेली की ऑफिसातदेखील शुकशुकाट दिसू लागतो का? म्हणजे काय? अहो,स्टाफला शिल्लक रजा संपवायची असते. ख्रिसमस लागला की जगाला सुट्टी [Global Holiday] असल्यागत वातावरण निर्माण होते. मॉल्समध्ये ,पॉश हॉटेलात गर्दी असते. सिनेमा-नाटकांना चिक्कार गर्दी ! बजेट-खिसा याचा विचार न करता मस्तपैकी ‘फन-पार्टी-धम्माल’ चालू होते. अशा माहोलमध्ये ‘’बचत-गुंतवणूक आणि भविष्याची तरतूद ह्याकडे बघायला कोणाला वेळ आहे? पण वर्ष अखेरीस आपण भल्या-बुर्‍या गोष्टींचा आढावा घेत असतो. मग आपले दैनंदिन जीवन ज्यावर अवलंबून आहे, अशा अर्थविषयक -जमा-खर्चाचा विचार नक्कीच करायला हवा. म्हणून हा लेख. नवीन वर्षाचे स्वागत करताना सर्वात आधी नववर्ष संकल्पना [New Year Resolution] केल्या जातात [त्या सुरुवातीच्या आठवड्यात मोडण्याची प्रथादेखील दरवर्षी पाळली जाते ! ]त्यापेक्षा गंभीरपणे आपल्या प्रत्येकाच्या मनामनात आर्थिक साक्षरता असावी हादेखील एक हेतू आहे.

पार्श्वभूमी – आपले आर्थिक वर्ष हे 1 एप्रिलला सुरू होते आणि 31 मार्चला संपते [आता हे आर्थिक-वर्ष [Financial Year]बदलले जावे आणि इंग्लिश-वर्षाप्रमाणे [Calender Year] व्हावे अशी मागणी जोरात होती! पण त्यांनी आर्थिक आणि व्यवहारीक गुंतागुंत भयंकर वाढेल ! असे वेळीच लक्षात आल्याने ,हा बदल घडला नाही! ] नाहीतर नोटा-बंदी आणि जीएसटीपाठोपाठ ‘’ तिसरा आघात जनतेला सोसावा लागला असता.

- Advertisement -

दरवर्षी आपण कर वाचवण्यासाठी कर-बचत योजनां [Tax saving Schemes] मध्ये पैसे गुंतवतो, तर ही तजवीज आपण अगदी एप्रिल सुरू झाल्या-झाल्या कधीच करत नाही. कारण आपल्याला सवय असते की सर्वच गोष्टी लास्ट मिनिट म्हणजे अगदी एलेवन्थ अवरला करण्याची ! आपल्या म्हणीदेखील आपल्या ह्या पैलूवर प्रकाश टाकत असतात. उदाहरणार्थ- तहान लागल्यावर विहीर खणणे ! पण प्रत्यक्षात आपण आगावू असे काही करत नाही. एकतर तितके पैसे नसतात आणि दुसरे म्हणजे तसे आपले आर्थिक-नियोजन नसते. [तिसरे कारण- कंटाळा ,चौथे -आळस अशी अनेकविध असू शकतात] विद्यार्थी जसे परीक्षा आली की पुस्तके-गाईड्स किंवा हमखास यश मिळवून देणार्‍या 21 -प्रश्नपत्रिका अशी पुस्तके घेत असतात ,तसेच आपलेही असते. ऑफिसने कर-बचतीची कोणकोणती गुंतवणूक केली आहे, ह्याचा पुरावा सादर करा! अशी सूचना काढली की आपण एजंटना गाठतो.

पैसे गोळा करतो आणि घाई-गडबडीत एजंट सांगेल तिथे पैसे गुंतवून अक्षरशः मोकळे होतो. [स्वतःचे डोके अजिबात वापरत नाही! एरवी आपण पैसे खर्च करताना माहिती व चौकशी करतो,पण आपलेच पैसे कर वाचवण्यासाठी गुंतवताना अगदी बिनधास्त राहतो -हे किती आणि कसे विचित्र आहे नाही? पण ही वस्तुस्थिती आहे] वर्षानुवर्षे आपली मानसिकता अशीच बनलेली आणि राहिलेली आहे. यंदा आपण आधीच तशी तजवीज करुया ,म्हणजे धावपळ आणि गोंधळ होणार नाही.

- Advertisement -

नवीन वर्षात नेमके काय करावे?
1 मार्च-महिन्यात कर-बचतीसाठी पैसे गुंतवण्याऐवजी शक्य असेल तर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आपले पैसे योग्य स्कीममध्ये गुंतवावेत. म्हणजे घाई होणार नाही आणि तुलना करून नेमक्या लाभदायी योजनेत आपले पैसे जमा होऊ शकतील.

2 एस.आय.पी.- पुढील आर्थिक वर्षाचे सुनियोजन करण्यासाठी अगदी एप्रिल महिना लागल्या-लागल्याच आपल्या सोयीच्या म्युचुअल फंडात एक खाते सुरू करावे आणि तशी सूचना बँकेला द्यावी. म्हणजे दर महिन्याला तुम्हाला वेगळी सूचना किंवा चेक-रोकड देण्याची आणि मुदतीची तारीख लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही.सर्व कसे थेट -आपसूक होईल.किती रकमेचे एस.आय.पी.करायचे हे तुम्हीच ठरवू शकता,पण किमान रु 500/ किंवा अधिक असावी आणि असे खाते शक्यतो पाच वर्षाइतके दीर्घकालीन [Long Term] असावे. बँकेतील बचत खाते किंवा ठेवींमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा म्युचुअल फंड एसआयपी हे केव्हाही चांगले.

3 म्युचुअल फंडातील – लिक्विड फंड – आपल्याला अल्प-मुदतीसाठी काही पैसे लागणार असतील तर ते ‘लिक्विड फंड’ योजनेत जरूर गुंतवावे. व्याजरूपी उत्पन्न मिळू शकते आणि पैसे हवे तेव्हा काढण्याची सुलभ सोय उपलब्ध असते.

4 शेअर्स – आजवर तुम्ही कधी शेअरबाजारात पैसे गुंतवण्याचे धाडस केले नसेल तर नवीन वर्षाचा -नवा संकल्प म्हणून आपल्या बँकेत एखादे डी-म्याट खाते नक्की उघडा. कारण शेअर्समध्ये जर डोळसपणे इन्वेस्ट केलेत ,तर पैसे बुडत नाहीत.उलट प्रतिवर्षी लाभांश आणि काही कंपन्या चांगला नफा झाल्यावर ‘बोनस शेअर’ देतात ,हा एक अतिरिक्त लाभ म्हणता येईल. आज आपल्याकडे ज्या विविध प्रकारची गुंतवणूक साधने आहेत,त्यामध्ये ‘शेअर’ हे प्रभावी मानले जाते. मात्र, त्याकरिता काही पथ्ये सांभाळणे जरुरीचे आहे. एक म्हणजे जुगार न करणे. रेस किंवा मटक्याप्रमाणे बेधडकपणे न खेळणे. तसे केले तर मोठा फटका बसू शकतो. आज शेअर घेतला -उद्या मोठा फायदा होईल आणि विकल्यावर आणखीन फायदा ! असा भ्रम कधीच मनात ठेवू नका.चांगल्या कंपन्या -ज्यांना बाजारच्या भाषेत ब्ल्यू चीप कंपन्या [Blue Chip Companies] म्हटले जाते,तशा ‘अ’ गटातील कंपन्यात आपले पैसे गुंतवा.कधी भाव वाढतोय आणि आपण मुद्दल वसूल करतोय! अशी जल्दबाजी आपल्यासारख्या साधारण गुंतवणुकदाराने मुळीच करू नये.ते काम मार्केट कोळून प्यालेल्या मुरब्बी मंडळींचे ! तेही बाजार कोसळला किंवा अंदाज चुकला की सरळ बाराच्या भावात जातात! अर्थात ज्यांना असे धाडस करायचे नसते त्यांच्यासाठी तर ‘म्युचुअल फंड’चा पर्याय आहे.

खालील गोष्टी किंवा चुका नवीन वर्षात चुकूनही करू नका-
1 झटपट स्कीम [Ponzi Schemes] मध्ये गुंतवणूक -सुदैवाने आपल्या महाराष्ट्रात अशा चीटींग करणार्‍या ‘चीट-फंड’ योजना तितक्या नाहीत,जितक्या बंगाल किंवा दक्षिणेकडील राज्यात आहेत.पैसे डबल करून देणारे गोरगरिबांचा श्रमाचा पैसा लुटतात आणि एके रात्री पोबारा करतात. मग गुन्हेगार सापडणे ,कोर्टात केस लढणे आणि आपलेच पैसे मिळवणे -ह्यात मनस्ताप आणि खटाटोप खूप होतो. म्हणून अशा कोणत्याही योजनेत पैसे टाकू नका.

2 बँकेत ठेवताना सावधगिरी बाळगा – कारण वाईट कर्जे ,गलथान व्यवस्थापन ,व्यावसायिकतेचा अभाव आणि राजकीय हस्तक्षेप अशा अनेक कारणांनी काही बँक्स बुडतात किंवा सायबर हल्ल्याच्या शिकार होतात.म्हणून आपण योग्य माहिती ,पार्श्वभूमी आणि कामगिरीचा अहवाल पडताळून मगच आपले पैसे ठेवावेत. कारण फक्त रु 1 लाख इतक्या रकमेच्या बचत/ठेवीवर संरक्षण मिळते. त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास परत मिळणे अवघड असते.

3 आपले सर्वच पैसे /मिळकत एकाच ठिकाणी ठेवू नका – आपली एक सर्वसामान्य पद्धत असते -की आपण चटकन अविश्वास तरी दाखवतो ,नाहीतर अति-विश्वास ठेवून पटकन ‘हो’ म्हणतो. गुंतवणूक करताना कोणताही निर्णय हा भावनिक पातळीवर घेतला जाऊ नये,वस्तुनिष्ठपणे घेतला जावा.म्हणजे पश्चाताप करण्याची पाळी येत नाही.

नवीन वर्षात आपली आर्थिक साक्षरता वाढावी आणि आपण मिळकत -बचत आणि गुंतवणूक अशा त्रिसूत्रीबाबत अधिक डोळस आणि सक्षम बनावे याकरिता अर्थपूर्ण शुभेच्छा !

राजीव जोशी
(लेखक अर्थ आणि बँकिंग अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -