घरफिचर्सएकनाथ शिंदे यांची पेरणी..!

एकनाथ शिंदे यांची पेरणी..!

Subscribe

नगर विकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा येथील गावी शेतात पेरणी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तसेच वृत्तवाहिन्यांवर नुकताच झळकला. हा व्हिडीओ ठाण्यातील आणि शिवसेनेतील बदलत्या राजकारणावर बर्‍यापैकी अप्रत्यक्ष भाष्य करणारा होता अशी चर्चा या व्हिडिओनंतर सुरू झाली आहे. त्यात तथ्य किती हा भाग वेगळा. मात्र राजकीय दूरदृष्टी असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पेरणी सुरू केली आहे, याकडे राजकीय जाणकार दुर्लक्ष करू शकत नाहीत हेच यातून अधोरेखित होते.

मातोश्री आणि ठाणे यांचे पूर्वाश्रमीपासून अत्यंत वेगळे आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. शिवसेनेला सत्ताकारणाची यशस्वी वाट ही ठाणेकरांनी दाखवली त्यामुळेच शिवसेनेची पहिली सत्ता ठाणे पालिकेत आली होती. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असा सत्तेचा फॉर्म्युला शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना घालून दिला होता. काळानुरूप सत्तेच्या या सूत्रांमध्ये बदल होत गेला आणि हळूहळू समाजकारण कमी होत संघटनेमध्ये राजकारण अधिक होऊ लागले. अत्यंत निष्ठावंत आणि कडवट तितकेच कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय आनंद दिघे आणि मातोश्री यांचेही स्नेहसंबंध सर्वश्रुत होते. स्वर्गीय आनंद दिघे यांचा काळ हा खर्‍या अर्थाने ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा वैभवाचा काळ म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील भाजपची सत्तेतील मक्तेदारी मोडून काढत ठाणे जिल्हा शिवसेनामय करण्याची किमया त्यावेळी स्वर्गीय आनंद दिघे यांनी केली होती. मग तो भाजपचे खासदार स्वर्गीय राम कापसे यांच्याकडे असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपशी उघड पंगा घेत शिवसेनेकडे खेचून घेणे असो, अगदी डोंबिवलीसारख्या भाजपच्या आणि विशेषत: संघाच्या बालेकिल्ल्यातील कल्याण डोंबिवली महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे असो, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नं तडीस नेण्याचे अत्यंत मोलाचे कार्य त्यावेळी आनंद दिघे यांनी स्वतःचे सर्वस्व संघटनेसाठी झोकून देत पूर्ण केले होते. हा सारा इतिहास आठवण्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्याचे नगर विकास मंत्री तसेच ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महत्त्वाचे म्हणजे गेल्याच वर्षी शिवसेनेच्या नेत्यांच्या पंगतीत मानाचे स्थान मिळालेले शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे आणि मातोश्री यांच्यातील संबंध हे आहे.
अगदी काल परवाच राज्याचे नगर विकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा येथील गावी शेतात पेरणी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तसेच वृत्तवाहिन्यांवर देखील झळकला होता. हा व्हिडीओ ठाण्यातील आणि शिवसेनेतील बदलत्या राजकारणावर बर्‍यापैकी अप्रत्यक्ष भाष्य करणारा होता अशी चर्चा या व्हिडिओनंतर सुरू झाली आहे त्यात तथ्य किती हा भाग वेगळा. मात्र राजकीय दूरदृष्टी असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पेरणी सुरू केली आहे याकडे राजकीय जाणकार दुर्लक्ष करू शकत नाहीत हेच यातून अधोरेखित होते.

एकनाथ शिंदे यांच्या पूर्वाश्रमीच्या राजकीय इतिहासाकडे बघायचे झाल्यास सामान्य शिवसैनिक ते राज्याचा नगर विकास मंत्री तसेच शिवसेना नेता इथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा प्रचंड संघर्षाचा आणि अभूतपूर्व आहे असेच म्हणावे लागेल. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असलेली नितांत श्रद्धा, शिवसेनेच्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावून आणि प्रसंगी सर्वस्व झोकून देऊन काम करण्याची तयारी, त्यामुळे सहाजिकच शिवसैनिकांचे मिळालेले प्रचंड पाठबळ ही एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी बलस्थाने आहेत. कोणत्याही अन्य शिवसेना नेत्याला हेवा वाटावा असा एकनाथ शिंदे यांचा आजवरचा चढता राजकीय आलेख आहे हे देखील नजरेआड करून चालणार नाही.

- Advertisement -

ठाण्याच्या वागळे इस्टेट या औद्योगिक वसाहतींमधील एक साधे कामगार, रिक्षा चालक, सामान्य शिवसैनिक आणि त्यानंतर किसन नगर शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख, ठाणे महापालिकेचे नगरसेवक, आपल्या अमोघ वाणी फर्डे वक्तृत्व आणि अभ्यासपूर्ण भाषण कौशल्य यावर एकनाथ शिंदे ठाणे महापालिकेचे सभागृह नेते झाले आणि त्यानंतर अर्थाने राजकीय कारकिर्दीला कलाटणी मिळाली. दुर्दैवाने स्वर्गीय आनंद दिघे यांचे अपघाती निधन झाले आणि ठाणे जिल्ह्याच्या शिवसेनेची धुरा अत्यंत प्रतिकूल आणि खडतर काळात एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर येऊन पडली. आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्हा शिवसेनेत निर्माण झालेली भली मोठी पोकळी भरून काढण्याचे आव्हान त्याकाळी शिवसेनेसमोर होते. एकीकडे युतीतील मित्र पक्ष असलेला भाजपासारखा हितशत्रू आणि दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी सारखे मातब्बर उघड शत्रू अशा सार्‍यांना एकाच वेळी अंगावर घेत ठाणे जिल्ह्यातील महापालिकांवर तसेच नगरपरिषदांवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे अवघड शिवधनुष्य एकनाथ शिंदे यांनी लिलया पेलवून दाखवले. आणि शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांनी पूर्णतः सार्थ करून दाखवला. २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले आणि त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ अशा चारही विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांनी स्वतः जिंकल्याच, मात्र त्याच बरोबर ठाणे जिल्ह्यातून तसेच पालघर, कोकण, नाशिक, मराठवाडा येथूनही शिवसेनेचे अधिकाधिक आमदार विधानसभेत कसे निवडून येतील आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात कसे अधिकाधिक बळकट होतील याचीच सर्वतोपरी काळजी एकनाथ शिंदे यांनी आजवरच्या त्यांच्या राजकीय वाटचालीत पूर्णपणे घेतली आहे हे देखील लक्षात घेण्याची गरज आहे.

अर्थात एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे शिवसेनेतील एक मातब्बर मास लीडर म्हणून ओळखले जातात तसेच ते मराठा समाजाचे नेते आहेत. शिवसेनेमध्ये देखील मराठा समाजाचे नेतृत्व म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे सहाजिकच मातोश्रीकडून जर शिंदे यांच्या खच्चीकरणाचे प्रयत्न खरोखरच सुरू झाले असतील तर ते सद्यस्थितीत शिवसेनेला अधिक हानीकारक आहेत असेच राज्यातील चित्र आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी शिवसेनेतील बहुतांश आमदार आहेत. त्यामध्ये मराठा समाजाचे तर आहेतच, मात्र त्याचबरोबर बहुजन समाजातील लोकप्रतिनिधी देखील शिंदे यांच्या पाठीशी आहेत. आमदार, खासदार इतकेच नव्हे तर शिवसेनेचे अन्य नेते ते अगदी सामान्य शिवसैनिक यांच्या हाकेला ओ देत मदतीला धावून जाणारे नेते म्हणून एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांमध्ये ओळखले जातात. त्यामुळे मातोश्रीला तरी काही गोष्टींमध्ये खटकत असले तरीदेखील शिंदे यांचे ग्रास रूटवरील काम अत्यंत भक्कम आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या पेरणीला भरघोस पीक आले तर आश्चर्य वाटायला नको इतकेच लक्षात घेण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -