घरफिचर्सकरोनापेक्षाही भीषण धोका!

करोनापेक्षाही भीषण धोका!

Subscribe

हल्ली तबलिगी जमातचं नाव काढलं की आसपासचे कान आपोआप टवकारले जातात. आणि हे फक्त समोर असलेल्यांचंच होतं असं नव्हे, तर सोशल मीडियावर तबलिगी अशा उल्लेखाची कोणतीही पोस्ट टाकली की त्याचे टीकाकार आणि समर्थक आपोआप उभे राहतात. इतके, की काही काळाने आपल्यालाच संभ्रम व्हावा की आपण बोलत करोनाबद्दल होतो की तबलिगीबद्दल.

गेल्या काही दिवसांमध्ये हा ‘पझेसिव्हनेस’ इतका टोकाला गेला आहे की हल्ली तबलिगीची चर्चा हिंदू-मुस्लीम वादावर कधी सरकते, याचं भान ना ती सुरू करणार्‍याला राहत ना तिच्यावर भूमिका मांडणार्‍याला राहत. ज्या साथीमध्ये अख्ख जग पोळून निघतंय, रोज शेकडो लोकांचे बळी जात आहेत, अक्षरश: हजारोंच्या संख्येनं नवे रुग्ण सापडत आहेत, अमेरिकेसारखी महासत्ता देखील नाक मुठीत धरून इतर विकसित तर सोडाच; पण भारतासारख्या विकसनशील अर्थात डेव्हलपिंग नेशनसमोर हात पसरतेय, जगातल्या सर्व महासत्ता गुडघ्यावर आल्या आहेत आणि अख्ख जग आर्थिक मंदीच्या महाभयानक अशा संकटाच्या उंबरठ्यावर आहे, तिथे भारतात आपण परंपरेनुसार कोणत्याही मुद्यावर हिंदू-मुस्लीम वाद सुरू करण्याच्या सवयीने करोनावर देखील एक भारत म्हणून उभे न राहता हिंदू आणि मुस्लीम म्हणून लढा देऊ लागलो आहोत. त्यामुळे करोनासुद्धा हे सगळं पाहून आपल्यावर हसत असला, तर त्यात काहीही चूक नसेल!

नुकताच एक सहज कानावर पडलेला संवाद… ‘आता टोपी दिसली की लगेच तपासणी करायला पाहिजे. या लोकांचा काही भरवसा नाही. कोण करोना घेऊन फिरत असेल, काही नेम नाही. तो व्हिडिओ बघितला ना?’ आता या संवादाच्या पार्श्वभूमीवर करोना आणि त्याला काही लोकांनी दिलेलं हिंदू-मुस्लीम रूप या गोष्टीच्या दोन्ही बाजू तपासून पाहूया. पहिली बाजू अर्थात गुन्हेगारांची.

- Advertisement -

इथे गुन्हेगार हा शब्द फार जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने वापरण्यात आला आहे. कारण देशातल्या कुणाच्याही आरोग्याला हानी पोहोचवण्यासाठी कारणीभूत ठरणार्‍याला गुन्हेगारच म्हटलं पाहिजे. तर या सगळ्या गोंधळाला सुरुवात झाली दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमात या मुस्लीम धर्मियांमधल्या एका उपगटाच्या मरकज या कार्यक्रमापासून. मार्च महिन्याच्या २१ तारखेला हजारोंच्या संख्येने तबलिगी मरकज या त्यांच्या पारंपरिक सोहळ्यासाठी दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये जमा झाले. हेच फार भीषण होतं. जगात करोनाचा धुमाकूळ तेव्हा सुरू झाला होता. आपल्या केंद्र सरकारने परदेशातून भारतात येणार्‍यांना किंवा आलेल्यांना करोनाची तपासणी करण्याची विनंती वजा आवाहन केलं होतं. पण निजामुद्दीनमध्ये शेकडो तबलिगी परदेशातून दाखल झाले. तेही प्रशासनाला कोणतीही सूचना न देता आणि तपासणी न करता. इथेच त्यांनी पहिला गुन्हा केला.

कार्यक्रमानंतर हे हजारो तबलिगी भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गेले. म्हणजेच त्यांच्या त्यांच्या घरी गेले. किंवा वैयक्तिक कामासाठी गेले. पण गेले. इथे त्यांनी दुसरी महाचूक केली. परदेशातून आलेल्या लोकांच्या संपर्कात येऊनही यातल्या कुणालाही याचा गंध देखील लागला नाही की आपण फार भयंकर जोखीम घेतली आहे. झालं. त्या परदेशातल्या शेकडो तबलिगींकडून भारतातल्या हजारो तबलिगींच्या माध्यमातून देशभरातल्या लाखो तबलिगींपर्यंत करोनाचा संभाव्य फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला. आजघडीला देशभरात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी तब्बल ३० टक्केे रुग्ण हे तबलिगी किंवा त्यांच्या थेट संपर्कात आलेले आहेत.

- Advertisement -

अजूनही अनेक तबलिगी, मग ते भितीमुळे असोत किंवा हट्टीपणामुळे, घमेंडीमुळे, कट्टरतेमुळे कशाहीमुळे असोत, गायब आहेत. त्यांचा शोध घेण्याचं कठीण काम प्रशासनावर आहे. आणि त्याहून कठीण काम म्हणजे हे सर्व तबलिगी ज्यांच्या संपर्कात आले, त्या सगळ्यांचा शोध घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करणं. अशा क्वॉरंटाईनची संख्या आज २२ हजारांहून जास्त झाली आहे. तबलिगींच्या एका कार्यक्रमामुळे प्रशासनावर, आरोग्य व्यवस्थेवर, पोलीस यंत्रणेवर, सरकारांवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतातल्या लाखो नागरिकांवर किती मोठा ताण आला आहे, याची प्रचिती आता हळूहळू येऊ लागली आहे.

तबलिगींनी केलेली महाचूक देशातल्या शेकडो नागरिकांना धोक्यात टाकणारी ठरली आहे. त्यामुळे तबलिगींवर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे. पण ती कारवाई तबलिगींवर काय म्हणून व्हायला हवी? या प्रश्नाचं उत्तर न्यायालयाने किंवा पोलिसांच्या चार्जशीटने देण्याआधीच देशातल्या अनेक नेटिझन्सनी आणि अर्धवटरावांनी परस्परच देऊन टाकलं आहे. तबलिगी प्रकरणाला अचानक हिंदू-मुस्लीम वादाचं स्वरूप मिळायला लागलं. आणि तबलिगींनी गुन्हा केला म्हणून त्यांना शिक्षा देणं गरजेचं आहे हे पटवण्यापेक्षा ते मुस्लीम आहेत म्हणून त्यांना गुन्हेगार ठरवण्याची अहमहमिका दिसू लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवे लागणीच्या आवाहनाला केलेला विरोध तबलिगींना समर्थन देण्याचा प्रकार म्हणून हिणवला जाऊ लागला. ‘जे थुंकणार्‍यांवर गप्प होते, ते मोदींच्या दिवे लागणीवर बोलण्यासाठी तयार झाले’ अशी हेटाळणी करणारे मेसेज व्हायरल होऊ लागले. हळूहळू मुस्लिमांचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होऊ लागले. मग कुठे ते कुणाला शिव्या देत आहेत, तर कुठे पोलिसांवर हात उचलत आहेत, तर कुठे दगडफेक करत आहेत तर कुठे बिनबोभाटपणे रस्त्यांवर फिरत आहेत. यातले काही व्हिडिओ फेक असल्याचं किंवा जुने असल्याचं देखील नंतर पुढे आलं. पण तोपर्यंत एका गुन्हेगारी गटाबद्दल नव्हे, तर देशातल्या मुस्लिमांबद्दल लोकांच्या मनात आकस निर्माण झालेला होता. आणि त्याचाच परिणाम म्हणून ‘टोपी दिसेल त्याची तपासणी करावी लागेल’ हा संवाद ठरला.

खरंतर मुस्लिमांचं अशा प्रकारे लेबलिंग व्हायला जेवढे समाजातले काही अर्धवट डोक्याचे उपटसुंभ कारणीभूत आहेत, तितकेच मुस्लिमांचे कर्ताधर्ता म्हणून स्वत:ला मिरवणारे त्यांचे मौलवी आणि तथाकथित मुस्लीम नेतेमंडळी देखील कारणीभूत आहेत. रस्त्यावर उतरून पोलिसांवर हात उचलणार्‍या, दगडफेक करणार्‍या, आरोग्य सेविकांवर अरेरावी करणार्‍यांना तंबी देण्यासाठी मुस्लिमांमधलेच किती जण पुढे आले? असा प्रश्न आता नक्कीच उपस्थित होतो. राज ठाकरेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेत उल्लेख केल्याप्रमाणे एरवी निवडणुकांमध्ये कुणाला मतदान द्या हे कंठरवाने सांगणार्‍या मौलवींनी वास्तविक या अशा परिस्थितीत पुढे येऊन मुस्लीम समाजातल्या या काही समाजकंटकांना समज देऊन, प्रसंगी त्यांच्या विरोधात भूमिका घेऊन उभं राहणं गरजेचं होतं. पण तसं न झाल्यामुळे आता संपूर्ण मुस्लीम समाजच या अशा घटनांचा समर्थक आहे असा प्रचार होऊ लागला आहे. आणि देशातल्या करोनाविरोधातल्या लढ्याला देखील हिंदू-मुस्लीम रंग दिला जाऊ लागला.

१९ मार्च रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीमध्ये एक लग्नसोहळा झाला. त्याची निश्चित आकडेवारी जरी नसली, तरी किमान ७०० ते १००० लोकांनी या लग्नाला उपस्थिती लावली. लग्नात हजर असलेल्यांपैकी एक व्यक्ती आणि त्याचे काही मित्र हे १५ मार्चला तुर्कस्थानहून सुट्टीवरून परतले होते. पण त्यातल्या कुणीही स्वत:ची चाचणी करण्याचे कष्ट घेतले नाहीत किंवा निर्बंध असूनही त्या लग्नाला उपस्थिती न लावण्याचा विचार त्या गर्दीतल्या कुणाच्याही मनाला शिवला देखील नाही. सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूर लंडनमधून प्रवास करून आली आणि क्वॉरंटाईन होण्याऐवजी तिने भारतात बिनबोभाट प्रवास केला. इतकंच नाही, तर अनेक उच्चभ्रूंना तिने परतल्यानंतर पार्टी देखील दिली.

या पार्टीला राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री, भाजपचे खासदार आणि त्यांच्या वलयातली अनेक उच्चभ्रू मंडळी हजर होती. असे अनेक ‘सोहळे’ देशात करोनाचा फैलाव सुरू असताना देखील झाले. विशेष बाब म्हणजे, यातलं कुणीही मुस्लीम नव्हतं. पण त्यांच्यावर इतक्या सपाटून टीका केली जात नाही जितकी तबलिगींवर केली जात आहे. मोदींच्या ‘घरात दिवे लावा’ या आवाहनाला देखील असंख्य लोकांनी त्यांच्या टाळीनादाप्रमाणेच वराती काढून ‘उदंड’ प्रतिसाद दिला. पण त्यांनाही कुणी इतकं लक्ष्य केलं नाही जितकं तबलिगींना केलं गेलं. खरंतर व्यापक अर्थाने पाहिलं, तर तबलिगींचा आणि या सगळ्यांचा गुन्हा एकाच प्रकारचा आहे. बंदी असतानाही एकत्र जमणं. पण त्याला दिलं गेलेलं मुस्लीमविरोधी रूप हे देशात हिंदू-मुस्लिमांमध्ये पुन्हा तिढा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलं आहे.

खरंतर तबलिगींना आणि या सगळ्या पार्टीबाज, वरातवेड्या लोकांनाही कायद्याने शिक्षा व्हायलाच हवी. तबलिगींनी नियम मोडला म्हणून शिक्षा झाली पाहिजे, ते मुस्लीम आहेत म्हणून नव्हे. आणि इतरांनाही त्यांचा धर्म बघून नाही तर त्यांचा गुन्हा बघून टार्गेट केलं गेलं पाहिजे. पण याच्या नेमक्या उलट परिस्थिती सध्या दिसत आहे. मुस्लीम मौलवींच्या चुप्पीने याला हवा मिळत आहे. आणि काही अंधभक्तांमुळे ही बाब गंभीर बनू लागली आहे. करोना तर अवघ्या दीड महिन्यापूर्वी भारतात आला. अजून दीड एक महिन्यात तो भारतातून काढता पाय घेईलही. पण या देशात राहणारे हिंदू-मुस्लीम गेल्या कित्येक शतकांपासून इथे राहात आहेत. पुढेही अनेक शतकं त्यांना इथेच राहायचं आहे. पण डोळ्यांनाही न दिसणार्‍या एका विषाणूने जर इथल्या हिंदू-मुस्लिमांमधली दरी जर अजून वाढवली, तर समाजकंटकांसाठी ही एक नामी संधी आणि अखंड भारतासाठी हा भीषण धोका ठरेल. कदाचित करोनापेक्षाही मोठा!

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -