घरफिचर्सथोर देशभक्त विठ्ठलभाई पटेल

थोर देशभक्त विठ्ठलभाई पटेल

Subscribe

विठ्ठलभाई जव्हेरभाई पटेल यांचा आज स्मृतिदिन. विठ्ठलभाई हे एक थोर देशभक्त व श्रेष्ठ संसदपटू. पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून गाजलेले विठ्ठलभाई पटेल हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे वडीलबंधू होत. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1871 रोजी खेड जिल्ह्यातील करमसद या गावी लेवा पटीदार या शेतकरी कुटुंबात झाला. आईचे नाव लाडबाई. करमसद व नडियाद येथे शालेय शिक्षण संपवून ते मॅट्रिक झाले व मुंबईस वकिलीच्या परीक्षेसाठी आले. वकिलीच्या परीक्षेत भरघोस यश मिळवून त्यांनी गोध्रा येथे वकिली सुरू केली व वल्लभभाईंच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.

पुढे दोघेही बंधू १८९८ पासून बोरसदला वकिली करू लागले. आठ वर्षे वकिली चांगली केल्यानंतर विठ्ठलभाई १९०५ मध्ये वल्लभभाईंच्या व्ही. जे. पटेल या नावाने मिळालेल्या पारपत्रावर बॅरिस्टर होण्याकरिता इंग्लंडला गेले व बॅरिस्टर होऊन परतले (१९०८). लंडनमध्ये दादाभाई नवरोजींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केला. स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी वृत्तपत्रे, व्यासपीठ व कायदेमंडळ यांचा सम्यक उपयोग केला पाहिजे ही शिकवणूक त्यांना दादाभाईंकडून मिळाली.

- Advertisement -

मुंबईला परत आल्यावर पुन्हा वकिली सुरू केली व १९११ साली मुंबई कायदेमंडळात ते निवडून आले. त्यांनी सर्व बिनसरकारी सभासद एकत्र आणून सरकारी धोरणावर प्रभाव पाडला. १९१६ साली प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात यावे, या उद्देशाने त्यांनी एक विधेयक मांडले. असहकारितेच्या आंदोलनातील विधिमंडळ-बहिष्कार पटेलांना मान्य नव्हता; पण त्यांनी पक्षशिस्त पाळली. विधिमंडळाचा राजीनामा दिला व निवडणुकीला ते पुन्हा उभे राहिले नाहीत. पुढे ते स्वराज्य पक्षात गेले. १९२३ च्या नागपूर झेंडा सत्याग्रहात विठ्ठलभाई पटेल एक पुढारी होते. त्यांच्याच मुत्सद्दीपणामुळे तो सत्याग्रह यशस्वी झाला. १९२२ मध्ये ते मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आले. त्यांच्या प्रयत्नाने शाळांतून हिंदी शिकविण्यास सुरुवात झाली. सर्व खात्यांत स्वदेशी माल घेण्याचे धोरणही त्यांच्यामुळेच स्वीकारले गेले.

सत्याग्रहाच्या लढ्याच्या वेळी पटेल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला (१९३०). २० ऑगस्ट रोजी पेशावरला केलेल्या अत्याचाराचा अहवाल देण्याकरिता जी समिती नेमली होती, तिचे ते अध्यक्ष होते; पण या अहवालावर सरकारने बंदी घातली. तो हुकूम अमान्य केला गेला व पटेलांना सहा महिने शिक्षा झाली; पण प्रकृतीच्या सबबीवर ते लवकर सुटले. मुंबई महानगरपालिका, मुंबई विधिमंडळ व काँग्रेस अशा तीन क्षेत्रांत जरी त्यांनी कार्य केले, तरी संसदपटू म्हणूनच ते सर्वत्र प्रसिद्ध होते. अस्खलित वक्तृत्व, कुशल संसदपटुत्व यांसाठी ते प्रसिद्ध होते. आपल्या पगारापैकी काही रक्कम ते महात्मा गांधीना देत. त्यांनी आपल्या संपत्तीचा विश्वस्त नेमला होता. यातूनच पुढे मुलींची एक शाळा गुजरातमध्ये काढण्यात आली. या देशभक्ताचे २२ ऑक्टोबर १९३३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -