घरफिचर्सवारी -    सामूहिक शहाणपणाचा  प्रतिध्वनी 

वारी –    सामूहिक शहाणपणाचा  प्रतिध्वनी 

Subscribe

आज मनुस्मृतीचे आंधळे  पाईक समाजाला  पुन्हा पारलौकिकाच्या अंधाऱ्या कोठडीत  ढकलू पाहत आहेत. वारकरी कोणाची बाजू घेणार ?मनुस्मृतीतले  वर्णव्यवस्थेचे समर्थन, स्त्रियांचे शोषण व कर्मवीपाकाच्या मांडणीला उल्लंघून ‛सकळांसी  येथे आहे अधिकार'पर्यंत संतांनी आपणाला आणून सोडलं.  आता  पुढं जायचं का पुन्हा उलट्या दिशेचा प्रवास करायचा ? हे आता प्रत्येकानं स्वत:ला विचारलं  पाहिजे. 

मराठी समाजाने अध्यात्माच्या मार्गावरून सुरू केलेला    समता आणि साहित्य-संस्कृतीचा कृती कार्यक्रम  म्हणजे पंढरीची वारी.  ही वारी परंपरा, तिचे प्रवर्तक, अनुयायी कायम समाजातील धर्मांधतेवर, कर्मकांडावर, भेदाभेदावर भोंदूगिरीवर काळाच्या पुढं जावून कठोर प्रहार करताना दिसले. वारकरी संतांनी अनेक दोषांनी बरबटलेल्या समाजाला टाळून केवळ  स्वतःच्या  आध्यत्मिक मुक्तीला कधीच  महत्त्व दिले  नाही. समाजमान्यता मिळवण्यासाठी धर्माच्या रुढ संकल्पनांपुढे मान तुकवली नाही. धर्माच्या चिरेबंदी वाड्याची वतनदारी ज्या पुरोहितांकडे होती त्यांचेही आकर्षण कधी संतांना होते असे दिसत नाही. मध्ययुगीन काळात धर्म आणि समाजव्यवस्थेच्या आहे त्या अन्यायी स्वरूपाच्या रक्षणाची जबाबदारी ज्या सत्ताधाऱ्यांवर होती त्यांची मर्जी संपादन करून ऐहिक लाभ पदरात पाडून घेण्यात या संत ‛साहित्यिक’ मंडळींनी खटपटी केल्या नाहीत. तरी त्यांना   आजतागायतच्या समाजमनात का स्थान आहे ? याचे उत्तर शोधणे महत्वाचे आहे. ते खरे वारीचे सामर्थ्य आहे.

‛विष्णुमय जग , वैष्णवांचा धर्म , भेदा-भेद भ्रम, अमंगळ’ हा जगण्याचा पाया मानणारा महाराष्ट्र आज भेदाभेदाच्या टकमक टोकावर कोणी आणून ठेवला ?
‛चोखोबाची भक्ती कैसी, प्रेमे आवडी देवासी.
ढोरे ओढी त्याचे घरी,
नीच काम सर्व करी’.
असं अतिशूद्र चोखोबांच निर्भीडपणे गुणगान गाणाऱ्या एकनाथांचा महाराष्ट्र आज दलिताच्या नवरदेवाला मारुतीच्या पारावर दर्शनासाठी का येऊ देत नाही ?

- Advertisement -

‛नामदेव किर्तन करी,
पुढे देव नाचे पांडुरंग,
जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग’. वारकरी चळवळीचा पाया घालणाऱ्या नामदेवांच्या कीर्तनात साक्षात पांडुरंग नाचतोय आणि ज्ञानदेवांसारख्या युगपुरुषाला ही ‛दासी’ अभंग म्हणण्यास सांगते आहे, याचा अर्थ काय होतो, हे मंदिरात महिलांना दर्शन घेण्याच्या हक्कासाठी कोर्टाची पायरी चढायला लावणाऱ्या महाराष्ट्राला कळेल का ?

‛स्त्रीपुरुष नामभेदे, शिवपन ऐकले नांदे’
या ज्ञानदेवांच्या ‛अमृतानुभवाला’ नजरेआड करून महिलांना कीर्तन करण्यास प्रतिबंध करण्याचा करंटेपणा महाराष्ट्रात कोणी रूढ केला ?

- Advertisement -

‛दंभ कीर्ती मान, सुखें टाकीतो थुंकून,
जा रे चाळवी बापुडी, ज्यांना असे त्याची गोडी’ असं तुकोबा म्हणाले अन आजचे साधू-संत सरकारने राज्य मंत्र्याचा दर्जा द्यावा म्हणून फिल्डिंग लावू लागले, हे खरं नाही का ?
याची उत्तरं वारीच्या सामर्थ्याचा बिमोड करायचा चंग ज्यांनी बांधला आहे, त्यांच्याकडे पाहिलं की मिळतात. त्यामध्ये मनोहर भिडे आहेत, तसेच संतांनी सांगितलेल्या मार्गाच्या विपरीत प्रवास करणारे, वारीमार्गात निव्वळ  वारकरी ‛वेष’ परिधान करून कॅमेऱ्यासमोर फुगडी घालणारेह ‘संधीसाधू’ आहेत.  तसेच पंढरीच्या वाळवंटात धर्मपरिषद भरवून धर्ममार्तंडांच्या हस्ते वारकऱ्यांचा सत्कार करणारे सनातनी व त्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारणारे तथाकथित वारकरीही तितकेच आहेत, हे काही लपून राहिलेले नाही.

‘जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती  वाढो,   भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ असं सांगणाऱ्या ज्ञानोबाच्या दिंडीत मागीलवर्षी नंग्या तलवारी घेऊन मोठा जमाव घुसखोरी करत होता. चोपदारांनी  समयसूचकता दाखवून हे  अनिष्ट घटित  थांबवलं. दिंडी प्रमुखांनी कणखर भूमिका घेतली, सामान्य वारकर्यांनी या मत्सराने, द्वेषाने बरबटलेल्या तरुणांना ‘दिशाभूल करून घेऊ नका’ असं सुनावलं. पण दुसऱ्या बाजूला संतांच्या वारसातत्वाचा फुकाचा अभिमान बाळगणारे घुसखोरी करणारांच्या बाजूने पत्रकं काढताना महाराष्ट्राने अनुभवले. सुदैवाने तुकोबांनी तेव्हाच संतत्वाची लक्षणं सांगताना, ‘संतांचे ते आप्त, नव्हती संत’ असं प्रमाण घालून दिलं म्हणून ‛त्या’ पत्रकबाजीला कोणी गांभीर्यानं घेतलं नाही. यंदाही  पुण्यात दोन्ही पालख्या आल्या त्यावेळी ज्ञानोबा-तुकोबांच्याही पुढे मनु होता, अशा प्रतिपादनाने झालेली आहेतच. अर्थात, एवढ्या-तेवढ्याने बुद्धिभेद होईल इतके भाबडे काही  वारकरी नाहीत!    मात्र  ‘शब्दांचीच शस्त्रें, यत्ने करू’ म्हणणाऱ्या वारकर्यांना तलवारीच्या संरक्षणात वारी करणं मान्य आहे का ?  हेही ठामपणे सांगण्याची वेळ आता आलीय.

वारीत कोणी ‘स्वच्छता करतो’ म्हणून सहभागी होतं, कोणी आरोग्य तपासणी करण्याच्या निमिताने, कोणी भक्ती-शक्तीचा देखावा करून, तर कोणी आणखी काही कारणांमुळे.  पण ज्यांनी कधी ज्ञानदेवांनी अपेक्षा केल्याप्रमाणे ‛एक तरी ओवी’ अनुभवली नाही, ज्यांनी गाथेच्या अभंगातील मधूर गोडवा आणि  तितकाच कठोर प्रहार साहीला  नाही, ज्यांनी कधी संतांच्या चळवळीचा प्रेम, शांती, अहिंसा, सहिष्णुता, बंधुभाव, स्त्री-पुरुष समता हा पाया समजून घेतला नाही ते निव्वळ ‘वरलिया रंगा’ भुलून  वारीत आले तर तो फक्त  दिखावा ठरेल.
ज्ञानोबा-तुकोबांच्या काळात अध्यात्मिक गोष्टींचा पगडा समाजमनावर घट्ट होता तरीही ऐहिक जिवनात आमूलाग्र बदल करण्यासाठी ही मंडळी झिजली. आज मनुस्मृतीचे आंधळे  पाईक पुन्हा पारलौकिकाच्या अंधाऱ्या कोठडीत समाजाला ढकलू पाहत आहेत. वारकरी कोणाची बाजू घेणार ?
मनुस्मृतीत वर्णव्यवस्थेचे समर्थन, स्त्रियांचे शोषण व कर्मवीपाकाच्या मांडणीला उल्लंघून ‛सकळांसी  येथे आहे अधिकार’ इथपर्यंत संतांनी आपणाला आणून सोडले, पुढं जायचं का पुन्हा उलट्या दिशेचा प्रवास करायचा ? हे आता प्रत्येकानं स्वत:ला विचारले पाहिजे.

कोणत्याही निमंत्रणाशिवाय तब्बल  सातशे ते आठशे वर्षांपासून  ही वारी सुरू आहे. अनेक चढउतार, सांस्कृतिक धक्के  वारीने अनुभवले, पचवलेही.  यादव, मुघल, आदिलशहा, निजाम, मराठ्यांचे स्वराज्य, पेशवाई, ब्रिटिश साम्राज्यही    अनुभवलं.  आता लोकशाहीत वारी या सनातनी, धर्मांध व नाटकी लोकांच्या स्वार्थी आक्रमणाला सहज  बळी पडेल असं शक्य नाही. लाखो स्त्री-पुरुषांच्या सामूहिक शहाणपणाला संतांनी साद घातली होती, तिचा  प्रतिध्वनी म्हणजे ही वारी. तेराव्या शतकात राजसत्तेच्या आणि धर्मसत्तेच्या अभद्र युतीने मिळून संत  ज्ञानदेव आणि  त्यांच्या भावंडांना अतोनात छळले, त्यांच्यावर बहिष्कार टाकला, त्यांना धर्मद्रोही ठरवले. पुढील काही वर्षांतच हा महाराष्ट्र परचक्राला बळी पडून आपले सामर्थ्य-स्वत्व गमावून बसला. आज विद्यापीठात, महाविद्यालयात शिकत, वेगळा विचार मांडणाऱ्या, सामाजिक चळवळींतून काम करणाऱ्यांची,  प्रश्न विचारणाऱ्यांची अवस्था काय आहे? हे तरुण आणि कार्यकर्ते  ज्ञानदेवांसारखीच पददलितांची बाजू घेताट, धर्माच्या काळ्या बाजूवर प्रहार करतात  आणि मुख्य म्हणजे राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या वरवंट्याखाली चिरडले जाणाऱ्यांच्या पाठीशी उभे असतात.  तुकोबांची वहिवाट चालवत    अंधश्रद्धा समूळ संपली पाहिजे असा आग्रह ते धरतात. सामाजिक-धार्मिक  भोंदूगिरीवर प्रहार करताट. तर त्यांना थेट  देशद्रोही ठरवलं जातंय, बहिष्कृत केलं जातंय आणि  गोळ्या घालून मारलंही  जातंय. या आषाढीनिमित्त एकच मागणं,  बा विठ्ठला नकोशा हिंसक  इतिहासाची आता सतत  पुनरावृत्ती होऊ देऊ नको!


– हनुमंत पवार

(लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक  आहेत)
—————————

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -