घरफिचर्सजुगाडू कमलेशची मल्टिपर्पज सायकल

जुगाडू कमलेशची मल्टिपर्पज सायकल

Subscribe

भारत हा जुगाडू लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. एखाद्या गोष्टीची टंचाई जाणवू लागली की लोक अनोख्या प्रकारे त्यावर मग पर्याय शोधून काढतात. त्यामुळेच भारतातील लोकांना अनेकदा गंमतीनं जुगाडू असं म्हटलं जातं. हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवुडप्रमाणेच मालेगावची मॉलिवूड म्हणून ओळख देशभरात आहे. याचीच प्रचिती देणारा आणखी एक प्रकार समोर आला आहे. शेतकर्‍यांनो ही यशोगाथा आहे मालेगाव तालुक्यातील देवारपाड्याचा कमलेश घुमरे या प्रयोगशील तरुणाची..शेतीचा कोणताही अनुभव नसलेल्या या तरुणानं नांगरणी, पेरणी, फवारणी अशी वेगवेगळी काम करणारं यंत्र बनवलंय. भंगारातून मिळालेल्या वस्तूंपासून हे यंत्र त्यानं तयार केलं आहे. नुकतेच त्याने शार्क टँक या टीव्ही शोमध्ये आपल्या या जुगाडाचे प्रमोशन करत संपूर्ण देशात प्रसिद्धी मिळवली आहे.

 

- Advertisement -

गेल्या काही काळात शेतात काम करण्यासाठी मजुरांची कमतरता भासत आहे. गावाकडील तरुण वर्ग नोकरीसाठी शहरांच्या दिशेने धावत आहे. मात्र, जुगाडू कमलेश याने शहरात नोकरीच्या मागे न लागता काहीतरी वेगळे आपल्याच गावात करावे याकरता गेल्या अनेक वर्षांपासून धडपड चालवली आहे. शेतकरी पेरणीसाठी आपल्या परंपरागत बैलजोडीचा वापर करतात किंवा काही शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करतात. तसेच पेरणीच्या बर्‍याच पद्धती असतात. त्या पद्धती पिकांपरत्वे बदलत असतात. काही पिकांची लागवडही टोकण पद्धतीने केली जाते. परंतु बाजरी, ज्वारी, भुईमूग इत्यादी पिकांच्या पेरणीसाठी बैलजोडी अथवा ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राचा वापर केला जातो. परंतु बर्‍याच शेतकर्‍यांना अजूनही यंत्राचा वापर करणे शक्य होत नाही. अशीच परिस्थिती मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथील तरुण शेतकरी कमलेश घुमरे व एकंदरीत त्यांच्या कुटुंबाची तसेच अनेक शेतकर्‍यांची होती. कमलेश घुमरे त्यांच्या आई आणि वडिलांना होणारा त्रास पाहून तो सहन करू शकला नाही. मग त्यांनी टाकाऊ वस्तूपासून पेरणी यंत्र बनवले.

कमलेश घुमरे यांनी बनवलेले हे यंत्र सहज उपलब्ध होणार्‍या टाकाऊ वस्तूंपासून घरच्या घरी तयार केले आहे. त्यांनी तयार केलेल्या या यंत्राचे वैशिष्ठ्य म्हणजे ते अगदी हलक्या वजनाचे असून त्याची किंमतही फार कमी आहे. या यंत्राच्या सहाय्याने कपाशी, मका, भुईमूग यासारख्या पिकांची पेरणी सहजपणे करता येते. या यंत्राच्या सहाय्याने शेतकर्‍यांचे होणारे कष्ट, तसेच वेळ वाचणार आहे. तसेच मजुरांची टंचाई आहे त्यावरदेखील या यंत्राच्या सहाय्याने मात करता येणार असल्याचे कमलेश घुमरे यांनी सांगितले. त्यांनी या यंत्रासाठी पाण्याची रिकामी बाटली, वायर, पाईप इत्यादी टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे.

- Advertisement -

कमलेश यांनी बनवलेले या यंत्रामुळे शेतकर्‍यांचे कष्ट खूपच कमी होणार आहेत. तसेच या यंत्राच्या वापरामुळे शेतकर्‍यांचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ आणि पैसाही वाचणार आहे. कमलेश घुमरे यांनी बनवलेल्या पेरणी यंत्रामुळे ज्या पिकांच्या लागवडीसाठी शेतकर्‍यांना वाकून काम करावे लागते. हा वाकून होणारा त्रास शेतकर्‍यांचा वाचणार आहे. मालेगावचा फक्त बारावी पास झालेला कमलेश नानासाहेब घुमरे उर्फ जुगाडू कमलेश. शार्क टँक इंडिया या नवनव्या व्यवसायाच्या कल्पनांना उत्तेजन देणार्‍या सोनी टीव्हीवरील शोमध्ये याच जुगाडू कमलेशला डोक्यावर घेतले. एवढेच नाही कमलेशमुळे हा शो लाखो लोकांपर्यंत पोहोचला.

यू ट्यूबवर या जुगाडू कमलेशच्या यंत्राचा व्हिडिओ आतापर्यंत 80 लाख जणांनी पाहिला आहे. कमलेशने 7 वर्षे मेहनत घेऊन एक यंत्र तयार केले. याला सायकलसारखे हॅन्डल आहे. जोडलेल्या स्प्रेमधून सहज फवारणी करता येते. यामुळे पाठीवर 15 ते 20 लिटरचा टँक घेऊन दिवसभर आरोग्याला घातक किटकनाशकांची फवारणी करण्यापासून सुटका होऊ शकते. तसेच अशा टँकपेक्षा हे यंत्र स्वस्तही पडते आणि सहज वापरताही येते.

सात वर्षे सतत मेहनत घेऊन कमलेशने हे यंत्र तयार केले आहे. यासाठी भंगारमधून त्याने सामान आणले. 2014 मध्ये त्याचे हे यंत्र तयार झाले. पण त्याला पेटंटबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे तो त्या वाटेला गेला नाही. याच यंत्राचा व्हिडिओला यू ट्यूबवर प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

शार्क टँकमध्ये कमलेशने हे यंत्र सादर केले तेव्हा उपस्थित उद्योजकही फारच प्रभावित झाले. याच कार्यक्रमात पियुष बन्सल यांनी कमलेशच्या या संकल्पनेवर विश्वास दाखवून त्याला भांडवलापोटी 10 लाख रुपयांचा चेकदेखील दिला. आता कमलेशला मोठा ब्रेक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कमलेशचे हे जुगाड काही काळाने आधुनिक रुप घेऊन आपल्या शेतापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. भारतात अनेक नवनवीन शोध होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. अनेक स्टार्टअप्स यापेक्षा वेगाने वाढत आहेत असे दिसते, जे एक वास्तविक समस्या समाधान आणि काळाची गरज आहे. भारताविषयी बोलायचे झाले तर, ही जागतिक कृषी महासत्ता आहे. KG Agro-Tech ही शार्क टँक इंडियामध्ये समाविष्ट केलेली एक स्टार्टअप आहे, जी शेतीशी संबंधित उत्पादने बनवते. त्यांचे उत्पादन एक बहुउद्देशीय सायकल आहे जी कीटकनाशक फवारणीसाठी, बियाणे पेरण्यासाठी आणि मालाची वाहतूक करण्यासाठी वापरली जाते. या सायकलमुळे शेतकर्‍यांचा बराच वेळ वाचतो. याद्वारे शेतकरी कमी वेळात अर्धी शेती करू शकतो.

स्वतःच्या घरात ही सायकल बनवली आहे, हे उत्पादन अतिशय सोप्या तंत्रज्ञानाने बनवल्याचे कमलेश सांगतात. त्याच बरोबर देखभालीचा खर्चही खूप कमी येतो आणि शेतकर्‍यांसाठी ते फायदेशीर आहे. KG Agrotech हे असेच एक उत्पादन आहे जे प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या समस्या कमी करते.

– राकेश बोरा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -